तुमची आजी सावरकरांची प्रशंसा करत असे – सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना झापले
- महात्मा गांधींनाही ब्रिटीशांचा सेवक म्हणणार का – न्यायालयाचा सवाल
- स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्यास कारवाई तयार रहा – कठोर तंबी
25-Apr-2025
Total Views | 32
नवी दिल्ली, राहुल गांधी यांना त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते हे माहित आहे का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केला. त्याचप्रमाणे भविष्यात स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध वादग्रस्त विधान करू नका, अन्यथा ‘परिणामांना सामोरे जावे लागेल’ असा इशाराही दिला.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध गांधींच्या टीकेवर नापसंती व्यक्त केली. महात्मा गांधींनीही व्हाईसरॉयला संबोधित करताना ‘तुमचा विश्वासू सेवक’ या शब्दाचा वापर केला होता, त्यामुळे त्यांनाही ब्रिटीशांचा सेवक म्हणणार का, असा सवाल न्यायमूर्तींनी केला. त्याचप्रमाणे त्यांच्या आजीने पंतप्रधान असताना सावरकर यांचे कौतुक करणारे पत्र देखील पाठवले होते, याची माहिती तुमच्या अशिलास आहे; असा सवाल न्या. दत्ता यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.
महाराष्ट्रात सावरकरांना पूजनीय मानले जाते, असे न्यायालयाने अधोरेखित केले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास आणि भूगोल जाणून घेतल्याशिवाय अशी बेजबाबदार विधाने करणे योग्य नाही. भविष्यात अशी विधाने करणार नाहीत, या अटीवर न्यायालय कार्यवाही स्थगित करण्यास तयार आहे. मात्र, यापुढे असे विधान केल्यास आम्ही स्वतःहून निर्णय घेऊ. न्यायालय तुम्हाला स्वातंत्र्यसैनिकांबद्दल काहीही बोलण्याची परवानगी देणार नाही, अशीही तंबी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिली आहे.
त्यानंतर खंडपीठाने सावरकरांविरुद्धच्या टिप्पणीवरून लखनौ न्यायालयात गांधींविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी मानहानी खटल्याच्या कार्यवाहीला स्थगिती दिली.