‘स्वावलंबिनी’तून महिला उद्योजकता विकास

    25-Apr-2025
Total Views | 9
 
Modi government schemes Swavalambini
 
 
देशात मोदी सरकारच्या काळात उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. महिलांना स्वावलंबी करून, त्यांच्या शक्तीचा उपयोगही राष्ट्राच्या विकासात करण्यासाठी ‘स्वावलंबिनी’ सारख्या योजना मोदी सरकार राबवत आहेत. या योजनेचा घेतलेला आढावा...
 
महिलांमध्ये खास उद्योजकता विकासासाठी ठोस आणि विशेष प्रयत्न करणे व उपक्रमाच्या नावांप्रमाणेच महिलांना उद्योजक म्हणून खर्‍या अर्थाने स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशासाठी, केंद्र सरकारचा कौशल्य विकास विभाग व नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला ‘स्वावलंबिनी’ योजना नव्यानेच राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे.
 
‘स्वावलंबिनी’ योजनेची पार्श्वभूमी म्हणजे, सुरुवातीला ही योजना विकसित शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत पूर्व भारत आणि उत्तर-पूर्व भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्था व विद्यापीठांच्या माध्यमातून अमंलात आणली गेली. यामागचा मुख्य उद्देश हा, महिलांमध्ये शिक्षणाच्या जोडीलाच त्यांचा उद्योजक म्हणून विकास करणे व त्याद्वारा अशा प्रशिक्षित महिलांना स्वयंरोजगार देण्याबरोबरच, त्यांनी इतरांना रोजगार देण्यासाठीही सक्षम व्हावे हा होता. या पहिल्या टप्प्यात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ भुवनेश्वरपासून मिझोरम विद्यापीठ, यांसारख्या क्षेत्रातील प्रमुख शैक्षणिक संस्थांचा आवर्जून समावेश करण्यात आला होता.
 
योजनेला पहिल्या टप्प्यात मिळालेले यश आणि प्रतिसाद पाहता, केंद्र सरकारने आता योजनेची व्याप्ती व क्षेत्र यामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. देशातील निवडक क्षेत्रातील गरजू महिलांचा कौशल्य विकास साधून, त्यांना उद्योजक बनवण्याचा उद्देश त्यामागे आहे. नव्या प्रशिक्षण अभ्यासक्रमानुसार‘स्वावलंबिनी’ योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिलांना, त्यांच्या शिक्षण व कौशल्यावर आधारित कुटिरोद्योग-ग्रामोद्योग सुरू करणे, उद्योजकतेचे तंत्र आणि विकास, आर्थिक साक्षरतेसह आर्थिक व्यवहारांचे महत्त्व, बँकिंगच्या कार्यपद्धती, विचार आणि कामकाज करण्याची आधुनिक पद्धत, आत्मविश्वास निर्माण करणे इत्यादी सह, महिलांना स्वावलंबी करण्यावर विशेष भर आता दिला जाणार आहे.
 
आलेले अनुभव व केलेले प्रयत्न यातून ‘स्वावलंबिनी’ योजनेला, अधिक व्यापक आणि परिणामकारक बनविले जात आहे. यासाठी विविध टप्प्यांवर आधारित, विशेष अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली. या अभ्यासक्रमाला अधिक व्यवहार्य व उपयुक्त करण्यासाठी, हैद्राबाद येथील ’राष्ट्रीय लघु उद्योजक व्यवस्थापन विकास संस्था’ व ’नीती’ आयोग यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
अशा प्रकारे महिलांना अधिकाधिक सक्षम व प्रभावी लघु-उद्योजक बनविण्यासाठी, प्रगतस्वरूपातील व अधिक समावेशक असे अभ्यासक्रम आता पुढीलप्रमाणे तयार करण्यात आले आहेत, उद्योजकता परिचय अभ्यासक्रम : या दोन दिवसीय विशेष अभ्यासक्रमात, सुमारे 600 महिला प्रतिनिधींना व्यवसायाची संकल्पना, उद्योजकतेची मानसिकता व पूर्वतयारी, प्रचलित व्यावसायिक संधी व त्यांचा अभ्यास, विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक संसाधनांची जोडणी व लघु व्यवसाय नियोजन इत्यादी विषयांचा प्रामुख्याने समावेश केला जातो.
 
या अभ्याक्रमामागचा मुख्य उद्देश हा, महिला प्रशिक्षार्थींना स्वतःचा घरगुती वा लघुउद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण-प्रोत्साहन देऊन, त्यांच्यामध्ये उद्योजकतेला पूरक मानसिकता तयार करणे हा आहे.
 
महिला उद्योजकता प्रशिक्षण अभ्यासक्रम
 
महिलांना त्यांच्या शिक्षण व कौशल्यावर आधारित उद्योजकतेसाठी तयार करण्याच्या विशेष उद्देशाने, या 40 तासांच्या विशेष प्रशिक्षणवर्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
 
या विशेष अभ्यासक्रमात त्यामुळे सुमारे 300 इच्छुक व निवडक महिला प्रशिक्षार्थींना कुटिरोद्योगांसह ग्रामीण स्तरावर लघु-उद्योग सुरू करणे, लघु उद्योगांचा विकास, प्रत्यक्ष वा थेट विक्रीची व्यवस्था, लघु उद्योगांसाठी आवश्यक असे प्रत्यक्ष सहकार्य, सहकारी प्रयत्नांचे महत्त्व, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लघु उद्योगाचीं नोंदणी व आवश्यक त्या प्रशासकीय व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे इत्यादींविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येते. यामागचा उद्देश, प्रशिक्षणाद्वारे महिलांची उद्योजकतेसाठी पूर्वतयारी करून घेणे हा आहे.
 
विशेष साहाय्यासह मार्गदर्शन
 
सहा महिने कालावधीच्या या विशेष सत्रात, प्रशिक्षित महिला उमेदवारांना त्यांचे कौशल्य व प्रशिक्षणावर आधारित व्यावसायिक संकल्पनांना, प्रत्यक्षात साकार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येते. या प्रक्रियेमध्ये उद्योग आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील विषयतज्ज्ञ व अनुभवी मंडळींचे, विशेष मार्गदर्शन उपलब्ध केले जाते. याचा फायदा अर्थातच नव्याने लघुउद्योग सुरू करणार्‍या वा नव-उद्योजक महिलांना होत असतो.
 
उद्योजक प्रशिक्षक विकास अभियान
 
मोठ्या भौगोलिक क्षेत्रात व तेवढ्याच मोठ्या संख्येत नव्याने स्वयंरोजगार वा लघुउद्योग सुरू करणार्‍या महिलांना, विशेष स्वरूपाचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी प्रशिक्षकांची गरज नेहमीच भासते. त्यामुळे उद्योजकता व त्या संबंधित विषयांवर आपल्या अनुभवासह मार्गदर्शक म्हणून सक्रियपणे काम करण्यासाठी, ‘स्वावलंबिनी’ योजनेअंतर्गत दीर्घकालीन स्वरूपाची उद्योजक-प्रशिक्षक योजना आखण्यात आली आहे.
 
कौतुक-प्रोत्साहन योजना
 
‘स्वावलंबिनी’ योजनेमध्ये कौशल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन योजनेअंतर्गत सहभागी होऊन व त्यानुसार ज्या महिला हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून आपला लघुउद्योग व्यवसायात विशेष यश संपादन करतात, त्यांचे कौतुक-अभिनंदन करणे गरजेचे असते. अशा कौतुकांमुळे इतर महिलांना प्रोत्साहन-प्रेरणा मिळते. या दुहेरी दृष्टिकोनातून ‘स्वावलंबिनी’ योजनेत, यशस्वी महिला लघुउद्योजकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
 
‘स्वावलंबिनी’ योजनेची अंमलबजावणी आजवर विविध राज्यांमधील खालील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे,
 
चौधरी चरणसिंह विद्यापीठ, मेरठ-उत्तर प्रदेश,
 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, भुवनेश्वर, ओडिशा
 
उत्कल विद्यापीठ, भुवनेश्वर, ओडिशा
 
उत्तर-पूर्व विद्यापीठ , शिलाँग, मेघालय
 
मिझोरम विद्यापीठ,आईजोल,मेघालय
 
गुवाहाटी विद्यापीठ, गुवाहाटी, आसाम
 
बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, उत्तर प्रदेश
 
हैद्राबाद विद्यापीठ, हैद्राबाद, तेलंगण
 
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद, तेलंगण
 
किसांग नांगबा शासकीय महाविद्यालय, जोवल मेघालय
 
रिभोई महाविद्यालय, मिझोरम
 
शासकीय महाविद्यालय, मिझोरम
 
लुंगलाय शासकीय महाविद्यालय, मिझोरम़
 
हंडिग महाविद्यालय, गुवाहाटी, आसाम
 
दिसपूर महाविद्यालय, गुवाहाटी, आसाम
 
महिलांना स्वतःच्या पायावर व खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर बनविण्याचा एक नवा व परिणामकारक पायंडा म्हणून, केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्वावलंबिनी’ या महिला उद्योजक प्रशिक्षण योजनेकडे पाहायला हवे.
 
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशपातळीवर सर्वेक्षण करून, निवडक विद्यापीठांना सामावून घेण्यात आले आहे. ‘स्वावलंबिनी’ योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता, इतर राज्यातील विद्यापीठ व प्रमुख शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी होतील असे आशादायी चित्र निर्माण झाले.
 
 - दत्तात्रय आंबुलकर 
(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121