गौतम बुद्धांचे जीवनचरित्र, इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान आजसुद्धा अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले आहे. इतिहासातील महान व्यक्तींच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, त्यांच्या विचारसंचितासोबतच त्यांच्या भौतिक जीवनाच्या पाऊलखुणांनासुद्धा तितकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातल्या प्रत्येक धर्मात या पाऊलखुणा जपल्या जातात. या पाऊलखुणा म्हणजे त्या त्या धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान असते.
श्रीलंकेतील कांदी या शहरात गौतम बुद्धांच्या दातांचे अवशेष प्रदर्शनासाठी मांडण्यात आले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमार दिसानायके यांच्या आग्रहानंतर, 16 वर्षांनी पहिल्यांदाच हे प्रदर्शन सुरू करण्यात आले. या स्थळाचे पावित्र्य आणि सुरक्षा राखण्यासाठी या ठिकाणी, कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांमधून मिळालेल्या माहितीनुसार,1590 साली हा अनमोल ठेवा श्रीलंकेत आला. सुरुवातीच्या काळात हे अवशेष लोकदर्शनासाठी उपलब्ध नव्हते. हे अवशेष जिथे ठेवण्यात आले, तिथे एका भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिरात एका गर्भगृहाचीही स्थापना करण्यात आली. या गर्भगृहातच बुद्धांच्या दाताचे अवशेष जपून ठेवण्यात आले आहेत. पूर्वी काही निवडक बुद्ध धर्मातील साधकांनाच इथे प्रवेश दिला जात असे. सध्याच्या काळात मात्र आता, सर्व भाविकांना ठराविक अंतरावरून हे अवशेष बघता येतात.
प्रदर्शनासंदर्भात बातमी ज्यावेळेस लोकांना समजली, त्यानंतर श्रद्धेपोटी असंख्य भाविकांनी या मंदिराला भेट देऊन हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा बघण्यासाठी गर्दी केली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दहा किमीपर्यंतची मोठी रांग दर्शनासाठी सुरू होती. चार लाखांपेक्षा अधिक लोक या रांगेत उभे होते. अर्थातच, या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस आणि प्रशासनावर येऊन पडली. माध्यमांशी संवाद साधताना स्थानिक प्रशासनातील एक अधिकारी म्हणाले की, “इथे येणार्या लोकांची संख्या पाहता, कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, यासाठी आम्ही तत्पर आहोत.” रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, सदर ठिकाणावर असलेली लोकसंख्या बघता कांदीला जाणार्या अधिकच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण 17 देशांच्या राजदूतांना या प्रदर्शनाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
अशातच या सार्या भव्य प्रदर्शनात, दुर्दैवाने मीठाचा खडा पडला. बुद्धांच्या दातांचे अवशेष दाखवणारा एक फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाला. वास्तविक हा फोटो खरा आहे की नाही, यावरच सध्या चर्चा सुरू आहे. हा फोटो जर खरा असेल, तर सुरक्षा यंत्रणेतील ही भली मोठी त्रुटी म्हणावी लागेल, असे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. अद्याप याबद्दलचे सत्य बाहेर आले नसून, केवळ चर्चांचाच फड रंगला आहे असे दिसते. खरोखरच फोटो काढला गेला आहे की, डिजिटल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याची निर्मिती केली गेली आहे, हे कोडे सुटणे जास्त गरजेचे आहे.
गौतम बुद्धांच्या दातांचे अवशेष दाखवणारे हे मंदिर म्हणजे श्रीलंकेतील नागरिकांचे श्रद्धास्थान तर आहेच, परंतु त्यापलीकडे जाऊन ते श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. भारतात जन्मलेला बौद्ध विचारांचा वारसा, साता समुद्रापार गेला. हा वारसा तिथल्या माती आणि माणसांसोबत एकजीव झाला. त्यामुळे तिथल्या लोकांनासुद्धा जगण्याची एक नवी दृष्टी मिळाली.
आजमितीला आपण जेव्हा संस्कृतीच्या पाऊलखुणांचा वेध घेतो, तेव्हा जगाच्या पाठीवर अशा असंख्य नोंदी आपल्याला आढळून येतात. एका विशिष्ट जागी जन्माला आलेला धर्म, पंथ, आचार, विचार, काळाच्या ओघात कसा वैश्विक होत जातो, हा प्रवास उलगडणे ही प्रक्रियाच मुळी अद्भुत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मात्र काही धोकेसुद्धा यामुळे आपल्या समोर येतात. इतिहासाचे वास्तव काय, तसेच कृत्रिमरित्या निर्माण केलेली प्रतिमा काय, यांमधील अंतर शोधून काढण्याचे कसब आपल्याला विकसित करावे लागेल. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इतिहासाच्या आकलनासाठी पोषक वातावरण तयार होईल, अशी आशा काहींनी व्यक्त केली होती. मात्र, इतिहासाच्या अभ्यासासंदर्भातदेखील घ्यावी लागणारी काळजी, यानिमित्ताने अभ्यासकांच्या लक्षात आली आहे.