कठोर परिश्रम, समर्पण, ईच्छाशक्ती, ध्यास आणि आत्मविश्वास या पाच गोष्टी गाठीशी असल्या की, कोणतीही गोष्ट साध्य करणं शक्य आहे. तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी परिस्थितीवर मात करत जिद्दीने पुढे जात राहिलात तर नक्कीच यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे बिरदेव सिध्दाप्पा डोणे. घरची परिस्थिती फारच बेताची. मेंढपाळ हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय. अशा परिस्थितीत बिरदेवने एक स्वप्न पाहिलं. ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड जिद्दीने मेहनत घेतली. यात त्याला दोनदा अपयशही आलं. मात्र, तरीसुद्धा हार न मानता तो पुढे जात राहिला आणि आज यश त्याच्या पायाशी लोटांगण घालतंय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेत बिरदेवने देशात ५५१ वी रँक मिळवत यश संपादन केलंय. या यशामुळे संपूर्ण देशात बिरदेवचं कौतूक होतंय. तर मेंढपाळ ते आयपीएस अधिकारी हा बिरदेव डोणेचा प्रवास कसा होता? यात त्याला कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावं लागलं? आणि त्याचा हा प्रवास देशभरातील तरुणांसाठी कसा प्रेरणादायी ठरतो याबद्दलच जाणून घेऊया.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील रहिवासी सिध्दाप्पा डोणे. पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार. लहान मुलगा बिरदेव सिद्धाप्पा डोणे याचं नाव सध्या संपूर्ण देशभरात गाजतंय. बिरदेवच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. मेंढपाळ हा बिरदेवच्या आईवडीलांचा पारंपारिक व्यवसाय. मेंढ्या पाळणं, त्यांचा सांभाळ करणं आणि मेंढपाळ करता करता हजारों किलोमीटरची भटकंती करणं असा त्यांचा नित्यक्रम.
बिरदेवदेखील कुटुंबियांसोबत लहानपणापासून बकऱ्या राखण्याचं काम करायचा. शाळेत चांगली प्रगती असल्याने शिक्षक वडीलांना बोलवून घेत सांगायचे की, तुमचा मुलगा हुशार आहे, तुम्ही त्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवं. त्यानंतर वडील बकऱ्यांचा व्यवसाय बंद करून कुटुंबाला घेऊन गावी गेले. ८ वी ते १२ वी पर्यंत बिरदेवची आर्थिक परिस्थिती फारच बेताची. पुढे मोठ्या भावाला नोकरी लागली आणि त्याच्यावरचा भार हलका झाला. त्याचवेळी बिरदेवचे पोस्टात सिलेक्शन झाले. पण यापेक्षा काहीतरी चांगलं कर असा सल्ला भावाने दिला. त्यामुळे बिरदेवने २०१७ मध्ये यूपीएससीची तयारी करण्याचा निर्धार केला.
पुण्यात इंजिनिअरिंग करत असताना कॉलेजमध्ये यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्याला चांगलं वातावरण मिळालं. २०१७ मध्ये त्याच्या कॉलेजमधील एकाच वर्षात १७ जणांचं यूपीएससीच्या फायनल यादीत सिलेक्शन झालं आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरली. त्यानंतर त्याने यूपीएससी करण्याची गाठ मनाशी बांधली.
बिरदेवने सुरुवातीचे दोन ते तीन वर्ष सेल्फ स्टडी केली आणि त्यानंतर २०२१ मध्ये त्याने दिल्ली येथे यूपीएससीचे क्लासेस केले. त्यानंतर तिथूनच २०२२ मध्ये त्याने यूपीएससीची पहिली परिक्षा दिली. परंतू, यात त्याला अपयश आलं. पुढे २०२३ मध्ये तो पुण्यात आला आणि प्रचंड मेहनत घेत दुसरी परिक्षा दिली. पण यावेळी केवळ तीन मार्काने युपीएससी मेन्सच्या परिक्षेत त्याला अपयश आलं. मात्र, या अपयशानंतरही तो खचला नाही. तर त्याने जिद्दीने आपला अभ्यास सुरुच ठेवला. २०२४ मध्ये त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि पास झाला. त्यानंतर केवळ एक महिन्याच्या कालावधीत प्रचंड मेहनत घेऊन इंटरव्यूची तयारी केली आणि आज त्याचा निकाल आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.
विशेष गोष्ट अशी की, यूपीएससीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, २२ एप्रिल रोजीसुद्धा बिरदेव बकऱ्या घेऊन गेला होता. त्यावेळी तिथेच त्याला त्याच्या मित्राचा फोन आला आणि यूपीएससीमध्ये तुझा ५५१ वा रँक आल्याचं सांगितलं. त्यानंतर बिरदेवच्या आनंदाला पारावार नव्हता. त्याच्या कुटुंबियांनी तिथेच त्याच्या यशाचा आनंद साजरा केला.
इतक्या कमी वयात देशाच्या सर्वोच्च सेवांमध्ये स्थान मिळवणं ही बिरदेवसह सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. त्यात इतक्या कठीण परिस्थितीतही मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करणं ही गोष्ट प्रत्येकाने बिरदेवकडून शिकण्यासारखी आहे. आज एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या देशभरातील लाखों तरुण-तरुणींसाठी बिरदेव डोणे हा प्रेरणास्थान बनलाय. तुमच्याकडे एखाद्या गोष्टीत स्वत:ला झोकून देऊन काम करण्याची शक्ती असेल तर यश तुमच्याकडे आपोआप चालत येईल, हेच बिरदेवच्या या यशातून सिद्ध होतंय. सर्वात महत्वाचं म्हणजे आकाशाला गवसणी घातलेली असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवायचे हेदेखील बिरदेवकडून शिकण्यासारखं आहे.