गिरीश प्रभुणे हे नाव माहीत नाही, असा क्वचितच कोणी असेल. गिरीश प्रभुणे यांची ओळखच त्यांनी केलेले कार्य आहे. त्यांच्या कार्याने समाजातील भटक्या-विमुक्त जमातीतील ओळख मिळाली आणि भारतमातेची लेकरे पुन्हा तिच्याशी मनाने जोडली गेली. हे सारे करत असताना शांतता आणि कार्याचा गाजावाजा न करण्याचा नियम गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर पाळला. त्यांच्यवरील पुस्तकाचे केलेले हे परीक्षण...
गिरीश प्रभुणे म्हणजे अवघा महाराष्ट्र पालथा घालत, भटक्या-विमुक्तांचा जीवनसंघर्ष टिपणारे, त्यांचे अश्रू पुसणारे आणि त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी जीवाचे रान करणारे कर्मयोगी. त्यांच्या या कार्याचा ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवही झाला आहे. दाहक समाजवास्तवाला संयमाने पण ठामपणे भिडणार्या गिरीश यांनी, स्वतः आपल्या अनुभवांवर वेळोवेळी भरपूर लेखन केले आहे. परंतु, त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे टप्पे कालानुक्रमाने शब्दबद्ध होण्याची आवश्यकता होती, ती रवींद्र गोळे लिखित ‘गिरीश प्रभुणे : जसे कळले तसे’ या पुस्तकामुळे पूर्ण झाली.
हे पुस्तक म्हणजे रूढार्थाने चरित्र नाही. गोळे यांनी आपल्या पुस्तकाला ‘विचार चरित्र’ असे संबोधले आहे. गिरीश यांनी ‘चापेकर स्मारक समिती’, ‘ग्रामायण’, ‘यमगरवाडी’ आणि ‘समरसता गुरुकुलम’ असे प्रकल्प उभे करताना त्यामागचे चिंतन काय होते, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा भक्कम आधार कसा होता, हे गोळे यांनी या पुस्तकातून उलगडून दाखवले आहे.
तरुणपणी काही काळ संघाचा प्रचारक म्हणून कार्य केल्यानंतर, चिंचवड येथे आलेल्या गिरीश यांचे मन क्रांतिवीर चापकेर यांचा विपन्नावस्थेत असलेला वाडा पाहून उद्विग्न झाले. जिथे क्रांतिकार्याची धुळाक्षरे उमटली, तिथे आता दारूडे, जुगारी यांचे अड्डे जमलेले पाहून त्यांना क्लेश होत. त्यातूनच मग त्यांनी ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ उभी केली. त्या माध्यमातून वाड्याची समाजकंटकांच्या विळख्यातून सुटका करणे, वाडा पुन्हा दिमाखात उभा करणे, तिथे शाळा सुरू होणे अशी एकापाठोपाठ विधायक कार्ये घडत गेली.
पुढे ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तसेच, निमगाव म्हाळुंगी येथे माजगावकरांच्या कल्पनेतून साकारलेल्या, ‘ग्रामायण’ या ग्रामविकसन प्रकल्पामुळे समाजाच्या तळागाळात वावरण्याचा अनुभव घेता आला. यातूनच त्यांचातील समरसतेचा भाव अधिक पक्का होत गेला. पुढे सोलापूरजवळ यमगरवाडी येथे पारध्यांच्या मुलांसाठी सुरू केलेली शाळा आणि 2000 सालच्या दशकात चिंचवड येथे, भटक्या-विमुक्तांसाठी सुरू केलेली कौशल्याधारित शाळा आणि वसतिगृह यामधून त्यांनी, अनेक आव्हानांचा सामना करत अनोखे प्रयोग केले. हा प्रवास या पुस्तकात वाचत असताना, गिरीश एका आयुष्यात नक्की किती आयुष्य जगले असतील, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
गिरीश यांच्या प्रवासातली सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे, त्यांनी कायमच ठराविक वर्तुळाबाहेर पडून सर्वांशी सतत संपर्क आणि संवाद ठेवला; अगदी संघाच्या कट्टर विरोधकांनाही त्यांनी, संवादातून आणि आपल्या समाजकार्याच्या प्रत्यक्ष दर्शनातून आपलेसे केले. विरोधकांशीही संवादाची दारे खुली ठेवणार्या गिरीश यांनी वेळ पडली, तेव्हा मात्र कविसंमेलनात भारतमातेबद्दल अपशब्द काढणार्या विरोधकाला तिथल्या तिथे कसे उत्तर दिले आणि त्यातून कार्यकर्त्यांना नकळत कसा संदेश दिला, याचीही गोळे यांनी सांगितलेली आठवण चिंतनीय आहे.
गिरीश यांच्या आयुष्यातले सर्वांत आव्हानात्मक कार्य म्हणजे, भटक्या-विमुक्तांसाठी केलेले कार्य. ज्यांना माणूस म्हणून काहीही किंमत नाही अशा समाजापुढच्या समस्या जाणून घेणे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी व्यवस्थेशी संघर्ष करणे आणि हे करत असताना विद्रोही, चिथावणीखोर फुटीरतेची भाषा न करणे, हे गिरीश यांच्या कार्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. संघविचार रूजलेला कार्यकर्ता समस्येचे केवळ सनसनाटीकरण न करता, त्याचे उत्तर कसे शोधून काढतो आणि पीडितांच्या मनामध्ये समाजाबद्दल कटुता न पेरता समन्वयाची दृष्टी कशी विकसित करतो, हे गिरीश यांच्याकडे पाहून कळते. या सामाजिक लढ्याचे स्वरूप नकारार्थी नाही; त्यामुळे हा सुसंवादी लढा असे आहे, असे म्हणावेसे वाटते.
गोळे यांनी गिरीश यांच्या कार्याचे हे सार, नेमक्या शब्दांमध्ये मांडले आहे. ‘यमगरवाडी’च्या प्रयोगाबद्दल ते लिहितात, सामाजिक जाणिवेतून भटक्या-विमुक्त जातींची उन्नती घडवून आणण्यासाठी जो संघप्रयोग झाला, त्याला आता दहा-12 वर्षे झाली होती आणि त्याचे परिणाम दिसून येऊ लागले होते. ज्यांना कोणतीही ओळख नाही, अशा भटक्या समाजातील मुले-मुली शिक्षण घेत होती, तर त्या त्या समाजातील तरुण, कार्यकर्ते म्हणून काम करू लागले होते. गिरीश प्रभुणे यांनी केलेल्या पेरणीची ती फलश्रुती होती. ‘आपण सारे हिंदू, आपल्या सर्वांचे पूर्वज एकच. आपण सारेजण भारतमातेचे पुत्र’ ही भावजागृती झाली होती आणि नकार, विद्रोह यांना थारा न देता ‘बंधुभाव’ हाच धर्म मानणारी जनचळवळ विकसित झाली. या चळवळीचे नेतृत्व गिरीश प्रभुणे करत होते.
गिरीश यांच्या आधीही भटक्यांच्या समस्येला वाचा फोडण्याचे काम झाले होते, त्यावर साहित्यही निर्माण झाले होते. पण, ते प्रयत्न एका मर्यादेबाहेर यशस्वी होऊ शकले नाही. त्याची गोळेंनी केलेली मीमांसा महत्त्वाची आहे. ते लिहितात, या चळवळीतील काही कार्यकर्त्यांची आत्मकथने प्रकाशित झाली. ‘उपरा’, ‘उचल्या’, ‘भटका’, ‘तीन दगडांची आत्मकथा’ ही त्यापैकी महत्त्वाची आत्मकथने होत. या आत्मकथनामधून त्या त्या समाजाचे दुःख व दैन्य वेशीवर टांगले. समाजाचे दुःख, दैन्य मांडताना, समाजाचा वैभवशाली इतिहास मात्र झाकोळला गेला. कोणत्याही कार्यकर्त्या लेखकाने, आम्ही कोण? आमचा वारसा काय? या देशासाठी, या समाजासाठी आमच्या पूर्वजांनी कोणता अतुलनीय पराक्रम केला आहे? या गोष्टींची दखल घेतली गेली नाही, हे समाजाचे दुर्दैव. आत्मकथन या लेखनप्रकारातून, व्यक्तिकेंद्रित लेखनातून समाजाचा ताणाबाणा मांडण्याचा प्रयत्न केला गेला. या लेखनामुळे चळवळीला बळ मिळाले खरे पण, दुर्दैवाने भटक्या-विमुक्त समूहाचा समग्रपणे विचार करणारी एक संघटना निर्माण होऊ शकली नाही.
गोळे यांनी केलेली ही मीमांसा पाहता, गिरीश यांच्या कार्याचे वेगळेपण उठून दिसते. त्यांनी या समाजाच्या समस्या फक्त समोर आणल्या नाहीत, तर त्या समाजाचा गौरवशाली इतिहासही ठामपणे मांडला. ‘आपण वेगळे आहोत’ असा विचार रूजवण्याऐवजी आपणही एका तेजस्वी परंपरेचे पाईक आहोत, आपणही याच मातृभूमीची लेकरे आहोत, ही भावना समाजामध्ये रूजू लागली.
भटक्या-विमुक्तांविषयी कुतूहल असणारा, लहान मुलगा ते भटक्या-विमुक्तांच्या समस्यांवर उपाय शोधणारा समाजचिंतक, असा हा दीर्घ प्रवास रवींद्र गोळे यांनी थोडक्यात पण सर्व महत्त्वाच्या टप्प्यांना स्पर्श करत शब्दबद्ध केला आहे. एखादी व्यक्ती वाचन, लेखन, चिंतन आणि कृतीतूनही जेव्हा समाजाचाच विचार करते, तेव्हा तिच्या हातून किती विलक्षण कार्य घडते याचे दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. समाजाविषयी आस्था असणार्या प्रत्येकाने ते वाचायलाच हवे.
पुस्तकाचे नाव : गिरीश प्रभुणे - जसे कळले तसे
लेखक : रवींद्र गोळे
प्रकाशक : विवेक प्रकाशन
मूल्य : 225
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858