भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित
- येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तात्काळ कारवाई
25-Apr-2025
Total Views | 53
मुंबई : पुणे हवेली येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमरसिंह पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.
अमरसिंह पाटील यांच्याविरुद्ध कलम ७ (भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम), तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८ (२), १९८ व २०१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांच्याविरोधात प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांची कामकाजाची सखोल चौकशी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने विशेष समिती गठीत केली आहे.
या प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करता महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अंतर्गत, पाटील यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यंत ते शासन सेवेतून निलंबित असणार आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय उप अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय, लोहारा, जि. धाराशिव येथे निश्चित करण्यात आले असून, त्यांनी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, धाराशिव यांची परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे महसूल व भूमि अभिलेख विभागात खळबळ उडाली असून, शासन प्रशासनातील भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिकेचा हा स्पष्ट इशारा मानला जात आहे.