श्रीनगर : (Pahalgam Attack) पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने तपासाला सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील रहिवासी आसिफ शेख हा हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. पोलीस व एनआयएच्या एक पथकाने आसिफच्या त्राल येथील घरी छापा टाकला. पोलीसांवा आसिफच्या घरात तपासादरम्यान काही संशयित वस्तू व स्फोटके आढळली. त्याचदरम्यान या घरात मोठा स्फोट होऊन घर उद्ध्वस्त झाले.
माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार, आसिफ शेख हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा स्थानिक कमांडर आहे. गुरुवारी २४ एप्रिलला रात्री पोलीस व इतर सुरक्षा दल त्राल येथील आसिफ शेख याच्या घरात तपास करत असतानाच त्यांना तिथे काही संशयित वस्तू आढळल्या होत्या. घरात स्फोटके पाहिल्यानंतर पुढचा धोका ओळखून पोलीस व सुरक्षा दलाचे जवान मागे हटले तेवढ्यात घरात मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात आसिफचे घर बेचिराख झाले. पोलिसांनी सांगितले की घरात आम्हाला स्फोटक दिसली होती जी आम्ही जप्त करण्याआधीच स्फोट झाला. पोलीस व संरक्षण यंत्रणा शोधमोहिमेसाठी या घरांवर छापा टाकून तपास करतील याचा अंदाज घेऊन आधीच दहशतवाद्यांनी इथे स्फोटके ठेवली असणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त
दरम्यान, बिजबेहारातील गुरी येथे लष्कर-ए-तोयबाचा आणखी एक दहशतवादी आदिल ठोकर, ज्याला आदिल गुरी म्हणूनही ओळखले जाते, त्याचे घरही बुलडोझरने पाडण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातही ठोकरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बिजबेहाराचा रहिवासी आदिल ठोकर २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला होता, जिथे त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी तो या प्रदेशात परतला होता आणि तेव्हापासून तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असल्याने गुप्तचर संस्थांच्या रडारवर आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\