भारतभूमीत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. या राजांचा प्रभाव देशाच्या संस्कृती, स्थापत्य, कला अशा विविध क्षेत्रांवर दिसतो. यामध्ये राजा भोज यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. त्यांनी ज्योतिष, योग, धर्मशास्त्र, वैद्यक, शिल्पशास्त्र, संगीत क्षेत्राला दिलेले योगदान अतुलनीय असेच. या भोज राजांचे वैभव असलेले भोजेश्वर मंदिर आजही त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाची साक्ष देते. या मंदिराचा घेतलेला हा आढावा...
इसवी सनाच्या 11व्या शतकात परमार नावाच्या पराक्रमी राजघराण्याचा राजा सिंधूराज याचा मुलगा म्हणजे राजा भोज. आपल्या वडिलांनंतर अवघ्या 15-20 वर्षांच्या वयात हा सिंहासनावर बसला. भोजराजाचे वय, त्याला दिग्विजयापासून रोखू शकले नाही. लहान वयातच, भारताचा खूप मोठा भूभाग या राजाने आपल्या अमलाखाली आणला. भोज राजा हा जेवढा पराक्रमी होता, तेवढाच तो विद्वानदेखील होता. ज्योतिष, योग, धर्मशास्त्र, वैद्यक, शिल्पशास्त्र, संगीत इत्यादी अनेक विषयांमध्ये, त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. भोजराजाने अनेक मोठी मंदिरे, कुंड, महाल, विद्यापीठे यांची निर्मिती केली. या भोजराजच्या कामाची व्याप्ती सांगणारे, त्याची महती गाणारे अनेक शिलालेख आणि ताम्रपटदेखील उपलब्ध आहेत. याविषयी एक सुंदर श्लोक आला आहे.
अस्य श्रीभोजराजस्य द्वयमेव सुदुर्लभम्।
शत्रूणां शासनैर्लोहं ताम्रं शासनपत्रकैः॥
याचा अर्थ असा होतो, श्री भोजराजाच्या राज्यात दोन वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. शत्रूंना श्रृंखलाबद्ध करण्यात लोखंड संपले व ताम्रपत्रे लिहिण्यात तांबे संपले. अशा पराक्रमी, दानशूर आणि विद्वान राजाने एक स्वप्न बघितले, भव्य अशा भोजेश्वर मंदिराचे!
मागच्या लेखामध्ये बघितलेल्या भीमबेटका जागतिक वारसा स्थळापासून अवघ्या 25 किमी अंतरावर, हे भोजपूर नावाचे गाव आहे. इथे भोजराजाने एका प्रचंड मोठ्या तलावाची निर्मिती केली. हा बांधलेला भव्य तलाव, माळव्याचा सुलतान होशंगशहा यांनी ढासळून पाडला. असे म्हणतात की, तिथून बाहेर पडलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी, कित्येक महिने जावे लागले. आजही तिथे या तलावाचे दगडी अवशेष बघायला मिळतात. इथून जवळच असलेल्या टेकडीवर भोजेश्वर मंदिराच्या निर्मितीची तयारी झाली.
40 फुटांच्या भव्य दिव्य खांबांच्या आधाराने, या मंदिराचे गर्भगृह उभे राहिले. या द्वारशाखेवर दोन्ही बाजूला कीर्तीमुख आणि त्यातून खाली येणार्या साखळीला बांधलेल्या घंटा कोरलेल्या आहेत. द्वारशाखेच्या सर्वांत खालच्या भागात गंगा, यमुना, चवरीधारिणी, शिव, भैरव अशा वेगवेगळ्या प्रतिमादेखील कोरलेल्या आहेत. या प्रतिमांसाठी वालूकाश्म वापरलेला दिसतो. गर्भगृहात भारतातल्या मोठ्या शिवलिंगांपैकी एक शिवलिंग उभारले गेले. हे शिवलिंग साधारण 18 फूट उंच असून, साडेसात फुटांचा याचा परिघ आहे. या गर्भगृहाचे छत घुमटाकार असून, त्या कालखंडातल्या मंदिरांपेक्षा हे अतिशय वेगळे आहे. या भल्या मोठ्या मंदिराचे आज फक्त गर्भगृह शिल्लक आहे. मंदिराच्या शिखराचा भाग, गर्भगृहाच्या पुढे असणार्या मंडपाचा भाग हे कधीच पूर्ण झाले नाहीत. हे मंदिर अपूर्ण का राहिले, याची कारणे मात्र आज आपल्याला माहीत नाहीत. पण, हे मंदिर जर त्याच्या पूर्ण अवस्थेत उभे राहिले असते तर, आज जगातल्या सर्वोत्तम मंदिरांपैकी एक मंदिर नक्कीच ठरले असते.
या जागेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, मंदिर बांधकाम करताना जी वेगवेगळी बांधकाम तंत्र वापरली जायची, त्याचे पुरावे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मंदिराला लागूनच एक उतरण किंवा रॅम्प आपल्याला दिसतो. बांधकामासाठी लागणारी दगड वाहून नेऊन, एकमेकांवरती रचून ठेवण्यासाठी या उतरणीचा वापर केला जात असे. जेवढे मोठे मंदिर तेवढा मोठा रॅम्प.
मंदिरांच्या बाबतीमध्ये एक प्रश्न कायम आपल्या सर्वांना पडत असेल की, मंदिरे बांधताना त्या स्थपतींनी याचे आरेखन (प्लॅन) कशा पद्धतीने केले असेल?
या मंदिरापासून डावीकडे जो कातळाचा भाग आहे, त्या भागावर चालत जाऊन निरखून बघितल्यावर मंदिराचे दरवाजे, खांब, खिडक्या, यांची वेगवेगळी आरेखने आपल्याला बघायला मिळतात. मंदिर स्थापत्यच्या दृष्टिकोनातून, आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा जिवंत पुरावा तिथे बघायला आज उपलब्ध आहे. पण, दुर्दैवाने अशा ठिकाणी आपली नावे लिहिणे, खाडाखोड करणे, इत्यादी सवयींमुळे हा वारसा धूसर होत चालला आहे.
मुख्य मंदिरासाठी तयार करण्यात आलेले शेकडो अवशेष, आजूबाजूला पसरलेले आहेत. एखादी मूर्ती कोरण्यासाठी जो दगड लागतो, तो दगड मुख्य कातळापासून वेगळा करण्यासाठी ज्या पारंपरिक पद्धतींचा वापर होत होता, त्यांचेदेखील पुरावे या ठिकाणी दिसतात.
हे मंदिर जरी अपूर्ण राहिले असले, तरी मंदिर स्थापत्याशी निगडीत अनेक क्लिष्ट प्रश्नांना, हे योग्य आणि पूर्ण उत्तर देते. मंदिर बांधण्यासाठी वापरलेला रॅम्प, आजूबाजूला दिसणारी आरेखने, मूर्ती तयार करतानाचे वेगवेगळे टप्पे, इत्यादी गोष्टी या एकाच ठिकाणी आपल्याला बघता येतात. भारतामध्ये क्वचितच यासारखी दुसरी जागा असेल.
परमार घराण्यातील भोजराजाने उभे केलेले हे वैभव, आपण एकदा जाऊन नक्कीच बघू या. इथूनच जवळ एक छोटा लेणी समूह आहे, भोज राजाच्या महालाच्या खुणा आहेत, जैन बस्ती आहे, छोटेसे संग्रहालयदेखील इथे आपल्याला अनुभवता येऊ शकते.
इतिहासाच्या पानांमध्ये ज्याचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते, अशा पराक्रमी, दानशूर आणि विद्वान भोजराजाने उभे केलेले हे अपूर्ण, पण थक्क करणार्या वास्तुशैलीचे उदाहरण म्हणजेच भोजेश्वर मंदिर. हे मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर स्थापत्यशास्त्र, शिल्पकला आणि स्वप्नांची साक्ष देणारे एक जिवंत पुस्तक आहे. या ठिकाणी भेट दिल्यावर, राजा भोजाचा दूरदृष्टीचा विचार, त्याची कल्पनाशक्ती, आणि त्याच्या काळातील तंत्रज्ञानाचे ज्ञान हे सारे आपल्यासमोर उभे राहते. शब्द संपतील, पण भोजराजाचे कार्य हे शब्दांच्या पलीकडचे आहे आणि म्हणूनच,
साधितं विदितं दत्तं ज्ञातं तद् यन्न केनचित्।
किमन्यत्कविराजस्य श्रीभोजस्य प्रशस्यते॥
दुसर्या कोणीही जे साधले नाही, जाणले नाही, दिले नाही, ज्ञात केले नाही, ते भोज राजाने केले. भोजाची याहून आणखी काय प्रशंसा करावी?
इंद्रनील बंकापुरे
7841934774
heritagevirasat@gmail.com