उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
28-Apr-2025
Total Views | 7
डोंबिवली (Eknath Shinde):“पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शी आणि या हल्ल्यात मृतांच्या कुटुंबीयांकडून ऐकताना अंगावर शहारे आले,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. बालाजी किणीकर, आ. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “दहशतवादी हल्ला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेत डोंबिवलीतील जोशी, लेले आणि मोने हे तिघे गेले आहेत. हे तिघेही नातेवाईकच होते. ही तिन्ही कुटुंबे काश्मीरला पर्यटनासाठी गेली होती. या घरांतील कर्ते पुरुष गेले आहेत. अत्यंत दुःखद घटना आहे. शिवसैनिक राजेश कदम यांच्या परिवारातील लेले हे होते. त्यामुळे शेवटी हे दुःख आपल्या परिवारातील आहे. त्यांना जेवढे सहकार्य करता येईल. त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू. शिक्षणाचा प्रश्न असेल, तर त्यासाठी सहकार्य करू.” असे ते म्हणाले.
पीडित कुटुंबांसोबत महायुती
सरकार : एकनाथ शिंदे
“जोशी यांना माझ्याविषयी खूप आपुलकी होती. ते मला फॉलो करत असत, हे आता त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांगितले. त्यामुळे ते आमच्या परिवारातीलच आहेत. खासदाराची टीम घटनेच्या दुसर्या दिवशी घटनास्थळी पोहोचली होती. मी त्यानंतर गेलो. कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये. या कुटुंबांच्या मागे शासन, शिवसेना, मुख्यमंत्री आणि महायुती आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विरोधकांच्या टीकेबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी “आज या विषयावर मला बोलायचे नाही,” असे सांगितले.
कुटुंबीयांना दिला धीर
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर शिवसेना पर्यटकांच्या मदतीला तत्काळ धावून गेली. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम त्वरित जम्मू-काश्मीरला रवाना झाली होती. मृतांमध्ये तीन डोंबिवलीकरांचा समावेश होता. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान, एकनाथ शिंदे स्वतः जम्मू-काश्मीरला गेले आणि सर्व पर्यटकांना परत आणण्याची कामगिरी त्यांनी केली. रविवारी त्यांनी या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत धीर दिला. “या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार वार्यावर सोडणार नाही. या कुटुंबातील मुलांच्या शिक्षण, नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या कुटुंबीयांना धीर देताना या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल,” असे सांगितले.