पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर!
सर्व व्हिसाधारक आणि अवैध पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु; मुख्यमंत्र्यांची माहिती
26-Apr-2025
Total Views | 19
पुणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले असून सर्व व्हिसाधारक आणि अवैध पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जे लोक व्हिसा घेऊन इथे आले आहेत त्यांची सगळी माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटली असून त्यांना नोटीस दिली आहे. त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झाली असून ते सगळे परत जात आहेत. कुणी अवैधरित्या आले असल्यास त्यांना शोधण्याची प्रक्रियासुद्धा निरंतर सुरु असते. पण ज्याप्रमाणात अवैध बांग्लादेशी सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी सापडत नाहीत. त्यामुळे सध्या जे लोक व्हिसा घेऊन आले आहेत त्यांना ४८ तासांत बाहेर काढणे यावर जोर असून त्यावर पोलिस काम करत आहेत."
"पाकिस्तानची निर्भरता भारतावर आहे हे तिथल्या सरकारला समजायला हवे. त्यामुळे ज्याप्रकारे ते दहशतवादाला समर्थन देतात आणि मानवतेचा खून करतात आज जगातील कुठलाही देश पाकिस्तानसोबत उघडपणे उभा राहू शकत नाही ही त्यांची परिस्थिती आहे. पाकिस्तानकडे खायला पैसे नाहीत आणि ते न्युक्लिअर बॉम्बच्या बाता सांगतात. पाकिस्तान सिंधू नदीच्या पाण्यावर निर्भर असून भारताने हे पाणी अडवणे सुरु केल्यास पाकिस्तानवर तहानेने मरण्याची वेळ येईल. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहेत. त्यांना देशाप्रति काहीही वाटत नाही आणि मला अशा लोकांची कीव येते," अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "आसावरी जगदाळे यांनी पहलगाम येथील परिस्थितीचे ज्याप्रकारे वर्णन केले त्यामुळे कुणाचेही मन हेलावून जाईल. गणबोटे आणि जगदाळे परिवारासोबत जे झाले ते अनाकलनीय आहे. त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर आतंवादाशी लढण्याचा निर्णय अजून मजबूत झाला आहे. पहलगाममध्ये मृत पावलेल्या महाराष्ट्रातील ६ जणांच्या परिवारांना आवश्यक ती सगळी मदत राज्य सरकार करेल," असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.