पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री
- 232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले, आतापर्यंत 800 परत
- त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय
25-Apr-2025
Total Views | 13
मुंबई, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. शत्रूचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात कायमच सर्व राजकीय पक्ष राहिले, असेच या देशात आजवर झाले. स्व. अटलजींनी स्व. इंदिराजींना संपूर्ण पाठिंबा दिला होता. पण, उबाठाने जे छोटे मन दाखविले, त्याला या देशातील जनता कधीच माफ करणार नाही.
दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर आज तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून 416 महाराष्ट्रातील पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवाय, सुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे.