मुंबई : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले. या हृदयद्रावक आणि क्रूर हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोकाची लाट पसरली आहे. अनेक नामवंत कलाकारांनी या 'भ्याड' कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. आता सुपरस्टार रजनीकांत यांनीही या घटनेविषयी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
रजनीकांत यांची प्रतिक्रिया
'जेलर २'च्या शूटिंगनंतर रजनीकांत नुकतेच चेन्नई विमानतळावर परतले. माध्यमांनी पहलगाम हल्ल्याबद्दल विचारल्यावर त्यांनी ठामपणे म्हटले, "काश्मीरमध्ये शांतता बिघडवण्याचा शत्रूंचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने दोषींना शोधून काढावे आणि त्यांच्या विरोधात अशा प्रकारची कडक कारवाई करावी की जी कल्पनाही करता येणार नाही."
कमान हासन, ममूटी, मोहनलाल, प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी अशा अनेक दिग्गज कलाकारांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
रजनीकांत यांचा आगामी प्रोजेक्ट - 'जेलर २'
कामाच्या आघाडीवर पाहता, रजनीकांत सध्या दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या 'जेलर २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हे चित्रपटाचे चित्रीकरण तामिळनाडूमधील कोयंबटूरजवळील अनैकट्टी हिल्समध्ये सुरू आहे.
असे समजते की, मलयाळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता फहाद फाजीलदेखील 'जेलर २'मध्ये रजनीकांतसोबत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. याआधीही दोघे 'वेट्टैयन' या चित्रपटात एकत्र आले होते, जो २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता.
'जेलर २'चा घोषणाव्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात रजनीकांत 'टायगर मुथुवेल पंडियन' या रिटायर्ड जेलरच्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपटात रजनीकांतसोबत राम्या कृष्णन, मिर्णा मेनन, शिवराजकुमार आणि एस.जे. सूर्याह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
सन पिक्चर्सच्या भव्य बजेटमध्ये तयार होणाऱ्या 'जेलर'च्या पहिल्या भागाने जगभरात ६०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता, आणि तो रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक ठरला आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.