नागपूर : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू आहात का? असे विचारून लोकांवर गोळीबार केला, असे मृतांचे नातेवाईक सांगत आहेत. मात्र, जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असे असंवेदनशील वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "पहलगाम हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. तिथे सुरक्षा का नव्हती? दहशतवादी २०० किलोमीटरच्या आत कसे पोहोचतात? दहशतवाद्यांनी हिंदू आहात का? असे विचारून त्यांना गोळ्या झाडल्या असे ते सांगतात. पण दहशतवाद्यांना लोकांकडे जाऊन त्यांच्या कानात त्यांचा धर्म कोणता आहे, हे विचारण्यासाठी वेळ असतो का? या सगळ्या गोष्टी वादग्रस्त आहेत."
"दहशतवादाला कोणतीही जात, धर्म नसतो. दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर सरळ कारवाई करावी, हीच जनतेची भावना आहे. परंतू, या प्रकरणात दुसरीकडे लक्ष वळवणे सुरु आहे," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यानंतर मृतांचे नातेवाईक जम्मू काश्मीरहून सुखरूप महाराष्ट्रात पोहोचले आहेत. तिथल्या परिस्थितीचे वर्णन करताना दहशतवाद्यांनी आम्हाला धर्म विचारून गोळीबार केल्याचे ते वारंवार सांगत आहे. परंतू, विरोधक मात्र, यात काहीही तथ्य नसल्याचे म्हणत आपली राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते.