मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Protest on CP office) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचा भव्य मोर्चा मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी ३ वाजता चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून हजारो कार्यकर्ते व हिंदू समाज यात सहभागी होतील. याबाबत सविस्तर माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी दिली.
'चोर सोडून, संन्याशाला फाशी' असा मुंबई पोलिसांचा व्यवहार असल्याचे म्हणत मोहन सालेकर पुढे म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आकस व द्वेषापोटी पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. गोहत्या, लव्ह जिहादच्या कित्येक प्रकरणात गुन्हेगारांवर कारवाई करायचे सोडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच लक्ष केले जात आहे. एकंदरीत पोलीस प्रशासन एका विशिष्ट समुदायाचे लांगुलचालन आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर द्वेषापोटी कारवाई करत असल्याचा आमचा ठाम आरोप आहे."
कुरार पोलीस स्थानकच्या डिसिपी स्मिता पाटील यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्याची भाषा केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दि. १६ फेब्रुवारी रोजी सांताक्रूक्ष मधील वाकोला परिसरात काही जिहाद्यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, त्या विनयभंग झालेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच अमानुष
मारहाण झाल्याचे सालेकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेदरम्यान विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर, बजरंग दल कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया उपस्थित होते.
विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेटवर
वडाळा संगमनगर भागात श्रीरामनवमीनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेच्या दोन दिवस अगोदर पोलीसांनी हिंदूविरोधी भूमिका घेत तयारीसाठी लावलेले सर्व बॅनर्स, भगव्या पताका काढून टाकल्या, सहभागी संस्थांना धमकावून भाग न घेण्याबाबत तंबी दिली. अंटॉप हिल येथे बेअर हाऊसिंग बिल्डींग कम्पाउंड येथे शोभायात्रेसाठी तयार केलेले साहित्य पोलिसांनी हिसकावून घेतले. कार्यकत्यांनी याला शांततेने विरोध करताच त्यांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरु केला. त्यात एका कार्यकर्त्याचे डोके फुटले, काहींच्या हाताला, बोटांना जखमा झाल्या, रामचंद्र यादव यांना तर एवढी मारहाण झाली की त्यांना के. ई. एम. हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. विश्व हिंदू परिषद सातत्याने शासन प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करीत आहे. तरीही विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. त्यामुळे पोलिसांना अल्टिमेटम म्हणून त्यांच्या अशा कारवाई विरोधात हा मोर्चा असल्याचे मोहन सालेकर यांनी सांगितले.