- केंद्र सरकारने झापले, भविष्यातील वार्तांकनावर लक्ष ठेवण्याचा इशारा
- पाकिस्तानी युट्युब चॅनल्सवरही बंदी
28-Apr-2025
Total Views | 24
नवी दिल्ली, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ‘बीबीसी’ या ब्रिटीश सरकार प्रायोजित वृत्तसंस्थेच्या वृत्तांकनावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे, ज्यामध्ये 'दहशतवादी' ऐवजी 'मिलिटंटस्' हा शब्द वापरण्यात आला होता. सरकारने ‘बीबीसी’ इंडियाच्या प्रमुखांना पत्र लिहून झापले असून भविष्यातील वृत्तांकनावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने ‘बीबीसी’च्या भारतातील कामकाजाची जबाबदारी असलेल्या जॅकी मार्टिन यांना एक पत्र लिहिले आहे. ‘बीबीसी’ने ‘पाकिस्तान सस्पेंड्स वीजा फॉर इंडियंस आफ्टर डेडली कश्मीर अटॅक ऑन टूरिस्ट्' अशा मथळ्याची बातमी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी प्रकाशित केली होती. बातम्यांमध्ये 'दहशतवाद्यांसाठी' 'मिलिटंट' हा शब्द वापरल्याबद्दल केंद्र सरकारने गंभीर आक्षेप घेतला आहे. 'मिलिटंट' हा शब्द दहशतवाद्यांच्या गांभीर्याला कमी लेखतो, असे केंद्र सरकारने ‘बीबीसी’ला सुनावले आहे. त्याचप्रमाणे ‘बीबीसी’च्या भविष्यातील वार्तांकनावर बारकाईन लक्ष ठेवले जाणार असल्याचाही इशारा केंद्र सरकारने दिला आहे.
त्याचप्रमाणे पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल केंद्र सरकारने सोमवारी १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्याची घोषणा केली. एकत्रितपणे, या चॅनेलचे ६३ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर आहेत. गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.
बंदी घातलेल्या यूट्यूब चॅनेलच्या यादीत डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज आणि जिओ न्यूज यासारख्या प्रमुख चॅनेलचा समावेश आहे. इतर यूट्यूब चॅनेलमध्ये इरशा भट्टी, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, जीएनएन, उजैर क्रिकेट, उमर चीमा एक्सक्लुझिव्ह, अस्मा सिराजी, मुजीब फारूख, सुनो न्यूज आणि रझी नामा यांचा समावेश आहे.