शरद पवारांनी पहलगाममधील मृतांचे नातेवाईक काय म्हणाले ते ऐकावं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
25-Apr-2025
Total Views | 122
मुंबई : पहलगाम येथे धर्म विचारून गोळीबार करण्यात आला असे मृतांचे नातेवाईक ओरडून ओरडून सांगत असतानाही धर्म विचारून मारलं का याबाबतचे तथ्य मला माहिती नाही, असे विधान शरद पवारांनी केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आप्तस्वकीयांचा मृत्यू झाला, जे स्वत: तिथे होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेले आहे. पवार साहेबांचे असे मत असल्यास त्यांनीसुद्धा ते काय म्हणाले ते जाऊन ऐकावं," असे ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, "धर्म विचारून मारलं का याबाबतचे तथ्य मला माहिती नाही. तिथल्या प्रवाशांमध्ये स्त्रियांना सोडलेलं दिसतंय. त्यांनी पुरुषांना गोळ्या घातल्या. पुण्यात दोन लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरी मी गेलो होतो. त्यावेळी त्या भगिनी तिथे हजर होत्या. त्यांनी मला सांगितले की, आम्हाला कुणाला हात लावला नाही तर आमच्या पुरुषांना हात लावला."
वास्तविक गुरुवार, २४ एप्रिल रोजी शरद पवारांनी पहलगाम येथे मृत पावलेल्या पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुबियांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी तिथला थरारक अनुभव पवारांसमोर वर्णन केला. "दहशतवाद्यांसमोर आम्ही सर्व महिलांनी मोठमोठ्याने अजाण म्हटली. पण त्यांनी तरीही आमच्या माणसांना मारुन टाकलं. आम्हाला त्यांनी मारु नये म्हणून आम्ही पटापट कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या आणि ‘अल्लाहू अकबर’ म्हणायला सुरुवात केली. पण तरीसुद्धा त्यांनी आमच्या सोबतच्या दोघांना मारून टाकलं," असा भयंकर अनुभव त्या नातेवाईकांनी पवारांसमोरच कथन केला. तरीसुद्धा धर्म विचारून मारलं का याबाबतचे तथ्य मला माहिती नाही, हे शरद पवारांचे विधान हास्यास्पद असल्याचे बोलले जात आहे.