'म्हाडा' १५ कोटी कागदपत्रे सार्वजनिक करणार - सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणार कागदपत्रे

नागरिकांना बघण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करणार "म्हाडा"चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची माहिती

    28-Apr-2025
Total Views | 14


मुंबई,  म्हाडाचे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे, नस्त्या (संवेदनशील वगळून) सार्वजनिक केले जाणार असून 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसात अपलोड केली जाणार आहेत. यामुळे 'म्हाडा'शी संबंधित विविध माहिती व दस्तऐवज नागरिकांना अधिक सुलभतेने एका क्लिकवर केवळ बघण्यासाठी वर्गवारीनुसार उपलब्ध होणार आहेत. याद्वारे 'म्हाडा' पारदर्शक कारभाराच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल टाकत असल्याचे 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

नागरिकांचे कार्यालयीन व्यवहार अधिक सोपे, सुलभ करण्याच्या उद्देशाने मुंबईतील म्हाडा मुख्यालयात नागरिक सुविधा केंद्र, अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली, कार्यालय शोधक या सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या असून, म्हाडाचे संकेतस्थळ नवीन व अद्ययावत करण्यात आले आहे. या माध्यमातून म्हाडा कार्यालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार असून नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याचे 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले. १०० दिवस कृती कार्यक्रम व एमएमआर ग्रोथ हब प्रकल्पातील योजनांना गती देण्यासाठी व समन्वय साधण्यासाठी म्हाडामध्ये प्रकल्प व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात आलेल्या म्हाडा नागरिक सुविधा केंद्र ,अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली,कार्यालय शोधक या सुविधा व म्हाडाचे नवीन व अद्ययावत संकेतस्थळ, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष यांचे उद्घाटन 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयस्वाल बोलत होते.

जयस्वाल म्हणाले की, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासातील पुनर्वसन सदनिकांचा लवकरच लाभार्थ्यांना ताबा दिला जाणार आहे. म्हाडा मुंबई मंडळातर्फे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुमारे ५००० सदनिकांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. म्हाडाचे विक्री न झालेल्या सुमारे १९ हजार सदनिका विक्रीसाठी मोहीम राबविण्यात आली असून त्याद्वारे आतापर्यंत सुमारे सात हजार ५०० सदनिकांची विक्री झाल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

जयस्वाल म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे म्हाडाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. जयस्वाल म्हणाले की, नागरिकांकडून म्हाडा मुख्यालयामध्ये येणारे टपाल आता एकाच ठिकाणी म्हणजेच म्हाडा मुख्यालयाच्या गेट नंबर ४ वरील म्हाडा नागरिक सुविधा केंद्रामध्ये स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे म्हाडा कार्यालयात टपाल देण्यासाठी प्रवेशद्वारावर रांग लावणे, कार्यालयात गर्दी करणे, वेगवेगळ्या कार्यालयांचे टपाल त्या त्या कार्यालयात देणे आदी बाबी करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या इमारतीत जाण्याची गरज नाही.

म्हाडाचे संकेतस्थळ अद्ययावत

१०० दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार म्हाडाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले असून सदर संकेतस्थळ वापरण्यास अधिक सुलभ करण्यात आले आहे. संकेतस्थळावरील सर्व माहितीचे अद्ययावतीकरण, सुरक्षितता, लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सेवा अधिसूचित करून ऑनलाईन प्रसिद्ध करणे आदी बाबी करण्यात आलेल्या आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121