"नव्याने इतिहास लिहिण्याची तुमची खोड जाणार नाहीच पण..."; चित्रा वाघ यांचा राहुल गांधींना टोला
26-Apr-2025
Total Views | 28
मुंबई : इतिहास नव्याने लिहिण्याची तुमची खोड जाणार नाहीच पण जमलं तर इतिहास वाचा तरी, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना लगावला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना चांगलेच फटकारले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. राहुल गांधीचे स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान खटल्यासंदर्भात न्या. दीपांकर दत्ता, न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने चांगलेच कान खेचले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तोंडाला येईल ते बोलणाऱ्या राहुल गांधींना संविधान म्हणजे काय हे आज समजले असेल. इतकी वर्ष फक्त स्वतःच्या परिवारानेच लढा दिला आहे अशा आविर्भावात वावरत देशाच्या इतर क्रांतिकारकांवर तुम्ही अन्याय केला आहे. इतिहास नव्याने लिहिण्याची तुमची खोड जाणार नाहीच पण जमलं तर इतिहास वाचा तरी," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "राहुलजी तुमची आजी इंदिराजी गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांची प्रशंसा करणारे पत्र लिहिले होते, हे तुमच्या ऐकिवात तरी आहे का? महात्मा गांधी जेव्हा व्हॉईसरॉयला पत्र लिहायचे, तेव्हा खाली युवर फेथफुल सर्व्हंट असे लिहायचे. तुमच्या सारख्याच बालक बुद्धीचा उद्या कुणीतरी म्हणेल महात्मा गांधी हे ब्रिटीशांचे नोकर होते. पण जसे ते देशाचे महात्मा गांधी आहेत तसेच याच देशाचे स्वातंत्र्यवीर सावरकर देखील आहे. हे कधीच विसरू नका," असेही चित्रा वाघ म्हणाल्या.