पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा; दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग भारतासोबत
28-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली ( Man Ki Baat):“दहशतवाद्यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. या कठीण काळात १४० कोटी देशवासीयांची एकता हा सर्वात मोठा आधार आहे. पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडित कुटुंबांना न्याय मिळेल,” असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले. ’मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
“पहलगाम घटनेने देशवासीयांना दुखावले आहे आणि याबद्दल देशवासीयांच्या मनात खोल वेदना आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांचे दुःख लोक समजू शकतात. दहशतवाद्यांचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळले आहे. काश्मीरमध्ये शांतता परतत होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, परंतु देशाच्या आणि जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दहशतवाद्यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे, म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात १४० कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे. भारतातील लोकांमध्ये जो राग आहे, तो जगभर जाणवत आहे. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध केला असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. मी पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेलच. या हल्ल्यातील दोषींना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल.”
एक पेड माँ के नाम’ मोहिमेत सामील व्हा’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ’‘एक पेड माँ के नाम’ मोहीम आपल्याला जन्म देणार्या आईला आणि पृथ्वी मातेला समर्पित आहे. दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या मोहिमेला एक वर्ष पूर्ण होईल. या एका वर्षात, देशभरात १.४ अब्जाहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. भारताच्या या उपक्रमाकडे पाहता, परदेशातील लोकांनीही त्यांच्या आईच्या नावाने झाडे लावली आहेत. तुम्हीही या मोहिमेत सामील व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. के. कस्तुरीरंगन यांना वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. के. कस्तुरीरंगन यांना श्रद्धांजली वाहिली. “देशाचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात कस्तुरीरंगन यांनीही मोठी भूमिका बजावली. देशासाठी त्यांची निस्वार्थ सेवा आणि राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल,” असे त्यांनी सांगितले.