लोकमत परिष्कार’ हा समाजोत्थानाचा मार्ग : सुनील आंबेकर
पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार चिरकाल टिकणारे
25-Apr-2025
Total Views | 13
मुंबई (Sunil Ambekar on Deendayal Upadhyay):“पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
‘लोढा फाऊंडेशन’, ‘एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव समिती महाराष्ट्र’ आणि दीनदयाळ रिसर्च सेंटर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला एकात्म मानव दर्शनाचे साधक रवींद्र महाजन, भाजपचे राष्ट्रीय सह संघटक व्ही. सतीश, ‘दीनदयाळ रिसर्च सेंटर’चे अतुल जैन, एच. के. जैन उपस्थित होते.
‘लोकमत परिष्कार’ या विषयावर पुष्प गुंफताना सुनील आंबेकर म्हणाले की, “पंडितजी असे महात्मा आहेत, ज्यांच्या विचारांचे महत्त्व चिरकाल टिकणारे आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांवर जगभरात संशोधन होत आहे, ही आनंददायी बाब आहे. पंडितजींनी आपल्या आयुष्यात लोकमताला महत्त्वाचे स्थान दिले. ते विचार थोपवणार्या मानसिकतेच्या विरोधात होते. राजकीय क्षेत्रातही त्यांनी लोकजागरणाला महत्त्व दिले. लोकमत तयार करून जनइच्छेपर्यंत पोहोचणे, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. सर्वमान्य नागरिकांपर्यंत मूळ भारतीय विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.”
“१९४७ साली स्वातंत्र्यानंतर नवीन लोकशाही व्यवस्थेचा जन्म झाला. भगवान श्रीरामांच्या राज्याला आपण आदर्श मानतो. भारतीय संविधानातही त्यांचे प्रतिबिंब उमटते. भारत हे पराजित होणारे राष्ट्र आहे, अशी भावना होती. ती बदलण्यात आपल्याला यश आले. त्याचे कारण म्हणजे जेवढ्या देशांशी आपला संबंध आला, त्यांना सामावून घेऊन भारत राष्ट्र विकसित झाले. देशाच्या विभाजनाबाबतही अनेक मिथके आहेत. वास्तवात देशाचे विभाजन का झाले? तर एकतेच्या अभावामुळे. राष्ट्र या संकल्पनेत स्पष्टता नसल्याने विभाजन झाले. त्यामुळे देश जोडणारे कोण आणि तोडणारे कोण, हे समजले पाहिजे,” असे मत आंबेकर यांनी व्यक्त केले.
लोकहितावर आधारित एकता दीर्घकाळ टिकणारी
“आपल्याकडे सेक्युलरिजमच्या नावाखाली भ्रामक कल्पना पसरवल्या गेल्या. त्यामुळे देशाची अस्मिता जागृत करण्यासाठी कैक वर्षे लागली. ‘कलम 370’ त्याचे ताजे उदाहरण. परवाची घटना दुर्दैवी आहे. त्यावर कठोर कारवाई होईल. पण, हिंदूधर्मीयांना टार्गेट करून मारण्यात आले. त्याचे ‘सो-कॉल्ड सेक्युलर’ लोकांनी समर्थन केले. पण काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग होते आणि कायम राहील आहे,” असे स्पष्ट मत सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.
एखाद्या गोष्टीवर लोकमत झाले, की परिवर्तन अटळ आहे. स्वार्थाच्या आधारित एकता अल्पकालीन असते. लोकहितावर आधारित एकता दीर्घकाळ टिकणारी असते. त्यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘लोकमत परिष्कारा’ची आजच्या समाजव्यवस्थेला अतिशय गरज आहे.
“गेल्या २०० वर्षांत तंत्रज्ञान प्रगत होत गेले. आजचे युग नवतंत्रज्ञानाचे आहे. अशावेळी तंत्रज्ञान ही आपली संस्कृती न होता, संस्कृतीला अनुरूप तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. कारण, भारतीय संस्कृतीत विश्वकल्याणाचे मूळ आहे. त्यामुळे ती टिकवून ठेवण्याची अत्यंत गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
एकात्म मानवदर्शनमध्ये जगातील
असंख्य प्रश्नांची उत्तरे - रवींद्र महाजन
‘फिलॉसॉफी’ याचा इंग्रजी शब्दाचा सोपा भारतीय अर्थ म्हणजे दर्शन. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानवदर्शन विचार त्याही पलीकडचा आहे. सत्याला समाजजीवनात उतरवण्याचे काम त्यांनी केले. जगातील असंख्य प्रश्नांची उत्तरे एकात्म मानवदर्शनमध्ये सापडतील.
आजवर कोणताही देश अर्थवादावर तोडगा काढू शकला नाही. अमेरिकेसारखा देश त्याला अपवाद नाही. कारण, त्यांच्या विचारधारेत त्रुटी आहेत. या प्रश्नांचे उत्तर पुंजीवाद किंवा कम्युनिझम देऊ शकत नाही. त्याची उत्तरे केवळ एकात्म मानवदर्शन देऊ शकते.
“अलीकडे प्रत्येक बाबीसाठी सरकारवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. पण, केवळ क्षमतावृद्धीसाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या, त्या जीवनभर साथ देऊ शकत नाहीत. स्वावलंबी जीवन हाच खरा मार्ग आहे. समाज योग्यरितीने चालण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत. त्याचे पालन करणे, आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन एकात्म मानवदर्शनाचे साधक रवींद्र महाजन यांनी केले.