"वडेट्टीवारांचं विधान म्हणजे एकप्रकारे शत्रूंना..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
28-Apr-2025
Total Views | 43
मुंबई : विजय वडेट्टीवारांचे विधान म्हणजे एकप्रकारे शत्रूंना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अशा प्रकारची वक्तव्ये करून या हल्ल्यात जे लोक मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सगळ्यांनी नातेवाईकांचे म्हणणे माध्यमांमध्ये दाखवले आहे. ज्यांच्यासमोर मारले आहे त्या नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तिथे वडेट्टीवार नव्हते. त्यामुळे इथे बसून अशा प्रकारचे वक्तव्य करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणावा की, आणखी काही हे कळत नाही. या वक्तव्यामुळे मृतांचे नातेवाईक कधीही त्यांना माफ करू शकत नाही. असे वक्तव्य करणे म्हणजे एकप्रकारे शत्रूंना प्रोत्साहन देण्यासारखे आहे," असे ते म्हणाले.
ईडी कार्यालयाला आगीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ईडीच्या कार्यालयातील प्रत्येक पेपर सुरक्षित आहे. त्यामुळे या आगीमुळे कुठल्याही केसला किंवा कागदाला धक्का लागलेला नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.