मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावली आहे. आता रोज संविधान हातात घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? हा माझा प्रश्न आहे. तसेच यापुढे राहुल गांधी स्वातंत्र्यसेनानींचा अपमान करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्यांची जागा दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो," असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राहुल गांधींना चांगलेच फटकारले. यापुढे राहुल गांधींनी स्वातंत्र्य सैनिकांबाबत अशी विधाने करू नयेत. अन्यथा न्यायालयाला स्वत:हून त्याची दखल घ्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले. तसेच राहुल गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात चाललेल्या खटल्यावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.