नोकरी मिळवणे, नोकर्यांच्या स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणे, नोकर्यांच्या या अफाट बाजारात आपल्यासाठी योग्य नोकरी शोधणे, हे आजच्या युगात आव्हानात्मकच. त्यात विशेषत: ग्रामीण भागातून शहरात नोकरीसाठी वणवण फिरणार्यांना याबाबत फारशी कल्पना नसते. मराठी मुलांची हीच अडचण लक्षात घेऊन, मराठी मुलांना नोकर्यांची माहिती देणारे, तसेच नोकरी मिळण्यायोग्य बनवण्यासाठी ‘मराठी नोकरी’च्या माध्यमातून नि:शुल्क मार्गदर्शन करणार्या शंतनु दलाल यांची ही विशेष मुलाखत...
‘मराठी नोकरी’ या समाजमाध्यम संकेतस्थळाची सुरुवात कशी झाली. त्यामागची प्रेरणा काय?
याची सुरुवात महाविद्यालयीन दिवसांपासून झाली. मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. आमच्यावेळी नोकरी मिळवण्यासाठी आज जसे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तसे पर्याय उपलब्ध नव्हते. नोकरी मिळवण्यासाठी रिझ्युम काय असतो, ईमेल कसा करायचा, मुलाखतीला गेल्यावर उत्तरे कशी द्यायची, अशी कसलीच माहिती नव्हती. तेव्हा आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्यात नोकरीसंदर्भातील माहिती आम्ही पाठवायचो. तिथून खरी सुरुवात झाली. स्वतःला आलेल्या अडचणींमधून आम्ही शिकत गेलो. त्यामुळे त्यावेळच्या अनुभवांचा फायदा आता सर्वांना झाला पाहिजे, याच हेतूने ‘मराठी नोकरी’ची सुरुवात झाली. व्हॉट्सअॅप, फेसबुक तसेच टेलिग्राम या अॅप्सवर लोकांची गोपनीयता राखली जाणे शक्य होत नव्हते, त्यामुळे मी ट्विटरवर याची सुरुवात केली. हीच या ‘मराठी नोकरी’ मागची प्रेरणा आहे.
आज अनेक तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात असतात. पण, नोकरीसाठी मुलाखतीला जाताना लागणारा रिझ्युम नेमका कसा असला पाहिजे? याबद्दल काय मार्गदर्शन कराल?
नोकरी मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपला रिझ्युम व्यवस्थित असणे गरजेचे आहे. त्यात आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, आपले शिक्षण, आपली कौशल्ये या सर्वांचा योग्य भाषेत उल्लेख असायला हवा. आपल्या सुदैवाने आज इंटरनेटवर अशा रिझ्युमचे कित्येक नमुने बघायला मिळतात. त्यानुसार छान पद्धतीने आपला रिझ्युम तयार करावा. त्यातील भाषा सोपी, सरळ असली पाहिजे. त्यानंतर फोटो, ईमेल आयडीसुद्धा व्यवस्थित असला पाहिजे. आपल्याकडे सध्या प्रोफेशनल दुनियेत ‘लिंक्डीन’ हे समाजमाध्यम खूप लोकप्रिय आहे. त्यावर आपले अकाऊंट तयार करणे ते आपल्या रिझ्युममध्ये त्याचा अंतर्भाव करणे, हे महत्त्वाचे. नोकरी मागण्यासाठी ईमेल करत असताना, विषय अचूक लिहिणे, कुठल्या पदासाठी अर्ज करत आहोत ते व्यवस्थित लिहिणे, या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. साधारणतः कुठेही नोकरीसाठी अर्ज करताना या गोष्टी करणे बंधनकारक आहेत. नोकरीसाठी जेव्हा ईमेल करतात, तेव्हा आपण नेमका कशासाठी ईमेल करत आहोत, हे वाचणे बंधनकारक आहे. यातील चुकीचे, एक गमतीदार उदाहरण देतो. एक मुलगा माझ्याकडे आला. बरेच दिवस झाले नोकरी मिळत नाही, हे नैराश्य होतेच. परंतु, एका नोकरीसाठी त्याने अर्ज केला होता. तरी त्याला काही उत्तर येत नव्हते. मी पाहिले तर त्याने एका ठिकाणी ‘रिसेप्शनिस्ट’साठी अर्ज केला होता आणि त्या जाहिरातीत मुलगीच पाहिजे, हे स्पष्टपणे लिहिले होते. त्यामुळे या बारीकसारिक तपशीलांची काळजी घ्यावी.
आपण एवढ्या मुलांना नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन करता. तेव्हा आता या नोकर्यांच्या बाजारात नक्की कुठल्या कौशल्यांना मागणी आहे की, ज्याने नोकरी मिळवण्याची शक्यता वाढेल?
आपण इंजिनिअरिंगपासूनच सुरुवात करू. सध्या ‘कोअर इंजिनिअरिंग’ला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ‘यांत्रिक’सारख्या क्षेत्रात शिकणार्या मुलांनी हे लक्षात घ्यावे. त्यानंतर याच क्षेत्राला अनुसरून अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे ‘एआय’सारख्या तंत्रज्ञान शिक्षणाकडे ल़क्ष द्यावे. याशिवाय कोअर क्षेत्रात, डिझायनिंगसाठी खूप वाव आहे. त्यामुळे या विषयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये शिकण्याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर आता ‘बीकॉम’, ‘बीएस्सी’, ‘बीए’ यांसारख्या क्षेत्रात शिक्षण घेणार्यांसाठीही कोडिंग, संगणकसारख्या तंत्रांना मागणी आहे. याहून अधिक आजघडीला सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. या क्षेत्रात केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडूनही खूप गुंतवणूक होते. या क्षेत्रात खूप नवनवे स्टार्टअप्स आकाराला येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रालाही दिवसेंदिवस जास्त मागणी दिसते. याशिवाय सेमीकंडक्टर, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांना मोठी मागणी आहे. तेव्हा मराठी मुलांनी याचा नक्की फायदा घ्यावा.
सध्या बर्याच ठिकाणी वेगवेगळी कौशल्य प्रशिक्षण देणारे आणि 100 टक्के नोकरीची हमी देणारे क्लासेस दिसून येतात. पण, खरंच या क्लासेसचा मुलांना किती फायदा होतो? यातून फसवणुकीचीच शक्यता अधिक असते का?
खरं सांगायचे तर या गोष्टींतून फसवणुकीची शक्यता अधिक असते. त्या क्लासेसमधून खरंच फायदा होणार्या तरुण-तरुणींची संख्या फारच कमी आहे. आज तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, युट्यूब, युडेमी या सर्व अॅप्सवर उद्योगजगताशी निगडित कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठल्याही जाहिरातबाजीला भुलून आपण आपले पैसे, वेळ आणि शक्ती वाया घालवू नये. कोणताही क्लास लावण्यापूर्वी व्यवस्थित माहिती करून घेणे गरजेचे आहे आणि मगच प्रवेश घ्यावा.
मुलाखत : हर्षद वैद्य