मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात विजेतेपद मिळवून घराघरात पोहोचलेला सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आहे. फिनालेच्या मंचावर केदार शिंदे यांनी जाहीर केलेल्या झापुक झुपूक या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित प्रीमियर अखेर २५ एप्रिलला पार पडला. चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच तुफान होती आणि त्यामुळेच त्याच्या कमाईकडेही सर्वांचे लक्ष लागले होते.
पहिल्या दिवसाच्या आकडेवारीनुसार, 'झापुक झुपूक' ने भारतात २४ लाख रुपयांचा गल्ला जमवला असून, जागतिक पातळीवर हा आकडा २७ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शनिवार-रविवारच्या सुट्यांचा फायदा मिळाल्यास विकेंडपर्यंत चित्रपटाची कमाई १ कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
सूरजच्या रोमँटिक अंदाजासोबतच अॅक्शन आणि ड्रामाने भरलेल्या या कौटुंबिक चित्रपटात जुई भागवत त्याच्या जोडीदाराच्या भूमिकेत आहे. दोघांची केमिस्ट्री, सूरजचे स्टायलिश अवतार आणि ठसकेबाज डायलॉग्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात सूरज आणि जुईसोबत इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर आणि मिलिंद गवळी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला अभिनेता रितेश देशमुखनेही उपस्थिती लावून सूरजला शुभेच्छा दिल्या होत्या.
सूरज चव्हाण हा बारामतीजवळील छोट्या गावातून आपल्या प्रवासाला सुरुवात करून आज मराठी चित्रपटसृष्टीत आपली ठसा उमटवत आहे, हे विशेष उल्लेखनीय.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.