ध्यान कसे करावे? ध्यानाचे प्रकार इत्यादी विषयी आपण विस्तृत माहिती घेतली. आपल्यापैकी बर्याच लोकांना ध्यान म्हणजे काय, याची माहिती नाही. ध्यान हे योगशास्त्रातील अत्युच्च असे अंग आहे.
ध्यानाचे खरे स्वरूप : ब्रह्मैवास्मीती सद्वृत्या निरालंबतया स्थिती:। ध्यान शब्देन विख्याता परमानंददायिनी॥ (अपरोक्षानुभूती-123 आद्य शंकराचार्य.)
अर्थ : मी ब्रह्म आहे, अशा सात्विक वृत्तीमध्ये नित्य असणे आणि सर्व काळ त्या अनुसंधानात राहाणे व अशी ध्यानावस्था अखंडपणे ठेवल्याने परमानंदाची प्राप्ती होणे म्हणजे ध्यान.
आपण धारणेचा अभ्यास करताना वरील आशय निर्माण होण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारला ‘मी कोण?’ त्याचेच उत्तर वरील श्लोकात आहे. ते म्हणजे, ‘मी एक स्वयंपूर्ण आत्मा आहे.’
हेच अवधान, अनुसंधानात्मक करणे म्हणजे ध्यान. योग्य मार्गदर्शक वा गुरूंकडून तो मंत्ररूपी शब्द प्राप्त करून श्वासावर रटत राहिल्याने मनाचा तो भाव निर्माण होऊन वरीलप्रमाणे ध्यानावस्था प्राप्त होणार, हे निश्चित. तो पुस्तकात बघून, वाचून रटता येत नाही. त्याला गुरूंचे अधिष्ठान प्राप्त होणे गरजेचे आहे. ते प्राप्त करताना आपण विनयशील, नम्र, श्रद्धावान असणे आवश्यक आहे.
ध्यानासाठी अधिष्ठान म्हणजे एखाद्या गोष्टीला आधार देणारी किंवा त्यावर आधारलेली गोष्ट. ‘अधिष्ठान’ या शब्दाचा अर्थ दृढ इच्छा किंवा निर्धारदेखील होऊ शकतो. गुरूकडून मिळणारी आध्यात्मिक प्रेरणा किंवा आशीर्वाद इत्यादी अर्थांनी आपले आपण आंतरिक भावनेने किंवा बाह्य स्रोताला ‘गुरू’ संबोधून असे अधिष्ठान प्राप्त करून घ्यावे.
एका विशिष्ट विषयावर पद्धतशीर आणि व्यवस्थित अभ्यास करणे. या अभ्यासातून नवीन ज्ञान मिळवणे, ज्ञानाची अनुभूती होण्यासाठी, ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी तेच तेच अर्थपूर्ण रितीने मनात रटत राहणे. या तीन गोष्टी ध्यानासाठी अत्यावश्यक आहेत. मात्र, भगवंताविषयी अतुट श्रद्धा आणि प्रेम असणे नितांत आवश्यक आहे, जे आपल्या सगुण उपासनेतून प्रकट होत असते. कारण, हे नुसते तंत्र नाही, तर तंत्रासोबत श्रद्धा आणि प्रेम हे मंत्र जपायला पाहिजे.
ध्यानातूनच समाधी अवस्था प्राप्त होते.
समाधी : अष्टांग योगातील आठवे आणि शेवटचे अंग (अंशतः परोक्ष-अनुभवातून)
समाधी म्हणजे काय?
निर्विकार तयावृत्त्या ब्रह्माकार तया पुनः। वृत्ती विस्मरणात सम्यक् समाधिर्ज्ञानसंज्ञकः॥ (अपरोक्षानुभूती-124 श्री आद्य शंकराचार्य)
अर्थ : चित्तवृत्ती कोणत्याही विषयावर जो न देता, मी ब्रह्मच आहे, अशा ब्रह्माकार वृत्तीमध्ये स्थिर राहणे, आणि चित्तावरील सर्व व्यावहारिक संस्कार नाहीसे होणे, हीच समाधी होय. अर्थात, वृत्ति शून्य अंतःकरणाने आत्मज्योतीचा प्रकाश दिसणे व चित्तावरील अन्य संस्कार नष्ट होणे, तोच आत्मसाक्षात्कार व तीच समाधी.
योगात आपण ‘चित्तवृत्ती निरोध’ या स्थितीचे जे वर्णन बघितले, तीच ही स्थिती. त्यासाठी प्राणायामाद्वारे वासना विषयांकडील स्वाभाविक ओढीचा प्रत्याहाराने त्याग करून वैराग्याने, विवेकाने, आत्मानुसंधानाने आणि सत्संगाने मनाची विषय प्रवृत्ती म्हणजेच चंचलता उत्तरोत्तर (शनैः शनैः) कमी होत जाऊन कुंभकाच्या सरावाने मन विषयपराङ्मुख करून आत्म्याच्या विशुद्ध स्वरूप चिंतनात ठेवता आले, तर दीर्घकाळ मनशांती लाभते व प्रयत्नाशिवाय केवल कुंभक (प्राण-मन-स्तंभन) आपोआपच साधतो, जिथे शरीर निश्चल, निर्विकार, निश्चेष्ट, निर्जीव असे भासते, ती समाधी अवस्था. गीतेत या स्थितीचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे,
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः।
निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति॥ (श्रीमद्भगवद्गीता अध्याय-2 श्लोक-71)
अर्थ : जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शांती मिळते.
हरि ओम् तत्सत्!
योगसंदेश
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत.)
9730014665