देहराडून, उत्तराखंडमधील पवित्र चारधाम यात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर, केदारनाथ मंदिराचे दरवाजे २ मे रोजी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी भक्तांसाठी उघडले जाणार आहेत. या शुभप्रसंगी मंदिर परिसराला विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजवण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही केदारनाथ यात्रेला भक्तांकडून मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. मंदिराच्या भव्य आणि पवित्र वातावरणाला या फुलांच्या सजावटीने अधिकच तेज प्राप्त झाले आहे. मंदिराचा मुख्य गाभारा, प्रवेशद्वार आणि परिसर फुलांच्या सुवासिक माळांनी सजवला गेला आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक प्रशासन आणि मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सेवा आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
'जय भोलेनाथ'चा जयघोष करत भाविकांनी आधीच केदारनाथकडे मोर्चा वळवायला सुरुवात केली आहे. या वर्षीच्या यात्रेला विशेष महत्व असणार आहे, कारण अनेक नव्या सोईसुविधामुळे भाविकांना अधिक चांगला अनुभव मिळणार आहे.