उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लहान मुले विविध क्रीडाप्रकारांचा आनंद घेत असतात. एकाचवेळी अनेक खेळ खेळण्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळला जातो, तो म्हणजे ‘डायव्हिंग बुद्धिबळ!’ या खेळात अनेक विक्रम आजमितीला झाले आहेत. बुद्धिबळाच्या विविध प्रकारांतील विक्रमांचा घेतलेला आढावा...
एप्रिल, मे हे दोनेक महिने मुलामुलींच्या दृष्टीने खेळाचे महिने म्हणून, पालकांनी जणूकाही घोषित केलेले असतात. शाळांनाही उन्हाळ्याच्या सुट्या पडलेल्या असतात. या सुट्यांच्या काळात किंबहुना त्याआधीपासूनच्या काही दिवस, रोज दिवेलागणी झाली की मुले अधिकृतपणे दूरचित्रवाणी संचांना चिकटून बसलेली असतात. कारण जगप्रसिद्ध ‘इंडियन प्रिमिअर लीग’ अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धा सध्या सुरु आहे. ‘आयपीएल’च्या आधीच्याकाळात अनेकांचे, विविध क्रीडा उपक्रमही सुरु होतात. अशा या उन्हाळी-मे महिन्याच्या सुट्टीत सगळी भावंडे, मित्र जमले की, उन्हाचा त्रास टाळत सापशिडी, ल्युडो, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ असे बैठे खेळ खेळले शिकले व शिकवले जात.
बैठ्या खेळांव्यतिरिक्त मैदानी क्रीडाप्रकारात, सायकल चालवणे, पोहायला शिकणे हे बहुतेक करून सगळ्यांचेच ठरलेले लाडके काम असे. आधीची पिढी पुढच्या पिढीला सायकल शिकवत राहते. उन्हाळ्यात अन्य क्रीडाप्रकाराप्रमाणे गावाकडची मुले वगळता, इतर अनेकजण सार्वजनिक किंवा खासगी जलतरण तलावात पोहण्याच्या प्रशिक्षणवर्गांना जातात. ज्यांना येते, ते मासिक पास काढून जातात. शहरे, खेडी अशा ठिकाणी अनेकजण नदी, विहिरी, तलाव किंवा समुद्रात पोहण्याचाही आनंद घेतात. आपला पाल्य ज्या जलतरण तलावात पोहणार आहे, त्यातील पाणी हे निर्जंतुक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी विविध पद्धती वापरल्या आहेत की नाहीत, यात फिल्टरेशन, रसायनांचा वापर (क्लोरीन, ब्रोमिन), आणि पाण्याच्या तापमानाचे नियंत्रण यांचा समावेश होतो की नाही, याची शहानिशा केलेली असली पाहिजे. अशा ठिकाणी पोहताना नेहमी योग्य सुरक्षा उपाययोजना आहेत की नाहीत, मुलांकडे नेहमी लक्ष ठेवले जात आहे की नाही, पोहण्यायोग्य वेशभूषा आहे की नाही, आपला पाल्य जेथे पोहणार आहे, ते पाणी शरीर आणि तब्येतीला हानिकारक तर नाही ना, आवश्यक असल्यास नेहमीच्या वैद्य, डॉक्टर यांची परवानगी गरजेची आहे की नाही, याकडे लक्ष देणे ही पालकांची जबाबदारी ठरत असते.
बुद्धिबळ काय आहे?
आपल्याकडे असे अनेकजण आढळून येतील की, मे महिन्यातील सुटीचा उपयोग आपल्या पाल्याने कला, अर्थिक आमदनी, अभ्यासात घालवून त्यात काही नैपुण्य मिळवावे, खेळून वेळेचा अपव्यय करू नये असे त्यांना वाटते. याच्यावरच एकाचे विचार वाचलेले मलाही आठवतात. एक तरुण इच्छुक बुद्धिबळपटू, परदेशात एक मोठी स्पर्धा खेळण्याची योजना आखत होता. पण त्याच्यापुढे एक समस्या होती ती म्हणजे पैसा. अनेक तरुण खेळाडूंप्रमाणे प्रवास खर्च त्याला खरोखरच परवडत नव्हता म्हणून त्याने, तेथील सरकारी युवा व्यवहार विभागाकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला. त्याने तेथील एका उच्च अधिकार्याला भेटण्याची वेळ मागितली. पण त्या अधिकार्याने ती देऊ केली नाही. अधिकारी निधीच्या कमतरतेबद्दल तक्रार करत होता आणि हे स्पष्ट होते की, तो बोर्ड गेमवर पैसे खर्च करण्यास तयार नव्हता. कधीतरी त्याने असेही विचारले, “तुम्हांला पैसेवाटप करण्यासाठी ते कोणत्या बजेट श्रेणीत वर्गीकृत करायचे, हे ठरवावे लागेल.” मग बुद्धिबळ म्हणजे काय; खेळ, कला की वेळेचा अपव्यय? मुलाला आधीच कळले होते की, त्याला पैसे मिळणार नाहीत. म्हणून तो आपली निराशा लपवू शकला नाही आणि त्याने उत्तर दिले, “जेव्हा मिखाईल ताल बुद्धिबळ खेळतो, तेव्हा ती कला असते, जेव्हा मी बुद्धिबळ खेळतो, तेव्हा तो खेळ असतो आणि जेव्हा तुम्ही बुद्धिबळ खेळता, तेव्हा तो फक्त वेळेचा अपव्यय असतो!” असो.
गिनिज बुक, बुद्धिबळ, जलतरण वगैरे...
तर गेल्या काही महिन्यांपासून, बुद्धिबळाचा खेळ मुलामुलींमध्ये लोकप्रिय होत असलेला आपण बघत आहोत. जलतरण तलाव आणि बुद्धिबळ यांच्यावर चर्चा करताना, मला बुद्धिबळासंबंधी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मधील दोन ताजे विक्रम आठवतात. त्यांपैकी एक तर बुद्धिबळ आणि जलतरण यांची सांगड घालत विक्रम घडवलेला आहे.
दि. 17 एप्रिल ते दि. 20 एप्रिल या काळात नायजेरियन बुद्धिबळपटूंनी न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित ‘टाईम्स स्क्वेअर’मध्ये नोंदवलेला एक विक्रम, तर दुसरा विक्रम एकाचवेळी सर्वाधिक डायव्हिंग करणार्या बुद्धिबळ विरोधकांसाठी पोलंडच्या माझुरकिविझचा. पोलंडच्या मिचल माझुरकिविझ याच्या विक्रमाची नक्कल करून पाहायची इच्छा असेल, तर मुलांनी त्यासाठी मात्र पालकांची संमती आणि काही तज्ज्ञांची मदत आवश्य घ्यावी.
आठी आठी चौसष्ठचा डाव रंगला चौसष्ठ तास
नायजेरियन बुद्धिबळपटू टुंडे ओनाकोया आणि एन. एम. शॉन मार्टिनेझ यांनी, न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित ‘टाईम्स स्क्वेअर’मध्ये विस्मयकारक 64 तास सतत खेळल्यानंतर, सर्वांत जास्त काळ बुद्धिबळ मॅरेथॉन खेळण्याचा ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’ अधिकृतपणे मोडला. हा पराक्रम दि. 17 एप्रिल रोजी सुरू झाला आणि दि. 20 एप्रिल रोजी रविवारी पहाटे संपला.
सुरुवातीला या दोघांनी 70 तासांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु 64 तासांनंतर संपवण्याचा निर्णय घेतला. “आम्ही 64 तासांवर थांबलो, कारण ती बुद्धिबळाच्या पटावरील एकूण चौरसांची संख्या आहे. म्हणूनच तसे करणे योग्य वाटले,” असे ओनाकोया म्हणाले.
मागील अधिकृत विक्रम 61 तास, 3 मिनिटे आणि 34 सेकंदांचा होता आणि तो, 2024च्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेजियन जोडी ओडिन ब्लिक्रा व्हेआ आणि अस्किल्ड ब्रायन यांनी प्रस्थापित केला होता. 383 गेमच्या ब्लिट्झ सामन्यातील प्रत्येक चाल, ‘चेस डॉट कॉम’द्वारे थेट प्रक्षेपित केली गेली. यावेळी, सत्राचे पूर्णपणे दस्तऐवजीकरण करण्यात आले होते आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. ‘गिनिज’च्या आवश्यकतांनुसार, अनेक लोकांनी सामना पाहण्यासाठी नोंदणीदेखील केली होती.
उपस्थित असलेल्यांमध्ये दोनवेळच्या यूएस महिला चॅम्पियन डब्ल्यूजीएम जेनिफर शहाडे होत्या, त्यांनी सांगितले की, त्यांनी अधिकृत ‘गिनिज’ साक्षीदार म्हणून काम केले आहे. त्यांनी त्यांच्या या अनुभवाबद्दल तपशीलवारपणे लिहिले आहे.
तलावाच्या तळात ते खेळले बुद्धिबळ
‘गिनिज बुक’च्या दुसर्या घटनेत, एकच व्यक्ती दोन भिन्न खेळ एकाचवेळी खेळण्याचा एक अनोखा क्रीडाप्रकार खेळताना जर आपल्याला आढळली, तर तो एक विलक्षण संयुक्त क्रीडाप्रकार ठरतो. अशावेळी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’वाल्यांनाही त्याची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. पोलंडचा 34 वर्षीय बुद्धिबळपटू मिचल माझुरकिविझ याच्या अशाच विक्रमाची दखल, ‘गिनिज बुक’वाल्यांनी दि. 21 एप्रिल 2024 रोजी घेतली आहे.
‘जागतिक बुद्धिबळ संघटने’कडून बुद्धिबळपटू म्हणून मान्यता मिळालेले, 16 वर्षे अथवा 16 वर्षांहून अधिक वय असलेले 16 युवकांनी यात सहभाग घेतला हातो. पोहण्याच्या तलावाच्या तळात (मॅग्नेट) लोहचुंबकाने अडकावलेले बुद्धिबळाचे संच वापरत, एकाच वेळेस मिचल माझुरकिविझ हा त्यांच्याशी बुद्धिबळाचे डाव खेळत होता.
आणि तो ठरला डायव्हिंग वर्ल्ड चेस चॅम्पियन
त्याला प्रत्येक चालीसाठी, फक्त एक श्वास घेण्याची मुभा होती. तसेच डायव्हिंग उपकरणांच्या वापरानांही परवानगी नव्हती. त्याला किमान 80 टक्के गुण मिळवायचे होते, म्हणजे 1 हजार, 400 ते 2 हजार, 450 रेटिंग असलेल्या प्रतिस्पर्ध्यांच्या (एका आंतरराष्ट्रीय मास्टरसह!) विरुद्ध, 16 पैकी किमान 13 गेम जिंकणे किंवा बरोबरी करणे आवश्यक होते. विविध कोनांतून त्याचे दृकश्राव्य चित्रीकरण केले जात होते.
डायव्हिंग बुद्धिबळ या अनोख्या खेळातील
खेळाडू पृष्ठभागावर आळीपाळीने डायव्हिंग करत होते, श्वास रोखून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. ते त्यांची हालचाल पूर्ण केल्यानंतरच पृष्ठभागावर येऊ शकत होते, ज्यावेळी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने ताबडतोब डायव्हिंग करावे आणि त्यांच्या प्रतिसादाबद्दल विचार करायला सुरुवात करावी, असे तेथे चालू होते.
माझुरकिविझ हा सध्याचा डायव्हिंग वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे, अशी अनोखी स्पर्धा त्याने तीनवेळा जिंकल्या आहेत. मला लहानपणापासूनच बुद्धिबळाची आवड आहे, त्याने ‘चेस डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. पोहणे आणि डायव्हिंग करणे हेदेखील छंद होते, परंतु महामारीच्या काळात पाठीच्या दुखापतीनंतर मी नियमितपणे पूलमध्ये सराव करण्यास सुरुवात केली. जेव्हा मी 2021 मध्ये पोलिश डायव्हिंग चेस चॅम्पियनशिपबद्दल ऐकले तेव्हा मला वाटले, ‘हे माझ्यासाठी परिपूर्ण संयोजन वाटते,’ तो म्हणाला. त्यात श्वास घेण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी कोणताही ब्रेक नव्हता.
विक्रमाच्या पलीकडे जाऊन तो सांगतो की, डायव्हिंग बुद्धिबळामुळे त्याला बुद्धिबळ आणि शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यास आणि निरोगी आहार राखण्यास प्रवृत्त केले. जर पालकांनी आपल्या पाल्याला फक्त बुद्धिबळ शिकवायचे की फक्त पोहायला शिकवायचे, एखाद्याच खेळात निष्णात करायचे की त्याला जे आवडेल ते शिकवायचे, हे विचारपूर्वक ठरवले तर त्यांच्याही पाल्याचे नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आणि आगदीच नाही तर, क्रीडा पत्रिकेत चमकताना दिसून येईल. त्यायोगे भारताचेही नाव जागतिक स्तरावर चमकलेले दिसू शकेल, हे नक्की.
9422031704