आजमितीला जगातील दोन महाशक्तींपैकी एक म्हणजे अमेरिका! आपल्या सामर्थ्याचा तोरा अमेरिका कायमच जगासमोर मिरवत असते. हीच अमेरिका पूर्वी ब्रिटनची वसाहत होती. क्रांतिकारांच्या योगदानाने तिला स्वातंत्र्य मिळाले. या क्रांतीचे अनेक ‘फाउंडिंग फादर्स’ आहेत. मात्र, अमेरिकेचा नागरिक नसूनही तिच्या स्वातंत्र्ययुद्धात मोलाची भूमिका बजावणार्या काउंट व्हर्झान यांचाही उल्लेख या ‘फाउंडिंग फादर्स’मध्ये करण्यात येतो. त्यांच्या योगदानाचा आढावा...
परवा दि. 19 एप्रिल रोजी, अमेरिकन राज्यक्रांतीच्या प्रारंभाला 250 वर्षे पूर्ण झाली. दि. 19 एप्रिल 1775 या दिवशी, या क्रांतियुद्धातली पहिली लढाई लढली गेली होती. साधारणपणे क्रांती ही झटपट निकाली निघते. म्हणजे क्रांतिकारक किंवा सत्ताधारी कोणत्यातरी एका पक्षाचा झटपट पराभव होऊन युद्ध संपते. पण, अमेरिकन राज्यक्रांती 1775 ते 1783 अशी, चांगली आठ वर्षे रेंगाळत-रेंगाळत सुरू होती. अखेर 1783 साली ब्रिटनचा राजा तिसरा जॉर्ज याने मान्य केले की, 13 अमेरिकन वसाहतींचा हा समुदाय यापुढे ब्रिटनच्या वसाहती नसून, ते एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. पण, गंमत म्हणजे 13 वसाहतींच्या या संघाला ब्रिटनने, 1783 साली अशी अधिकृत मान्यता देईपर्यंत त्या संघाचे कर्तेधर्ते थांबून राहिले नव्हते.
त्यांनी दि. 4 जुलै 1776 रोजीच जाहीर केले होते की, आम्ही स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहोत. म्हणून दरवर्षी दि. 4 जुलै हा दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन असतो. या घटनाक्रमामधला राजकीय महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतोय का तुमच्या? एप्रिल 1775 ते जुलै 1776 या काळात 13 बंडखोर अमेरिकन वसाहतींनी, आपला मालक देश ब्रिटन याच्याविरुद्ध केलेले हे बंड किंवा क्रांतियुद्ध होते. दि. 4 जुलै 1776 या दिवशी या 13 वसाहतींनी आपण एक स्वतंत्र राष्ट्र आहोत, असे जाहीर केल्यामुळे आता ते अमेरिका आणि ब्रिटन त्या दोन राष्ट्रांमधले युद्ध बनले. म्हणजेच फ्रान्स आणि स्पेन या अमेरिकन वसाहतींच्या मित्र देशांना किंवा खरे म्हणजे ब्रिटनच्या शत्रू देशांना, अधिकृतपणे युद्धात उतरायला मुभा मिळाली.
फ्रेंच सेनापती मेजर जनरल मार्क्विस द लाफायेत हा सैन्य आणि भरपूर युद्धसामग्री घेऊन, जनरल जॉर्ज वॉशिंग्टनच्या साहाय्याला धावून आला. ब्रिटिश सेना मार खाऊ लागली. शेवटी ब्रिटनचा राजा तिसरा जॉर्ज याने 1781 सालापासूनच राजकीय वाटाघाटींना सुरुवात केली. 1783 साली ब्रिटनने अमेरिकेचे अस्तित्व अधिकृतपणे मान्य केले आणि युद्ध संपले. अमेरिकेचा मित्र देश म्हणून, या वाटाघाटींमध्ये फ्रान्सचाही मोठा सहभाग होता. त्यामुळे हा तह पॅरिसमध्येच झाला. त्याला ‘पॅरिसचा तह’ असेच नाव आहे. या सगळ्या घटना घडवून आणण्यात, फ्रान्सचा राजा सोळावा लुई याचा, पंतप्रधान चार्ल्स ग्रॅव्हिये उर्फ काउंट व्हर्झान याचा फार मोठा सहभाग होता.
पुढचा घटनाक्रम मोठाच विचित्र आहे. 1783 साली युद्ध संपले. आता नव्या अमेरिकन राष्ट्राला आपली राज्यघटना बनवायची होती. ज्यांना अमेरिकेचे ‘फाऊडिंग फादर्स’ म्हटले जाते, त्या जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफर्सन, बेंजामिन फ्रँकलिन, जॉन अॅडम्स, जेम्स मॅडिसन, अलेक्झांडर हॅमिल्टन इत्यादी मंडळींनी, ‘अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ पूर्वीच प्रसिद्ध केला होता. पण, आता 13 वसाहतींच्या किंवा 13 राज्यांच्या संघासाठी राज्यघटना बनवायची होती. राज्यघटना तयार होऊन तिला 13 ही राज्यांच्या प्रांतिक विधिमंडळांची मान्यता मिळेपर्यंत, 1787 साल उजाडले. मग सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू होऊन, त्या पार पडायला 1789 साल उजाडले. दि. 30 एप्रिल 1789 या दिवशी नवनिर्मित अमेरिकन राष्ट्राचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून, जॉर्ज वॉशिंग्टन पदारूढ झाला. बरोबर पाच दिवसांनी म्हणजे, दि. 5 मे 1789 या दिवशी इकडे फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली.
या क्रांतीच्या ज्वाळा उत्तरोत्तर भडकत जाऊन, तिच्यात राजा सोळावा लुई, त्याची राणी मेरी अँटोनेट (मारी आंत्वानेत) यांच्यासह हजारो लोकांचा बळी गेला. अनेक इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की, सोळावा लुई आणि त्याचा पंतप्रधान काउंट व्हर्झान यांनी अमेरिकन क्रांतिकारकांना जी मदत केली, त्यामुळे खुद्द फ्रान्सवरच अतिरिक्त आर्थिक बोजा पडला. त्यातूनच सामान्य फ्रेंच नागरिकांवर आर्थिक भार वाढला. तो असंतोष वाढत जाऊन, अखेर त्याची परिणती रक्तरंजित क्रांतीमध्ये झाली. गंमत म्हणजे हा सर्व बनाव घडवून आणणारा जो ‘मास्टर माईंड’ फ्रेंच पंतप्रधान काउंट व्हर्झान तो 1787 साली, म्हणजे क्रांतीच्या दोन वर्षे आधीच नैसर्गिक मृत्यूने मरण पावला होता.
याला काय म्हणावे? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? की, कथा कुणाची व्यथा कुणाला? स्वतंत्र आणि सार्वभौम लोकशाही अमेरिकन राष्ट्र उभे राहावे म्हणून ज्या काउंट व्हर्झानने अमेरिकन क्रांतिकारकांना भरपूर मदत केली, त्याचे स्वतःचे राष्ट्र मात्र कोसळून पडावे?
अगदी स्पष्ट बोलायचे तर काउंट व्हर्झानने अमेरिकन क्रांतिकारकांना जी मदत देऊ केली, ती त्यांच्यावरील प्रेमामुळे वगैरे अजिबात नव्हती. लोकशाही मूल्यांवरचे प्रेम वगैरेचा तर प्रश्नच नव्हता. कारण, तो स्वतःच एका राजाचा पंतप्रधान होता. म्हणजेच राजेशाही किंवा सरंजामशाही व्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक होता. ती मदत करण्यामागे ब्रिटनला हलका पाडणे, त्याचे आशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडातले वाढते साम्राज्य, वाढते वर्चस्व कमी करणे नि त्या जागी फ्रान्सचे साम्राज्य, फ्रान्सचे वर्चस्व वाढवणे, ब्रिटनच्या शत्रू देशांना आपले मित्र बनवून, आंतरराष्ट्रीय व्यापारात आपला दबदबा वाढवणे असा उघड उघड राजकीय हेतू होता. यात काही चुकीचे होते, असे म्हणता येणार नाही. कारण, ब्रिटन नेमके हेच उद्योग करीत होता. 16व्या शतकात स्पेन हा देशही या साम्राज्य स्पर्धेत होताच.
पण, 1588 साली आर्माडा युद्धात स्पेनने ब्रिटनकडून मार खाल्ल्यावर, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यातली स्पर्धा तीव्र झाली. उत्तर अमेरिका खंडात ब्रिटनने अटलांटिक किनार्यावरचा मोठा भूभाग व्यापला. पण, फ्रान्सच्या ताब्यातला मध्य अमेरिका आणि कॅनडाचा भूभाग जास्त मोठा होता. आफ्रिकेतही समुद्र किनार्यावरची मोक्याची बंदरे ब्रिटनने दाबून बसला असला, तरी अंतर्भागातला फार मोठा प्रदेश फ्रान्सच्या ताब्यात होता. आशिया खंडात, त्यातही विशेषतः भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात जोरदार चुरस होती. खुद्द युरोप खंडातही फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात लढाया सुरूच होत्या.
सन 1756 ते 1763 या सात वर्षांच्या काळात ही चुरस अगदी कळसाला गेली आणि अखेर प्रत्येक ठिकाणी ब्रिटनने बाजी मारली. ‘सप्त वार्षिक युद्ध’ या नावाने ओळखल्या जाणार्या या जागतिक संघर्षात, प्रत्येक ठिकाणी ब्रिटनने फ्रेंचांना मागे टाकले. 1757 साली इंग्रज सेनापती रॉबर्ट क्लाईव्ह याने बंगालचा मुघल सुभेदार सिराजउद्दौला याचा प्लासी (मूळ बंगाली नाव पलाशी)च्या लढाईत पराभव करून बंगाल जिंकला. या लढाईत फ्रेंचांचा प्रत्यक्ष सहभाग नसला, तरी इंग्रजांच्या या विजयामुळे भारतातली फ्रेंच सत्ता माघारली. म्हणून ‘प्लासीची लढाई’ हीसुद्धा ‘सप्त वार्षिक युद्धा’चाच एक भाग मानली जाते.
असो. तर अशा रीतीने माघारलेल्या फ्रेंच साम्राज्याला पुन्हा पुढे आणण्यासाठी काहीतरी करणे, हे फ्रेंच पंतप्रधान या नात्याने काउंट व्हर्झानचे कर्तव्यच होते. त्याचवेळी म्हणजे 1765 साली त्याने आपले लक्ष अमेरिकेकडे वळवले. अमेरिकन वसाहतींमधले नागरिक मूळचे ब्रिटिशच होते. पण, अमेरिकेत स्थलांतरित होऊन त्यांना आता 100 हून अधिक वर्षे उलटून गेलेली होती. त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे, ब्रिटनमधले सत्ताधारी लोक या अमेरिकन वसाहतींना गुलामांप्रमाणे वागवत होते, हे त्यांना सहन होत नव्हते. अमेरिकन भूमीवरून विविध प्रकारचा कच्चा माल ब्रिटनला न्यायचा आणि पक्का माल दामदुपटीने विकायचा; वसाहतींवर विविध प्रकारे कर लादायचे, अशी ब्रिटनची धोरणे वसाहतवाल्यांना अजिबात आवडत नव्हती, यातून ब्रिटनविरुद्ध आंदोलन उभे राहू शकते का? याचा अंदाज घेण्यासाठी, काउंट व्हर्झानने आपले हेर 1765 सालीच अमेरिकेला पाठवले. त्या हेरांनी अहवाल पाठवला की, असंतोष आहे पण तो संघटित होऊन त्याची परिणती सशस्त्र क्रांतीमध्ये होण्याला, अजून काही काळ जावा लागेल. ती वेळ आणखी दहा वर्षांनी आली.
वसाहतींमधला असंतोष तो दडपून टाकण्यासाठी, ब्रिटिश सत्ताधार्यांनी केलेली दडपशाही यांचा स्फोट 1775 साली झाला. जनरल जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांच्या सशस्त्र सैन्याने, दि. 19 एप्रिल 1775 या दिवशी पहिली गोळी झाडली. ब्रिटिश सेनापती आणि सैन्य चांगलेच कसलेले होते. त्यामुळे सुरुवातीला क्रांतिकारकांनी मार खाल्ला. पण, ते अजिबात डगमगले नाहीत. दि. 4 जुलै 1776 रोजी त्यांनी धडाक्याने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. दि. 13 जून 1777 या दिवशी फ्रेंच सेनापती मेजर जनरल मार्क्विस द लाफायेत हा भरपूर युुद्धसामग्री घेऊन, अमेरिकेत पोहोचला. मग युद्धाचे पारडे निर्णायकरित्या क्रांतिकारकांच्या बाजूने झुकले आणि अखेर अमेरिका निर्माण झाली.
परवाच्या दि. 19 एप्रिल 2025 रोजी, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रारंभाला 250 वर्षे पूर्ण झाली. अनेक इतिहासकार 2024 सालापासूनच त्यानिमित्ताने पुस्तके, विशेष लेख लिहीत आहेत. जॉन फर्लिंग हे वेस्ट जॉर्जिया विद्यापीठातले मानद प्राध्यापक, अमेरिकन राज्यक्रांती या विषयाचे तज्ज्ञ आहेत. काउंट व्हर्झान उर्फ चार्ल्स ग्रॅव्हिये याला त्यांनी, अमेरिकेचा विस्मृत ‘फाउंडिंग फादर’ म्हणून गौरविले आहे.