ज्योती कपिले यांच्या ललित निबंधांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी आपल्या लिखाणात समाजमनाशी सहजसंवाद साधला आहे. त्यांच्या लिखाणातील हा साधेपणा हेच त्यांच्या अभिव्यक्तीचे बलस्थान आहे.
लेखक होण्याची प्रक्रिया ‘वाचन’ या कृतीशी जोडलेली असते. वाचनामुळे आपल्या आकलनाच्या कक्षा रुंदावतात. जसे जसे आपले वाचन समृद्ध होत जाते, तसे तसे जगाकडे बघण्याचा, आपला भोवताल समजून घेण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला उमगत जातो. हे उमगणे जेव्हा आपण कोर्या कागदावर उतरवतो, तेव्हा शब्दांचे रूपांतर तरल अभिव्यक्तीमध्ये होते. याच अभिव्यक्तीचा उत्तम नमुना म्हणजे, ज्योती कपिले यांचे ललित लेखसंग्रह. कवयित्री, लेखिका, प्रकाशक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मुशाफिरी करणार्या ज्योती कपिले यांचे साहित्याशी असलेले प्रेमाचे ऋणुबंध, त्यांच्या ललित लेखांमधून आपल्याला वाचायला मिळतात. त्यांचे लेख हे निव्वळ लेख नसून ती एक अनुभूती आहे, याची प्रचिती वाचकाला प्रथमदर्शनीच येते.
ज्योती कपिले यांच्या ‘मनभावन’ या ललित लेखसंग्रहामध्ये, निसर्गाशी असलेले त्यांचे व त्यांच्या लेखणीचे घट्ट नाते आपल्याला अनुभवायला मिळते. शांताबाई शेळके यांच्या ‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा’ या गीतातील ‘मनभावन’ हा शब्द त्यांना भावला आणि त्यांची अनुभूती शब्दरूपात साकार झाली. वसंत ऋतूचा उत्सव असो किंवा शिशिर ऋतूची थंडी, या सगळ्या ऋतूंचा आनंदोत्सव आपल्याला या लेखांमध्ये अनुभवयाला मिळतो. या सौंदर्योत्सवाचे आनंद घेऊन, आपल्या मनातही वसंत फुलविता आला पाहिजे, असा प्रेमाचा संदेश त्यांच्या ग्रंथामधून आपल्याला देतात. भोवतालच्या निसर्गाशी एकरूप होताना, अगदी सहजरित्या त्यांच्या या लेखामध्ये आपल्याला ज्ञानदेवांचा पिंपळ भेटतो. गुलमोहराची रसयात्रा अनुभवताना, आपण वाचक नकळत हा बहर आपल्यामध्ये समावून घेतो. ‘मनभावन’मधील ललित लेखांचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये त्यांच्या सहसंवेदनांचा आविष्कार आपल्याला अनुभवायला मिळतो.
ज्योती कपिले यांच्या ललित लेखांमध्ये, जसे आपल्याला निसर्गाचा अमृतानुभव येतो, त्याचसोबत त्यांचे लेख म्हणजे वास्तवाचे समग्र आकलन आहे, हेसुद्धा आपल्याला लक्षात येते. ‘मोगरा फुलला’ या त्यांच्या लेखसंग्रहात आपल्याला या गोष्टीची प्रचिती येते. या लेखांमध्ये व्यक्तीच्या कार्याचा गौरव तर आहेच, परंतु सोबतच मनाला उभारी देणार्या जीवनातील, हृद्य आठवणीसुद्धा आहेत. गांधी विचारांना प्रमाण मानून समाजासाठी आपले जीवन व्यतीत करणार्या, श्रीनिवास माधव देशपांडे यांची जीवनकहाणी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी अशीच. मराठी साहित्यातील कोकणचे रत्न ‘मधु मंगेश कर्णिक’ यांच्या कारकिर्दीचा गौरव करणारा लेखसुद्धा, आदरयुक्त भावनेतून लिहिला आहेे. हल्ली परीक्षा म्हटले की विद्यार्थी आणि पालक दोघांच्याही अंगावर सरसरून काटा उभा राहतो, याच परीक्षेचे परीक्षण ज्योती कपिले यांनी खुमासदार पद्धतीने केले आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात कृतज्ञता व्यक्त करायचे, आपल्याकडून राहून जाते. कृतज्ञता ही केवळ एक भावना नसून, तो देखील एक संवाद आहे हे लेखिकेने वाचकांना समजवून सांगितले आहे. आषाढाचा पहिला दिवस आणि कालिदासाचे मेघदूत यावर भाष्य करताना, त्यांचा रसिक दृष्टिकोन लक्षात येतो.
ज्योती कपिले यांच्या लेखनामधून, त्यांनी एकाप्रकारे समाजमनाचा ठाव घेतला आहे. आपल्या अवतीभोवती घडणार्या घटनांचे चिंतन, मनन केल्यानंतरच त्या व्यक्त झाल्या आहेत. निसर्गाशी एकरूप होण्याची नेमकी गरज काय? आजच्या जगात या एकत्वाचे सुरू असलेले प्रयोग, याचा आढावा त्यांनी आपल्या ‘पसायदान’ या लेखाच्या माध्यमातून घेतला आहे. सिनेमाच्या अभिव्यक्तीवर भाष्य करणे असो किंवा साहित्य संमेलनात लहान मुलांच्या सहभागाबद्दल केलेले लिखाण असो, यामध्ये त्यांनी आपला भोवताल कवेत घेण्याचा प्रयत्न समर्थपणे केला. यामध्ये ललित निबंधाच्या विस्तारलेल्या कक्षा लक्षात येतात. लेखिकेने आपल्या भोवतालावर भाष्य केले आहे. परंतु, त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या भोवतालाकडे, एका निर्मळ नजरेने पाहिले आहे. दि. 22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासात, सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. राम मंदिराची स्वप्नपूर्ती झाल्यानंतर अयोध्यानगरीचे आत्मवृत्त मांडताना, ज्योती कपिले यांनी इतिहासातला गौरवशाली वारसा तसेच अयोध्यानगरीचा प्रवास अगदी समर्थपणे मांडला आहे.
या दोन्ही ललित लेखसंग्रहाचे आकर्षण म्हणजे त्यांची मुखपृष्ठे. ‘मनभावन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले आहे बी. जी. लिमये यांनी, तसेच ‘मोगरा फुलला’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले आहे, चित्रकार निरंजना शहा यांनी. चित्रांच्या माध्यमातून साकारलेला निसर्गाचा बहर, विलोभनीय म्हणावा लागेल. ज्योती कपिले यांचे ललित निबंध म्हणजे, वाचकांशी आणि एकूण समाजमनाशी केलेला एक संवाद आहे. हा संवाद उपदेशपार नसून, भावनिक आहे. या निबंधांमध्ये एक भावनिक तरलता आहे, ही तरलता अनुभवण्यासाठी हे दोन्ही लेखसंग्रह वाचायला हवेत. ज्योती कपिले यांचे लेख वाचताना, राणा गन्नौरी यांचा एक शेर आठवतो,
खुद तराशना पत्थर और खुदा बना लेना
आदमी को आता हैं क्या से क्या बना लेना
प्रतिभाशाली साहित्याची निर्मिती या तराशण्याच्या प्रक्रियेतूनच होते. या सर्जनशील प्रक्रियेचा मागोवा घेण्यासाठी, ज्योती कपिले यांचे दोन्ही लेखसंग्रह चोखंदळ वाचकांनी आवर्जून वाचावे.
पुस्तकाचे नाव - मोगरा फुलला (ललित लेखसंग्रह)
लेखिका - ज्योती कपिले
पुस्तकाचे मूल्य - 250/-
प्रकाशन - जे के मीडिया
पुस्तकाचे नाव - मनभावन
लेखिका - ज्योती कपिले
पुस्तकाचे मूल्य - 150/-
प्रकाशन - जे के मीडिया