श्रीनगर : ( Pahalgam Attack Updates ) जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ही सलग तिसरी चकमक होती. यात एक जवान हुतात्मा झाला. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात पोलिसांना मोठे यश आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक झाल्याचीही प्रार्थमिक माहिती आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर शोधमोहीम सुरू
पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व अतिरेकी स्थानिक तसेच पर्यटकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. तसा कट त्यांनी रचला होता. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर मोहम्मद रफिक खांडे आणि मुख्तार अहमद दार यांना तपासणीत अटक केली. त्यांच्याकडून दोन चिनी हँडग्रेनेड, एक मिनी मॅगझिन आणि ३० राऊंड काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी एफ-कॉय थर्ड बँड-सीआरपीएफ आणि १३ आरआर यांच्या सहकार्याने सदुनारा अजस येथे आणखी एक चेक पोस्ट उभी केली आहे. ज्यात रईस अहमद दार आणि मोहम्मद शफी दार यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून हँडग्रेनेड आणि दारूगोळाही जप्त केला होता.
उधमपूरच्या दुडू-बसंतगडमध्ये चकमक
पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर, जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये आणखी एका चकमकीची बातमी आली. दुडू-बसंतगड परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. लेफ्टनंट कर्नल सुनील बटवाल यांच्या माहीतीनुसार, ऑपरेशन अद्यापही सुरू आहे आणि यात एक सैनिक हुतात्मा झाल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांना प्रत्येक कोनातून घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
उरीमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे पहलगाम कनेक्शन?
उरीमध्ये मारले गेलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी जोडलेले असू शकतात असा लष्कराला संशय आहे. दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये दोन असॉल्ट रायफल, पाकिस्तानी चलन, चॉकलेट आणि सिगारेटची पाकिटे यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की या दहशतवादी गटांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला होता. ते पहिल्यांदा २३ मार्च रोजी कठुआ जिल्ह्यात दिसले होते, त्यानंतर २७ मार्च आणि ११-१२ एप्रिल रोजी त्यांच्याशी संबंधित चकमकीही घडल्या.
दहशतवाद्यांचे नेटवर्क समूळ नष्ट करणार!
भारत सरकार आणि भारतीय लष्कर आता दहशतवाद्यांचे संपूर्ण नेटवर्क नष्ट करण्यासाठी काम करत आहेत. खोऱ्यात सतत शोध मोहीम राबवली जात आहे. दरम्यान अतिरिक्त सैन्यही तैनात करण्यात आले आहे. दुडू-बसंतगडमध्ये अजूनही ऑपरेशन सुरू आहे. आणि येत्या काही दिवसांत आणखी चकमकी होण्याची शक्यता लष्कराने वर्तवली आहे.