पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हिंसेचा चेहरा उघड करतो. निर्दोष पर्यटकांवर केलेला हा हल्ला भारताच्या शांततेच्या प्रयत्नांवरचा आघात आहे. या हल्ल्याने काश्मीरच्या पर्यटन व्यवस्था आणि स्थानिक अर्थचक्रालाही बाधा उत्पन्न केली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू पाणी करार स्थगितीचा घेतलेला निर्णय म्हणजे, पाकिस्तानच्या उद्दामपणाला प्रत्यक्ष कृतीने उत्तर देण्याची वेळ आल्याचे चिन्ह आहे. दहशतवादाला आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक पातळीवर तोडगा काढण्याची ही सुरुवात आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधू पाणी करार आणि दहशतावादाचा पर्यटनावर होणारा परिणाम यांचा घेतलेला आढावा...
22 एप्रिल 2025 रोजी काश्मीर खोर्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. 28 हिंदू पुरुष पर्यटकांची धार्मिक ओळख पडताळून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्याचबरोबर इतरही एकूण पाच निर्णय घेतले. आता पाकिस्तानच्या शेतीला सिंधूचे पाणी मिळणार नाही, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होईल. पाकिस्तानमधील वीज निर्मितीसाठी मिळणारे पाणीही उपलब्ध असणार नाही. अशाप्रकारे पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला मिळणार नाही, यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. हा भारताचा आजवरचा, पाकिस्तानसंबंधातील सर्वांत कठोर निर्णय ठरावा. 1947 साली ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार युद्धे झाली. ही युद्धे होऊनही भारताने सिंधू पाणीवाटप करार कायम ठेवला होता. यावेळी मात्र, भारताने तो तत्काळ स्थगित केला. यावरून भारताने हा प्रश्न किती गांभीर्याने घेतला आहे, ते लक्षात यावे. सिंधू पाणीवाटप करार, पाकिस्तानला झुकते माप देणारा होता. तरीही भारताने मोठ्या मनाने त्याला रद्द करण्याची कारवाई आजवर केली नव्हती.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ‘सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समिती’ने सिंधू पाणी करार स्थगित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर असा संदेश दिला आहे की, जर भारत आणि पाकिस्तानमध्ये भविष्यात कधीही कोणताही संबंध निर्माण झाला, तरी त्यात दहशतवादाला किंचितही स्थान असता कामा नये. पाकिस्तानमध्ये एकूण भूभागापैकी, शेतीयोग्य जमीन फार मोठ्या प्रमाणात आहे. या संपूर्ण क्षेत्राला, सिंधू व तिच्या उपनद्यातून सिंचनाचे पाणी मिळते. पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान 23 टक्के आहे. याचाच आधार 68 टक्के पाकिस्तानी लोकांना मिळत असतो. अशा परिस्थितीत सिंधू पाणीवाटप करार स्थगित होताच, सामान्य लोकांची अवस्था अतिशय बिकट होईल. पाकिस्तानचे अर्थकारण शेतीवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने, त्याची अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. पाकिस्तानमध्ये मंगल आणि तरबेला असे दोन जलविद्युत प्रकल्प आहेत. त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे, पाकिस्तानचे वीज उत्पादन 50 टक्क्यांनी कमी होईल. औद्योगिक उत्पादनालाही नुसती वीजच नाही, तर पाणीही लागतेच. ते कमी प्रमाणात मिळू लागताच उत्पादन कमी होऊन, कामगार कपात करावी लागेल आणि बेरोजगारी वाढेल. भारत पाणीवाटप करार चालूच ठेवेल असे पाकिस्तानला पूर्वानुभवाच्या आधारे वाटले असेल, म्हणूनच पाकिस्तानने पहलगावच्या दहशतवादी कारवाईला खतपाणी घातले असणार, हे उघड आहे. पण, भारताची कठोर कारवाई पाहताच पाकिस्तान पुरता भेदरला असून, बेछुट विधाने करतो आहे. भारताच्या पाणी बंद करण्याच्या कृतीला पाकिस्तानने ‘अॅन अॅक्ट ऑफ वॉर’ ठरवावे, यावर टिप्पणी करण्याची आवश्यकता नसावी.
झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या पाच नद्या, सिंधूच्या मुख्य उपनद्या आहेत. सिंधू तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहते. सिंधू संस्कृतीचा उगम, याच नदीच्या किनार्यांवर झाला आहे. हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. ‘हिंदू’ व ‘हिंदुस्थान’ हे शब्द याच नदीवरून पडले आहेत, अशी मान्यता आहे. सिंध प्रांताचे नावही, सिंधू नदीवरूनच पडले आहे. अशा या अनन्यसाधारण नदीतील पाण्याच्या वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशात कराची येथे दि. 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू पाणीवाटप करार होऊन, भारताच्या वाट्याला सिंधू नदीचे फक्त 20 टक्के पाणी मिळावे आणि पाकिस्तानला 80 टक्के पाणी मिळावे, असा करार झाला होता. समान पाणी वाटपाऐवजी नद्यांचे समान वाटप, म्हणजेच तीन नद्या पाकला व तीन नद्या भारताला असे भोळसटपणे आपण मान्य केल्यामुळे हा अनर्थ घडून आला. या सर्वांत मोठी सिंधू नदी पाकिस्तानच्या वाट्याला गेल्यामुळे, अति विषम पाणीवाटप घडून आले. पण, तरीही भारताच्या उदारपणामुळे आणि समजूतदारपणामुळे, हा विषम करार आजवर सुरळीतपणे अमलात आला आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व अध्यक्ष अयूब खान यांनी, या करारावर स्वाक्षर्या केल्या होत्या. जागतिक बँकेने (त्यावेळची इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट) यावेळी मध्यस्ती केली.
पाकिस्तानला ही भीती वाटत होती की, सिंधू नदीचा उगमच केवळ भारतात झाला आहे, असे नाही तर तिचे खोरेसुद्धा भारतात फार मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे उद्या जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर (जशी आज झाली आहे) भारत सिंधूचे व तिच्या उपनद्यांचे पाणी अडवून, पाकिस्तानमध्ये पाणीटंचाई व दुष्काळ निर्माण करू शकेल. पण, हा करार करताना आपण पाकिस्तानला झुकते माप दिले होते आणि दुसरे म्हणजे, आपल्या भोळसटपणाचाही पाकिस्तानला अनुभव होता. त्यामुळे वाद असे झालेच नाहीत. थोड्याफार कुरबुरी व त्याही पाकिस्तानकडूनच झाल्या. पण, भारताची भूमिका जास्तच समजूतदारपणाची असल्यामुळे, पाणीवाटपप्रश्नी फारसा गाजावाजा झालाच नाही. हा जगातला जलविभागणीचा एक अतिशय चांगला, सामंजस्यावर आधारलेला व यशस्वी झालेला करार समजला जातो. खरे तर करारात ज्याची तरतूद झाली होती, ते समान पाणीवाटप प्रत्यक्षात झालेच नव्हते. कारण, सिंधू नदीच्या 80 टक्के पाण्यावर मोठ्या प्रमाणावर आपला हक्क असतानासुद्धा, आपण उदार आणि समजूतदारपणाची भूमिका स्वीकारून व पंजाबमधली आपली शेती तहानलेली ठेवून, पाकिस्तानला ते पाणी बहाल केले होते. याच्या मोबदल्यात या दोन देशांचे संबंध स्नेहाचे झाले असते, तर हा आतबट्ट्याचा व्यवहारही पत्करायला हरकत असायचे कारण नव्हते. आंतरराष्ट्रीय संबंधात शांततेचे वातावरण निर्माण होत असेल, तर असा व्यवहारही कुणीतरी मनाचा मोठेपणा दाखवून स्वीकारला पाहिजे, हे खरेच आहे. पण, तसे झाले नाही. करार करून आपली बाजू बळकट होते न होते तोच आणि कराराच्या कागदावरची शाईही वाळली नसतानाच, पाकिस्तानने काश्मीरमध्ये कुरापती काढणे, बोचकारे घेणे, ओरबाडणे, दहशतवादी पाठविणे सुरू केले व ते आजवर सुरुच आहे. पाकिस्तानाने भारताला सतत रक्तबंबाळ केले आहे, निरपराध्यांचे बळी घेतले आहेत, भारतीय सैनिकांना मारून, त्यांच्या शवांचीही मरणोत्तर विटंबना केली आहे. मानवी बॉम्ब वापरून रक्तपात घडवला आहे.
सिंधूनंतर सतलज ही सर्वांत मोठी उपनदी आहे. या नदीवर भाक्रा-नांगल धरण आहे. झेलम नदीच्या काठावर, जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर वसलेली आहे. सिंधू नदीचा उगम हिमालयामध्ये कैलासहून 0.5 किमी उत्तरेस, सेंगेखबबच्या स्रोतांमध्ये आहे. आपल्या उगम स्थानातून निघून ती तिबेट पठाराच्या रूंद घाटातून, काश्मीरच्या सीमेला पार करून, पाकिस्तानातील वाळवंटी आणि सिंचनाखालील भूभागातून वाहत, कराचीच्या दक्षिणेकडील अरबी समुद्राला मिळते. झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य उपनद्याही आहेत. मार्चमध्ये बर्फ वितळल्यामुळे, या नद्यांना पूर येतात. शिवाय पावसाळ्यात मोसमी वार्यामुळे, पाण्याची पातळी वाढते. सन 1932 मध्ये सक्करमध्ये, सिंधू नदीवर धरण बांधले गेले. एकूण काय, पाणीच पाणी! याद्वारे 50 लाख एकर जमिनीचे सिंचन केले जाते. जिथे जिथे सिंधू नदीचे पाणी अशाप्रकारे सिंचनासाठी उपलब्ध आहे, तिथे तिथे गव्हाची शेती प्रामुख्याने होते आणि त्या व्यतिरिक्त कापूस, ऊस आणि अन्य-धान्याचीही शेती होते. तसेच, जनावरांसाठी गायरान निर्माण होते.
पाकिस्तानची दानत किंवा नियत जशी ठीक नाही, तशी कुवतही कमजोर ठरली. भारताने पाणी उदंड दिले हो! पण, पाकला ते अडवताच आले नाही. जागतिक बँकही बेजार झाली. शेवटी पैसा व अक्कलही उधार उसनवारीने आणून, पाकिस्तानचे घोडे एकदाचे गंगेत (नव्हे सिंधूत) न्हाले. लिलिएंथल यांची अक्कल व चतुराई फळाला आली, नाहीतर पाकिस्तानचे रखरखीत वाळवंट झाले असते. हे सर्व घडत असताना, भारताचीच भूमिका शास्त्राधारीत, उदारपणाची व समजूतदारपणाची होती. या उलट पाकिस्तानची अक्षमता आणि मुजोरी वेळोवेळी उघड होत होती. पाकिस्तान भारताशी कांगावखोरपणाने वागत होता आणि भारत उदारमनान हे सर्व सहन करीत होता. पण दि. 22 एप्रिल 2025 रोजी या सहनशीलता आणि उदारतेचा कडलोट झाला. पशुतेची कमाल अनुभवाला आली (चुकले, पशूही असे आणि इतके क्रूर आणि हृदयशून्य नसतात) आणि भारताने एका पाठोपाठ एक असे पाच दणके पाकच्या पेकाटात हाणले.
1) सिंधू (पूर्ण लांबी 3,180 किमी; त्यापैकी तिबेटमध्ये 300किमी; भारतात 709 किमी; पाकमध्ये 2,171 किमी) गिलगित मधून पाकिस्तानात वाहत जाते.
2) झेलम (पूर्ण लांबी 724 किमी; त्यापैकी भारतात 402 किमी; पाकमध्ये 322 किमी)
3) चिनाब (पूर्ण लांबी 1,180 किमी; भारतात 500 किमी; पाकमध्ये 680 किमी) काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये जातात आणि मग त्यांचा संगम होतो.
4) या संयुक्त नदीला भारतातून वाहत आलेली रावी (पूर्ण लांबी 725 किमी; भारतात 250 किमी; पाकमध्ये 500 किमी) मिळते. या तीन नद्यांची मिळून बनलेली नदी सतलजला मिळते.
5) सतलजला बियास (पूर्ण लांबी 470 किमी) नदी मात्र भारतातच मिळते.
6) असे एकूण पाच नद्यांचे पाणी घेऊन सतलज (पूर्ण लांबी 1,450 किमी; भारतात 1,050 किमी; पाकमध्ये 400 किमी) सिंधूला मिळते.
- वसंत काणे
९४२२८०४४३०