अध्यात्माच्या आधारे जनसामान्यांच्या ओंजळीत भरभरून सुख आणि समृद्धीचे दान देणार्या ‘विद्यावाचस्पती’ तुळशीराम महाराज गुट्टे यांच्याविषयी...
संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ‘विद्यावाचस्पती’ तुळशीराम महाराज गुट्टे यांचा जन्म दि. 1 मे 1983 रोजी, बीडच्या परळीत प्रभू वैद्यनाथांच्या अंगणातील नंदनज गावात झाला. घरातील भक्तिमय वातावरणाचा प्रभाव, तुळशीराम महाराज यांच्या बालमनावर झाला. त्यामुळेच तिसरीच्या वर्गात अवघे आठ वयवर्षे असतानाच, तुळशीराम महाराज लोभसपणे भावार्थ रामायण लोकांसमोर वाचत असत. वयाच्या 11व्या वर्षी विश्वनाथ महाराज शास्त्री यांच्यासोबत झालेली भेट, तुळशीराम महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. त्यांची अध्यात्माची गोडी, तल्लख बुद्धी, उत्तम स्मरणशक्ती, चपळपणा आणि निर्भय वृत्ती पाहून, विश्वनाथ महाराजांनी तुळशीरामांवर कृपादृष्टी केली ती कायमचीच. त्यांनीच खर्या अर्थाने महाराजांच्या आध्यात्मिक विचारांना आणि श्रद्धेला, खतपाणी घालण्याचे काम केले.
डॉ. तुळशीराम महाराज यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ‘सरदार जी. जी. हायस्कूल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तून, पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अध्यात्मावर गाढ श्रद्धा असलेल्या महाराजांना 2000 साली, बुद्धीची देवता श्रीगणेशाचा साक्षात्कार झाला. त्यानंतर स्वतःला झोकून देत त्यांनी, शिक्षण व आध्यात्मिक कार्याला सुरुवात केली. 2012 मध्ये संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर संशोधनपर प्रबंध लिहून, ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी प्राप्त केली. त्यानंतरच खर्या अर्थाने संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून, त्यांची राज्यभर कीर्ती झाली. अवघ्या सोळाव्या वर्षापासून अध्यात्माला सुरुवात केलेल्या महाराजांनी सत्संग, अनुष्ठान, प्रवचन, श्रीमद्भागवत कथा, श्रीराम कथा, शिवकथा, गणेश महापुराण या माध्यमातून, धर्माचा प्रचार-प्रसार केला. यासोबतच अनेक शाळा, महाविद्यालयात व्याख्यानांबरोबरच मार्गदर्शन शिबिरे ते घेतात.
कीर्तन परंपरेच्या माध्यमातून समाजामध्ये भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग व कर्ममार्गाचा त्रिवेणी संगम साधत, समाजातील जातिभेद, स्त्री-पुरुष समानता, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरांवर आपल्या कार्यक्रमातून सतत प्रहार करतात. समाजामध्ये सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक मूल्यांचे प्रबोधन करत त्यांनी, आपल्या कार्यातून समता, मानवता, बंधुता, एकता यांसारख्या आधुनिक विचारांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे, त्यांनी केलेली मौनसाधना. श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे 45 दिवसांचे आठ तर नाशिकच्या पंचवटीत नऊ वेळा मौनव्रत धारण करत अनुष्ठान केले. यावेळी सलग नऊ महिने, एका खोलीत एकाच ठिकाणी स्वतःला बंदिस्त करत साधना केली.
‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ मानत, लोकांचे आरोग्य, शिक्षण, आध्यात्मिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी 2015 साली ‘सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. ही संस्था संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच वेळ प्रसंगी, इतर राज्यातही कार्य करते. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, वाईट चालीरिती, रूढी, परंपरांविषयी जनजागृती, भक्तीभाव निर्माण करण्यासारख्या कार्यक्रमांचे ‘सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन’ आयोजन करते. तसेच, नाशिक व उज्जैन कुंभमेळ्यात महावैश्विक कार्यक्रम करण्यात ‘सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन’ अग्रेसर राहिले आहे. यासोबतच स्त्रीभ्रूणहत्या, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर, चित्रकलेसारख्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. तुळशीराम महाराज गुट्टे यांचे नाव साहित्य क्षेत्रातही आदराने घेतले जाते.
त्यांनी आपल्या ‘पीएच.डी’च्या प्रबंधावर ‘मुक्ताई झाली प्रकाश’ हा ग्रंथ लिहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ग्रंथाला, शुभेच्छा पत्र पाठवल्याचे गुट्टे महाराज सांगतात. यासोबतच ‘ओंकारेश्वर दर्शन’, ‘शंकराचे बिल्वदल’, ‘ओवीबद्ध श्रीगणेश स्तुती’, ‘यशस्वी जीवनाचा मार्ग’, ‘संत केदारी महाराजांची पंचक्रोशीतील महती’, ‘द पाथवे टू ए सक्सेसफूल लाईफ’, ‘श्रीगणेश स्तुती अर्थासहित’, ‘संत मुक्ताई पालखी सोहळा’, ‘यशस्वी जीवनाची सुधारित आवृत्ती’, ‘मनोविश्वाचा आध्यात्मिक प्रवास’, ‘जीवनसार सूत्र’ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. तर ‘अंगणातलं देऊळ’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
2016 मध्ये जळगाव येथे झालेल्या 11व्या ‘अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. समाजसेवा व साहित्य क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक व आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन, त्यांना ‘ब्रह्मभूत नाना महाराज साखरे पुरस्कार’, पुणे, ‘श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार’ नाशिक, ‘गौरव महाराष्ट्र पुरस्कार’ पुणे, ‘विशेष कार्यगौरव पुरस्कार’ परळी, ‘बालगंधर्व विशेष गौरव पुरस्कार’ पुणे, ‘विशेष लोकशिक्षक पुरस्कार’ नाशिक, ‘समाजभूषण पुरस्कार’ पुणे, ‘समाजरत्न पुरस्कार’ आळंदी, ‘समाजभूषण पुरस्कार’ त्र्यंबकेश्वर आणि कार्य शिक्षक अशा दहा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अशा या समाजाभिमुख काम करत, समृद्ध संत परंपरेची पताका तेवत ठेवणार्या कर्मयोग्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून लाखमोलाच्या शुभेच्छा!
- विराम गांगु्र्डे