पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान : अॅड. शेलार
हिंदू नरसंहाराविरोधात भाजप बंगाली
प्रकोष्ठचे धरणे आंदोलन
27-Apr-2025
Total Views | 8
मुंबई (Hindu Genocide in West Bengal,): “संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मूल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या ‘वक्फ’ कायद्याचा विरोध करायचा, तर लोकशाही पद्धतीने करा, न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा. पण, पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे,” असा घणाघात शनिवार, दि. २६ एप्रिल रोजी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला.
पश्चिम बंगालमधील हिंदू नरसंहाराविरोधात भाजपच्या ‘बंगाली प्रकोष्ठ’च्यावतीने शनिवार, दि. २६ एप्रिल रोजी प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेलार बोलत होते. ज्येष्ठ नेते विजय तथा भाई गिरकर, बंगाली प्रकोष्ठचे संयोजक रंजन चौधरी, सुभागत दास, सरचिटणीस निरंजन बोस, मीरा रोडच्या प्रकोष्ठच्या महिला अध्यक्ष मंजुला बसक, रहिम दत्ता यावेळी उपस्थित होते. प. बंगालमध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्यावतीने यावेळी करण्यात आली.
आशिष शेलार म्हणाले की, ”ममता सरकार हिंदूंवर करत असलेल्या निर्घृण अत्याचाराविरोधात भाजपा उभी आहे. दहशतवादाला धर्म नसतो, असे म्हणतात. पण मग दहशतवादी हल्ल्यात एका विशिष्ट धर्माचे लोकच का असतात? असा खरमरीत सवालही यावेळी अॅड. शेलार यांनी केला.
हिंदू एकजूट होताना दिसले की, लगेच जातिभेद निर्माण करून वाद निर्माण करणार्या नेत्यांत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतेही सामील आहेत, असे म्हणत अॅड. शेलार यांनी महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यावर नाव न घेता शरसंधान केले. पहलगाम हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना मोदी सरकार कडक शासन देईल, यात शंकाच नाही,” असेही त्यांनी नमूद केले.