अंधेरीतील गोखले पुलाचे मुख्‍य बांधकाम पूर्ण

विक्रोळी रेल्‍वे स्‍थानकाजवळील उड्डाणपुलाचे ९५ टक्‍के काम पूर्ण अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांची माहिती

    25-Apr-2025
Total Views | 13

अंधेरीतील गोखले पुलाचे मुख्‍य बांधकाम पूर्ण


मुंबई,अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाचे मुख्‍य बांधकाम १०० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच दि.३० एप्रिलपर्यंत पूल व पुलाची इतर सर्व अनुषंगिक कामे पूर्ण होत आहेत. तसेच, विक्रोळी रेल्‍वे स्‍थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम ९५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पुलाची उर्वरित कामे दि. ३१ मेपर्यंत पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे, अशी माहिती अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणारा महत्वाचा दुवा असलेला गोपाळकृष्ण गोखले पूल तसेच विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणारा विक्रोळी रेल्‍वे स्थानकावरील उड्डाणपूल या प्रकल्‍पांची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी शुक्रवार, दि.२५ एप्रिल रोजी पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) उत्‍तम श्रोते यांच्‍यासह संबंधित अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या गोपाळकृष्ण गोखले या पुलाचे मुख्‍य बांधकाम १०० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. त्‍यात रेल्वे हद्दीतील काम, दोन्ही बाजूचे चढ - उतार मार्ग आणि सी. डी. बर्फीवाला पुलास जोडणाऱ्या 'कनेक्टर' कामाचा समावेश आहे. जुहू - विलेपार्ले विकास योजना अंतर्गत उड्डाणपुलाच्‍या पूर्व दिशेकडील पोहोच रस्‍त्‍याचे काम सध्‍या सुरू आहे. बर्फीवाला पूल जेथे उतरतो त्‍याठिकाणचा बाजूचा रस्ता अरूंद आहे. त्‍यामुळे पोहोच रस्‍ता पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुला करावा, जेणेकरून नव्‍याने कार्यान्वित होणा-या बर्फीवाला पुलाच्‍या दक्षिण भागातील उतारावरील वाहतूक सुरळीत होईल. जुहू जंक्‍शन गल्‍लीपासून वाहनांचे आवागमन योग्‍यप्रकारे होईल, असेदेखील अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

त्‍यानंतर बांगर यांनी विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वे मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाची पाहणी केली. विक्रोळी रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचे ९५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. विक्रोळी पुलाचे पूर्व बाजूकडील तसेच रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. पश्चिम बाजूकडील चढ - उतार मार्ग तयार आहेत. पश्चिम बाजूला सेंट जोसेफ शाळेजवळ वळण आहे. त्या ठिकाणी पुलाचे ३ स्पॅनवरील काम शिल्लक आहे. त्यावर ‘डेक स्लॅब’ टाकण्यात येणार आहे. हे काम अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक आहे. शाळा आणि रेल्वे स्थानक असे सातत्याने रहदारी असलेले परिसर जवळ असल्याने अतिशय दक्षता घेत बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी काम करत आहे. हे काम दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश बांगर यांनी दिले.

पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या वाहनधारकांच्‍या वेळ आणि इंधनात बचत होणार आहे. तसेच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटरपर्यंतच्या परिघातील वाहनधारकांनाही या पुलाचा उपयोग होणार असल्‍याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले.



अग्रलेख
जरुर वाचा

'ऑपरेशन सिंदूर' देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल!

पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेविरुद्ध भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून निर्णायक कारवाई करण्यात आली. त्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कौतुक करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे. RS..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121