भारतीय शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांचे निधन - एक महान वैज्ञानिक गमावला
25-Apr-2025
Total Views | 11
नवी दिल्ली : इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि भारताच्या अवकाश क्षेत्रात महत्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी १०.४३ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते. डॉ. के. कस्तुरीरंगन इस्रोचे माजी संचालक होते.
भारताच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रह, भास्कर-१ आणि २ चे प्रक्षेपणही डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. भारतीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही यांच्या विकासात सुद्धा त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वात भारताने अनेक यशस्वी उपग्रह प्रक्षेपण मोहिमा पूर्ण केल्या. त्यांनी 'इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी' सारख्या संस्थेमध्ये सुद्धा कार्य केले आहे.
खगोलभौतिकशास्त्रज्ञ असल्याने त्यांचा 'हाय पावर एक्स-रे' आणि 'गॅमा' किरण ह्या विषयी विशेष संशोधन होते. डॉ. के. कस्तुरीरंगन ह्यांनी कर्नाटक ज्ञान आयोग या संस्थेचे अध्यक्ष पद सांभाळला. ते राज्यसभा सदस्यही होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तयार करणाऱ्या संस्थेचे डॉ. के. कस्तुरीरंगन अध्यक्ष होते. त्यांच्यामुळे शैक्षणिक सुधारणांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश असलेल्या धोरणाचा मसुदा तयार करण्यात मदत झाली. उच्च शिक्षणाची पूनर्रचना, परीक्षा सुधारणा आणि शिक्षक प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकास यांचा समावेश होता. त्यांनी १२ सदस्यीय समितीचे अध्यक्षपदही भूषवले. याच समितीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) विकसित केला, जो आता देशभरात सुरू होणाऱ्या नवीन शालेय पाठ्यपुस्तकांसाठी पाया म्हणून काम करतो.