आता मच्छिमारांची गणना होणार 'या' अॅपच्या माध्यमातून

    28-Apr-2025
Total Views | 23
App VyAS-NAV


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
१२ लाख मच्छीमार कुटुंबांचा समावेश असणाऱ्या देशाच्या पाचव्या राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणनेसाठी VyAS-NAV डिजिटल अॅप वापरण्यात येणार आहे (App VyAS-NAV). डिजिटल माध्यमाद्वारे डेटा संकलन करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या अॅपमुळे गणनेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. (App VyAS-NAV)
 
 
 
 
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या वित्तीय सहाय्याने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पाचवी राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणना केली जाणार आहे. किनारपट्टीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १२ लाख मच्छीमार कुटुंबांचा समावेश असलेली ही व्यापक माहिती संकलनाची प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान ४५ दिवसांमध्ये ही गणना केली जाईल. या गणनेसाठी VyAS-NAV नामक अॅप विकसित करण्यात आले आहे. गणनेसाठी पारंपरिक पद्धतीतून अॅप-आधारित डिजिटल प्रणालीकडे होणारा हा मोठा बदल आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी मुंबईत झालेल्या राज्य मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान या अॅपचे उद्घाटन केले. याबैठकीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध योजनांची अंमलबजावणी आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
 
 
 
'सीएमएफआरआय'ने विशेषतः मोबाईल आणि टॅबलेटवर आधारित हे अॅप विकसित केले असून त्याद्वारे डेटा संकलन सुलभ होईल. त्याचबरोबर मानवी चुका कमी करून धोरणात्मक उपयोगासाठी डेटा संकलन जलदगतीने पूर्ण करता येईल. या अॅपच्या माध्यमातून मासेमारी गावे, मासेमारी केंद्रे व मत्स्य बंदरांची माहिती पडताळणीसाठी वापरण्यात येईल. यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम स्रोतांद्वारे गावांचा संक्षिप्त अहवाल तयार करण्याची क्षमता आहे. या अॅपच्या पर्यवेक्षणाचे काम सीएमएफआरआय, भारतीय मासेमारी सर्वेक्षण विभाग आणि किनारी राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचारी करतील. मच्छिमारांच्या लोकसंख्यात्मक आणि सामाजिक-आर्थिक स्थिती, पर्यायी उपजीविका आणि सरकारी योजनांचा प्रभाव या सर्व गोष्टी ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मव्दारे नोंदविल्या जातील.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121