सरसंघचालक मोहनजी भागवत; मार खाणे हा आपला स्वभाव नाही
25-Apr-2025
Total Views | 12
मुंबई (Mohanji Bhagwat on Pahalgam):“पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, ‘पद्मश्री’ हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्रभूषण आशा भोसले, ज्येष्ठ गायिका मीना खाडिलकर, उषा मंगेशकर, लेखक श्रीपाल सबनीस, अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री अमृता सुभाष, गायिका रिवा रुपकुमार राठोड, अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आरंभ संस्थेच्या अंबिका ठाकळकर, अभिनेते सुनिल शेट्टी, व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर थेट भाष्य केले. ते म्हणाले, “ही लढाई पंथ, संप्रदायाची नसली तरी त्याला त्याचा आधार गरजेचा आहे. ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे. आपला जवान कोणाला धर्म विचारून मारत नाही. पण, काल धर्म विचारून मारण्यात आले. या घटनेमुळे मनात दुःख आहे, अंतःकरण जड आहे. आमच्या मनात क्रोधही आहे. काही थोडे लोक सुधारायला तयार नसतात. रावणही बदलायला तयार नव्हता, त्यामुळे दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला. त्यामुळे कालच्या घटनेमुळे जसा क्रोध आहे तशा अपेक्षाही आहेत आणि अपेक्षा पूर्ण होतील,” असा विश्वासही वाटतो.
भेद कायमस्वरूपी विसरले पाहिजेत!
“पहलगाम हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आणि सर्वजण भाषा, प्रांत, जात असे भेद तात्पुरते विसरून व्यक्त झाले. या प्रसंगामुळे भेद विसरून तात्पुरते एक झालो, ते एक होणे स्वभाव बनले पाहिजे. तसे झाले तर वाकडा डोळा करण्याची कोणाची हिंमत होणार नाही,” असेही सरसंघचालक म्हणाले. त्याचवेळी, “द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही. तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. शक्तिवान माणसाला अहिंसक असले पाहिजे. शक्तिहीनाला त्याची गरज नाही. जी शक्ती आहे ती अशा प्रसंगात दिसली पाहिजे,” असे सांगत सरसंघचालकांनी पहलगाम हल्ल्याला ठोस उत्तर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.