काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? वडेट्टीवारांच्या विधानावर मंत्री बावनकुळेंचा सवाल

    28-Apr-2025
Total Views |
 
Bawankule & Wadettivar
 
मुंबई : काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? असा संतप्त सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादाला कोणतीही जात, धर्म नसतो. दहशतवाद्यांना लोकांकडे जाऊन त्यांच्या कानात त्यांचा धर्म कोणता आहे, हे विचारण्यासाठी वेळ असतो का? असे वादग्रस्त विधान केले होते. यावर आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत? दहशतवाद्याला जात-धर्म नसतो, असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?" असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  "वडेट्टीवारांचं विधान म्हणजे एकप्रकारे शत्रूंना..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
 
हे देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण!
 
ते पुढे म्हणाले की, "विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाने वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत, जखमांवर मीठ चोळत राजकारण करत आहेत, जनता हे विसरणार नाही," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.