
22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगामच्या बैसरण खोर्यात दहशतवाद्यांनी निरपराध, बेसावध पर्यटकांवर निर्घृण हल्ला केला. पर्यटक मुस्लीम नाहीत, याची खात्री करूनच दहशतवाद्यांनी त्या निष्पाप हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळ्या झाडल्या. हे एकप्रकारे ‘टार्गेटेड किलिंग’ होते. म्हणजेच हा केवळ अंदाधुंद गोळीबार नव्हता, तर यामध्ये स्थानिक इस्लामी व्यावसायिकांना कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. त्यामुळे पद्धतशीरपणे हिंदू पर्यटकांना निवडून मारले गेले. माणुसकीला काळिमा फासणारी अशी ही दुर्दैवी घटना. पुरुषांना ठार करून, महिलांना जिवंत ठेवून दहशतवाद्यांनी दुहेरी डाव साधला. महिला आणि मुलांना ठार मारले गेले नाही, ते कोणतीही दयामाया दाखवायची म्हणून नव्हे, तर ही हिंदू महिला-मुले आयुष्यभर स्वकीयांच्या मृत्यूचे दुःख वाहत राहतील, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून. तसेच, महिला-मुलांना जीवनदान दिल्यास सामान्य मुस्लीम जनतेच्या नजरेतून आपण पूर्णपणे उतरणार नाही, याचीही काळजी या दहशतवाद्यांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी घेतलेली दिसते. याप्रकारेच पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी ‘टार्गेटेड किलिंग’च्या माध्यमातून, ज्यूंची हत्या करून क्रौर्याची परिसीमा कधीच गाठली आहे. इस्रायलच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. आता भारताच्या इतिहासातसुद्धा याची नोंद ठळकपणे होऊ लागलेली आहे, यातून भविष्याचा अंदाज बांधावा.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला म्हणजे, देशाच्या सार्वभौमत्त्वावर चढवलेला हल्ला. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. संपूर्ण खोर्यात बंद पाळला गेला. पण, खरे तर दहशतवाद्यांना स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय इतक्या मोठ्या कारस्थानाला पूर्णत्वास नेणे शक्य नाही. शिवाय, स्थानिकांमध्ये एकरूप होऊन हल्ल्याच्या ठिकाणची ‘निवड’ आणि आधी ‘रेकी’ केली गेली असण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे, तर स्थानिकांच्या मदतीनेच दहशतवाद्यांनी आपली ओळख लपवण्यात आणि कट रचण्यात यश मिळवले, म्हणूनच अस्तनीतील निखारे आधी ओळखले पाहिजेत. काश्मीरमध्ये दगडाखाली जे विंचू आहेत, त्यांना आधी ठेचले पाहिजे. सापशिडीच्या डावात साप तर विषारी आहेतच; पण शिडी देणारेसुद्धा तेवढेच दोषी आहेत. कारण, या शिडीमुळेच दहशतवादी त्यांच्या निश्चित लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात.
मुळात या निरपराध पर्यटकांवर हल्ला का केला गेला? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. पर्यटकांवर हल्ला केला गेला, कारण ते ‘सॉफ्ट टार्गेट’ आहेत. दहशतवाद्यांना असे ‘टार्गेट’ हवे असते, ज्याला लक्ष्य करणे त्यांना सोपे आहे. ज्यांना कोणतीही सुरक्षा दिली गेलेली नसते, जे बेसावध असतात. पहलगामलाही तेच झाले.
पर्यटन आणि दहशतवाद
दहशतवादी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निरपराध लोकांचा बळी घेतात. जगात पर्यटन हा अत्यंत प्राचीन काळापासूनचा व्यवसाय. धार्मिक पर्यटन हा प्रकार त्यात सर्वत्र आढळतो. देवदर्शनासाठी कुटुंबासह प्रवास करणे, ही परंपरा तर हजारो वर्षे जुनी आहे.
मुळात पर्यटन करणारे हे उत्तम प्रवास अनुभव जतन करणे, आपल्या कुटुंबासह आनंदाचे काही क्षण साजरे करणे, या हेतूने फिरत असतात. पर्यटन हा केवळ विरंगुळा नाही, अनेकांची ती मानसिक-भावनिक गरज असते. अनेकांना संशोधन, फोटोग्राफी, खाद्यसंस्कृती, वारसास्थळांना भेट देणे, अशा अनेक कारणांनी पर्यटन करायचे असते. पर्यटन हे आज जगातील महत्त्वाच्या उद्योगांपैकी एक आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सहली असो की कॉर्पोरेट ट्रेनिंग असो, पर्यटनाचे अनेक प्रकार असून, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्यटनातून मोठी रोजगार निर्मिती होते. अगदी ‘होम-स्टे’द्वारेसुद्धा, आज अनेकजण पैसा उभा करीत आहेत. स्थानिकांना मोठीच समृद्धी पर्यटनाद्वारे मिळू शकते. पर्यटक हे नेहमी ‘सुरक्षित पर्याय’ निवडतात. ज्या ठिकाणी उत्तम निसर्गसौंदर्य असते, त्या ठिकाणांना नेहमीच पर्यटकांची पसंती असते. ज्या ठिकाणी शांत, सुरक्षित वातावरण आणि स्थिर राजकीय परिस्थिती असते, तेथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात, असे हे साधे समीकरण.
परंतु, दहशतवादी जेव्हा त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निरपराध पर्यटकांचा बळी घेतात, तेव्हा त्या ठिकाणची अर्थव्यवस्थाही कोलमडते. साधारणपणे 1990 सालानंतरच्या जागतिक परिस्थितीचा विचार केल्यास, दहशतवादाने ग्रासलेल्या भागातील पर्यटन घटत गेले. ‘सुरक्षा’ हीच पर्यटकांची पहिली अट असते. त्यावरून एखाद्या ठिकाणी भेट द्यायची अथवा नाही, याबाबत त्यांचा निर्णय होत असतो. दहशतवाद, राजकीय अस्थैर्य ज्या ठिकाणी आहे, तेथे पर्यटनाचा विकास होऊ शकत नाही. थोडक्यात, स्थैर्य आणि पर्यटकांची स्थान-निवड यांचा अगदी जवळचा संबंध असतो.
जम्मू-काश्मीर : दहशतवाद आणि पर्यटन
जम्मू-काश्मीर हे निसर्गसौंदर्याने नटलेले असल्यामुळे, ते पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते. तेथील अर्थव्यवस्थेचा पर्यटन हाच प्रमुख घटक. पण, 1990 सालापासून काश्मीरमध्ये पर्यटनाला फटका बसला. कारण, याच काळात दहशतवादी कारवाया, काश्मीर खोर्यात वाढल्या होत्या. साधारण 1989 साली 5 लाख, 50 हजारांच्यावर असणारी पर्यटकांची संख्या, 1996 साली दहा हजारांच्याही खाली आली. या दरम्यान, परकीय पर्यटकांचे आगमनसुद्धा खूप कमी झाले. लडाखमध्येही असेच चित्र दिसून आले. त्यावेळी जम्मूमध्ये पर्यटकांचे हेच प्रमाण, 24 लाखांवरून 21 लाखांवर आले. नंतर अनेक वर्षे, पर्यटन व्यवसायात चढउतार होत गेले. दहशतवादी हल्ले झाल्यानंतर पर्यटनाला खीळ बसते. उदा. दि. 21 मार्च 2000 रोजी, अनंतपूरमधील चात्तीसिंघपुरा येथील शिखांना लक्ष्य केले गेले. जुलै 2001 साली अनंतनाग येेथे, शेषनाग बेस कॅम्पवर हल्ला केला गेला. हे यात्रेकरूच होते. काश्मीरच्या दहशतवादात, पर्यटक अनेकदा भरडले गेले आहेत. मोदी सरकार आल्यापासून दहशतवादाला चपराक बसवली गेली.
पहलगाम हल्ल्याचा विचार केल्यास, या हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असणारा द्वेषसुद्धा दिसून आला. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून, त्यांनी जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी कठोर निर्णय घेतले. ‘कलम 370’ रद्द करणे हा त्याचाच एक भाग. त्याच्या विरोधात खोर्यात असणारा असंतोष, या हल्ल्यातून दिसून आला. दहशतवाद्यांना या हल्ल्यातून हाच संदेश होता की, ‘कलम 370’ रद्द केल्यावरसुद्धा काश्मीरमध्ये दहशतवाद संपलेला नाही. केंद्र सरकारने विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना खीळ बसवणे, हा त्यांचा कुटिल हेतू.
पर्यटकांवर हल्ला चढवून दहशतवाद्यांना पुढील गोष्टी साध्य करायच्या असतात,
1) राजकीय हेतू
2) नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे
3) मानसिक खच्चीकरण
4) आर्थिक नुकसान
5) पर्यटनस्थळाविषयी नकारात्मक प्रतिमा
6) स्थानिक आणि पर्यटक यांच्यात दहशत निर्माण करणे
जागतिक पातळीवरील दहशतवादी हल्ले आणि पर्यटन-एक दृष्टिक्षेप
1) इजिप्त : दि. 29 मार्च 1993 रोजी, खाफ्रेचा पिरामिड येथे ‘अल जामा अल इस्लामिया’ या दहशतवादी संघटनेने स्फोट घडवला, तर दि. 8 जून 1993 रोजी, जगप्रसिद्ध गिझाच्या पिरामिडला भेट देणार्या पर्यटकांच्या बसवर हल्ला केला गेला.
ल्युक्सोर हत्याकांड - दि. 17 नोव्हेंबर 1997 रोजी इजिप्त येथे ‘अल जामा अल इस्लामिया’ या दहशतवादी संघटनेने, 62 जणांना ठार केले होते. हा अत्यंत भयंकर मोठा हल्ला मानला जातो. ‘डेर अल बाहरी’ या पुरातत्त्व ठिकाणी पर्यटकांवर हल्ला केला गेला. 1996 साली ग्रीक पर्यटकांवर कैरो येथे हल्ला झाला. आता गेल्या काही वर्षांतसुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. दि. 19 सप्टेंबर 2008 रोजी पर्यटकांना वाळवंटात ओलीस ठेवले गेले होते, तर दि. 28 डिसेंबर 2018 रोजी व्हिएतनामी पर्यटकांवर, गिझाच्या पिरामिडजवळ हल्ला केला गेला. सिनाई भागातसुद्धा दहशतवाद्यांनी 2014 साली हल्ले केलेले आहेत.
2) तुर्कीये : दि. 24 नोव्हेंबर 2015 रोजी तुर्कीयेने सीरियाच्या सीमेवरील रशियाचे विमान पडले. त्यानंतर रशियाने अनेक निर्बंध तुर्कीवर लादले होते. रशियाने त्यांच्या पर्यटन व्यावसायिकांनासुद्धा तुर्कीचे पर्याय देऊ नये, असे बजावले होते. त्यामुळे तुर्कीयेच्या, विशेषतः आतल्या भागातील पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला. 2016 साली पर्यटकांची संख्या 76 टक्क्यांनी घटली. 2015 आणि 2016 साली ‘इसिस’ आणि ‘पीकेके’ या दहशतवादी संघटनांनीसुद्धा हल्ले चढवले होते. दि. 12 जानेवारी 2016 रोजी, सुलतानहमेट येथे आत्मघातकी हल्ला आणि दि. 13 मार्च 2016 रोजी ’इस्तिकलाल शॉपिंग स्ट्रीट’ यात अनेक पर्यटकांना ठार केले गेले होते. यानंतर अनेक घडामोडींमुळे, तेथील पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसला होता.
3) जर्मनी : जर्मनी म्युनिक ऑलिम्पिक चालू असताना इस्रायलच्या खेळाडूंना ओलीस धरून, नंतर ठार मारले गेले होते. येथील
दि. 5 व दि. 6 सप्टेंबर 1972 रोजी, या हल्ल्याच्या मागे ‘ब्लॅक सप्टेंबर’ या दहशतवादी संघटनेचा हात होता. या विरोधात इस्रायलने नंतर ‘ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड’ चालवून यातील सर्व दहशतवाद्यांना त्यांच्या देशातच काय, शयनगृहात घुसून ठार मारलेले आहे. हे ऑपरेशन अनेक वर्षे चालू होते.
4) युरोप : युरोपमध्येही अनेकदा दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. ब्रुसेल्स, पॅरिस, लंडन तसेच बार्सिलोना यांसारख्या पर्यटनस्थळी, दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामुळे आर्थिक विकासाला खीळ बसते तसेच, पर्यटनावरही विपरीत परिणाम होतो. पर्यटनाचा निर्णय, सुरक्षा, पर्यटन स्थळाची निवड अशा अनेक गोष्टींवर, त्याचा प्रभाव पडतो. पर्यटन स्थळाची प्रतिमा डागाळते.
जागतिक इतिहासाचा आढावा घेतल्यास आढळते की, दहशतवाद्यांनी पर्यटनस्थळांवर अनेकदा हल्ले केले गेले. या सर्व हल्ल्यांचा उल्लेख करणे शक्य नाही. परंतु, काही हल्ल्यांचे विवेचन करणे गरजेचे आहे.
1) बाली : दि. 12 ऑक्टोबर 2002 रोजी इंडोनेशियातील बाली बेटांवरील कुटा या खास पर्यटनासाठी प्रसिद्ध असणार्या जिल्ह्यावर, ‘जेमाह इस्लामिया’ या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केला. त्यावेळी तिथे अनेक ऑस्ट्रेलियन क्रीडा संघ, सुट्टीचा आनंद घेत होते. तिमोरच्या स्वातंत्र्याविषयी, ऑस्ट्रेलियाची असणारी भूमिका दहशतवाद्यांना मान्य नव्हती.
2) ट्युनिशिया : दि. 18 मार्च 2015 रोजी इस्लामिक स्टेटने, बार्डो म्युझियमवर हल्ला चढवून युरोपियन पर्यटकांना ओलीस धरले होते.
3) इजिप्त, सिनाई : दि. 31 ऑक्टोबर 2015 रोजी ‘इसिस’ने, रशियन प्रवासी विमान पाडले होते.
4) ब्रुसेल्स, झावन्तेम विमानतळ आणि मिलबीक मेट्रो : दि. 22 मार्च 2016 रोजी ‘इस्लामिक स्टेट’ने हल्ला केला. यामध्ये सामान्य प्रवाशांचा मृत्यु झाला. बेल्जियमच्या दहशतवादविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी, हा हल्ला केला गेला.
5) इस्तंबूल विमानतळ : दि. 28 जून 2016 रोजी कुर्दिश फ्रीडम हॉक्सने, बेयाझीत स्क्वेअर या पर्यटन स्थळाजवळ हल्ला केला होता.
6) फ्रान्स, नाईस, प्रोमेनेड देस : दि. 14 जुलै 2016 रोजी बॅस्टील डे साजरा करण्यासाठी जमलेल्या पर्यटकांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना चिरडले गेले.
7) सेंट पीटर्सबर्ग मेट्रो : दि. 3 एप्रिल 2017,
8) मँचेस्टर, कोन्सर्ट हॉल : दि. 22 मे 2017,
9) बार्सिलोना आणि काम्ब्रील्स : दि. 17 आणि दि. 18 ऑगस्ट 2017 रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला.
अशी ही यादी खूप मोठी आहे. यात प्रवासी, पर्यटक यांना लक्ष्य केले गेले. काही ठिकाणी याचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटनावर झाला आहे. दहशतवाद्यांनी जगभरातील पर्यटकांना अनेकदा लक्ष्य केले आहे. त्यावर संशोधनसुद्धा झालेले आहे.
थोडक्यात संशोधकांचे निष्कर्ष
1) गुडरीच 2002, ड्राकोस आणि कुटन (2003) यांचा अभ्यास दर्शवतो की, सायप्रस येथे 1990 साली 3.38 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली होती. पण, दहशतवादाच्या भीतीमुळे 1991 साली ही संख्या 2.94 दशलक्ष इतकी घसरली.
2) एंडर्स (1992) यांच्या अभ्यासात आढळते की, पर्यटक आपले पर्यटनस्थळ, निर्णय त्वरित बदलतात. दहशतवादी हल्ला झाल्यावर तीन ते नऊ महिने पर्यटक तिथे फिरकत नाहीत, असे 1992 साली झालेल्या अभ्यासात आढळले होते.
3) गयू आणि मार्टिन (1992) यांच्या अभ्यासात असे दिसून आले की, मध्य-पूर्व आणि युरोपात दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची संख्या घटली होती. त्यांनी 1971 ते 1984 या दरम्यानच्या पर्यटकांच्या भेटींचा अभ्यास केला होता.
4) ड्राकोस आणि कुटन (2003) यांनी 1991 ते 2000 सालापर्यंत केलेल्या अभ्यासातसुद्धा असे आढळले होते की, दहशतवाद आणि पर्यटनाचा जवळचा संबंध आहे. इस्रायल आणि तुर्कीये येथील पर्यटन व्यवसाय जास्त संवेदनशील आहे. पर्यटक आपले पर्यटनस्थळ त्वरित बदलवतात. फिरणे चालू असते पण, ते पर्यायी ठिकाणी भेट देतात.
5) बोनहेम (2006) यांनी 9/11च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर, तेथील आणि हवाई बेटांवरील पर्यटनाचा अभ्यास केला गेला. त्यात त्यांच्या असे लक्षात आले की, अमेरिकेतील पर्यटकांचा प्रवाह कमी होऊन, हवाई बेटांवरील पर्यटकांचा ओघ वाढला होता.
6) आरणा आणि लिओन (2008) यांच्या अभ्यासात आढळून आले की, ट्युनिशिया आणि तुर्कीये या इस्लामी देशांवर होणारा परिणाम, कॅनरी बेटांच्या तुलनेत जास्त मोठा होता.
7) न्यूमेअर (2004) यांच्या अभ्यासात असे आढळून आले की, राजकीय हिंसाचाराचासुद्धा मोठा परिणाम पर्यटनावर होतो. पर्यटक समान निसर्गसौंदर्य असणारे, पण दुसरे पर्यटनस्थळ निवडून आपली भटकंतीची भूक भागवतात.
8) याया (2009) यांनी तुर्कीयेच्या पर्यटनाचा अभ्यास केला होता. त्यांनी तुर्कीये आणि स्पेनचा अभ्यास केला. स्पेनच्या माद्रीतवरील दहशतवादी हल्ल्यानंतर, स्पेनला भेट देणारे पर्यटक घटले. पण, नंतर तुर्कीयेला येणारे पर्यटक वाढले.
9) क्लान्सी (2012) यांच्या अभ्यासात दिसले की, लेबेनॉन आणि सीरिया येथील अस्थैर्यामुळे, दुबईला पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
समारोप
पर्यटनक्षेत्रात होणारी थेट परकीय गुंतवणूक आणि दहशतवाद, यांचासुद्धा संबंध असतो. दहशतवादी हल्ल्यामुळे त्या ठिकाणची अर्थव्यवस्थाच कोलमडते. राजकीय स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा असल्याशिवाय, आर्थिक विकास होऊ शकत नाही. विशेषतः पर्यटन क्षेत्रात, तर पर्यटक हाच घटक महत्त्वाचा असल्यामुळे आणि थेट मानवी जीवन गुंतल्यामुळे ते जास्त संवेदनशील असते.
काश्मीरच्या पर्यटन विकासाला पहलगाम हल्ल्याने खीळ बसणार आहे, यात शंका नाही. काही अवधी गेल्यावर पुन्हा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास पर्यटक येऊ लागतील सुद्धा. फक्त किती काळ प्रतिक्षा करावी लागेल, हाच खरा प्रश्न आहे.
रुपाली कुलकर्णी-भुसारी
९९२२४२७५९६