मुंबई : पहलगाममध्ये नुकत्याच घडलेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर, देशभरात शोक आणि संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर माजी सैन्य अधिकारी आणि अभिनेत्री दिशा पाटणी यांची बहीण खुशबू पटाणी यांनी सोशल मीडियावर एक रोषपूर्ण आणि थेट भाष्य करत भारत सरकारला आता निर्णायक पाऊल उचलण्याची मागणी केली आहे.
खुशबू पटाणी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, ''मी स्वतः भारतीय लष्करात मेजर पदावर कार्यरत होते आणि दोन वर्षं काश्मीरमध्ये पोस्टिंग होती. पाहलगाम माझ्यासाठी नवीन नाही – तिथला प्रत्येक कोपरा मला माहिती आहे. जे घडलं आहे, ते केवळ दहशतवादी हल्ला नाही. हे थेट पाकिस्तानच्या लष्कराने घडवून आणलेलं एक नियोजित युद्ध आहे.''
त्या पुढे म्हणाल्या, ''आपण कायम युद्ध हा शेवटचा पर्याय मानतो. पण आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय उरलेलाच नाही. गेल्या ७५ वर्षांपासून पाकिस्तानकडून वारंवार चालणाऱ्या या हल्ल्यांना आपण किती सहन करणार? सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक या केवळ तात्पुरत्या उपाययोजना आहेत. आता आपल्याला पूर्ण युद्धाची गरज आहे. जसं इज्रायल गाझावर करतं, जसं रशियाने युक्रेनवर युद्ध लादलं, तसंच भारताने पाकिस्तानविरोधात उघडपणे युद्ध घोषित करावं.''
त्यांच्या या विधानातून तीव्र असंतोष जाणवतो. त्यांनी भारताच्या लष्करी क्षमतेवर विश्वास व्यक्त करत म्हटलं, ''माझं सैन्यातील अनुभव मला सांगतो, की भारताकडे पुरेशी सैन्यसज्जता आहे. आपण फक्त प्रतिकार करत राहिलो तर हे थांबणार नाही. आता निर्णायक कारवाईची वेळ आली आहे.''
त्यानंतर त्यांनी एका वाक्यात या भावनेला टोक गाठवली ''पाकिस्तानचा मुख्य हेतूच 'जिहाद' आहे. त्यांना भारतीयांचा द्वेष आहे मग तो कुठल्याही धर्माचा असो. आता निष्पापांचे रक्त सांडलं जातंय, तर त्यांचं रक्तही सांडायला हवं. माझ्या अंगातलं रक्त उकळतंय.''
देशभरातून त्यांच्या या भावनिक आणि संतप्त प्रतिक्रियेवर लोकांचे संमिश्र प्रतिसाद येत आहेत. काहींनी त्यांच्या साहसाचे कौतुक केले आहे, तर काहींनी युद्धाच्या आवाहनावर चिंता व्यक्त केली आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.