आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
26-Apr-2025
Total Views | 22
मुंबई : आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "भारतीय स्वातंत्र्याच्या रणभूमीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याच्या अंधाऱ्या काळकोठडीतून विचारांचा प्रकाश दिला. त्या महापुरुषांवर राहुल गांधींनी ब्रिटिशांचा सेवक अशी टीका करत आपल्या वैचारिक दारिद्र्याची आणि इतिहासद्रोहाची पातळी दाखवून दिली होती."
"आता सुप्रीम कोर्टानं जी झणझणीत कानउघाडणी केली ती योग्यच आहे. ही फटकार केवळ न्यायालयीन नाही तर राष्ट्रभावनेचीच प्रतिक्रिया आहे. त्यामुळे आता तरी त्यांचं डोकं ताळ्यावर येईल. अशी अपेक्षा आहे. राहुल गांधींनी आणखी एक लक्षात घ्यावं की, शब्द हे शस्त्र असतात आणि शस्त्र हाताळताना विवेक हवा. अन्यथा ते तुम्हाला जखमी केल्याशिवाय राहत नाहीत," असा सल्लाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींना दिला.