जगाच्या सामाजिक व वैचारिक संरचनेमध्ये नव्याने बदल होत असताना, एक अत्यंत महत्त्वाची जागतिक प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे धर्मत्याग. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जगामध्ये ख्रिश्चन व बौद्ध धर्मीय समुदायांमध्ये गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये दर पाचपैकी एक व्यक्ती धर्मत्याग करते.
याउलट, हिंदू व मुस्लीम धर्मीयांमध्ये ही गळती अत्यल्प आहे. विशेष विचारप्रवृत्त करणारी बाब म्हणजे, ’कोणताही धर्म न मानणार्यांची’ संख्या आज जगात चौथ्या क्रमांकाची असून हा एक ‘नवधर्म’ ठरत आहे. ही गळती केवळ धर्मपरिवर्तनाच्या आकडेवारीपुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण सभ्यता, मूल्यव्यवस्था आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या विसर्जनाचे सूचक आहे. धर्मास वैयक्तिक श्रद्धा किंवा देवभोळेपणाच्या चौकटीत अडकवून टाकणार्या डाव्या विचारसरणीने, याची पायाभरणी केली.
धर्म हे केवळ व्यक्तिगत नाही, तर समाजाच्या स्मृती, आचारधर्म, नैतिक मूल्य, कुटुंबसंस्था आणि ऐतिहासिक सातत्याचे अधिष्ठान असते. परंतु, धर्माच्या या संकल्पनेचाच विपर्यास करून त्यास अंधश्रद्धा, परंपरानिष्ठ दडपशाही आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा विरोधक म्हणून रंगवण्यात आले.
आज जगात अनेक धर्मांच्या अनुयायांमध्ये संघटित धार्मिक आत्मीयता विरून गेली आहे. या धर्मांमध्ये धर्म आणि सामाजिक व्यवहार यांच्यातील संबंध संपल्याने धर्म ही वैयक्तिक बाब झाली.या घडामोडींच्या तुलनेत हिंदू आणि इस्लामी समाज अधिक स्थिर दिसतो. मुस्लीम समाजामध्ये धर्म म्हणजे सामूहिक अस्मिता आणि राजकीय शक्तीचे प्रतीक. त्यामुळे त्याच्याशी वेगळेपण अंगीकारणे हे केवळ वैचारिकच नव्हे, तर सामाजिक बहिष्कृतीचे कारण ठरते.
त्यातील धर्मस्वातंत्र्य हा स्वतंत्र चिंतनाचा विषय व्हावा. इस्लामप्रमाणे हिंदू धर्मातही धर्मत्याग तुलनेने कमी असला, तरी त्याची कारणे वेगळी आहेत. असे असले तरीही, हिंदू धर्मीयांनी सभोवताली घडणारे सूक्ष्म बदल याबाबत गांभीर्याने अंतर्मुख होणे आवश्यक आहे. कारण, इथे धर्माचे अस्तित्व टिकले असले, तरी स्वधर्माचा आत्माभिमान लोप पावत चालला आहे, असे जाणवते.
भारतात ही स्थिती आणखी गुंतागुंतीची होते, कारण येथे डाव्या विचारसरणीचे आघात फक्त धर्मावरच नव्हे, तर संपूर्ण सांस्कृतिक संरचनेवर लक्ष्यित आहेत. हिंदू धर्माच्या पारंपरिक, सात्त्विक आणि समन्वयवादी मूल्यांची जाणीवपूर्वक हेटाळणी करण्यात येते. शिक्षणसंस्थांतून धर्मविषयक ज्ञान हद्दपार करण्यात आले असून, स्वधर्माबद्दल माहिती असणे हेच एक प्रकारचे ‘वैचारिक मागासलेपण’ म्हणून बिंबवले गेले आहे. परिणामी, एक पिढीच पारंपरिक ज्ञानाला अंतरली आहे.
याचसोबत कुटुंबसंस्था ही धर्मशिक्षणाची पहिली आणि सर्वांत प्रभावी प्रयोगशाळा असल्याने, तिच्यावरही योजनाबद्ध पद्धतीने हल्ला करण्याचे काम सुरू आहे. उशिरा विवाह, विवाहविरोधी वाढती प्रवृत्ती, एकल पालकत्व यांसारख्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय कुटुंबव्यवस्थाच नष्ट करण्यास प्रोत्साहन दिले जाते. परिणामी, भविष्यात धर्म आणि संस्कृती यांचे हस्तांतरण करणार्या पिढ्यान्पिढ्यांच्या शृंखलेत मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आता मोबाईल आणि समाजमाध्यमांची सत्ताकेंद्रे उदयाला आली आहेत, जेथे डाव्यांना आपले वैचारिक राजकारण साधणे सहजसुलभ झाले आहे.
‘धर्म न मानणे’ हे वरवर पाहता व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतीक वाटले, तरी प्रत्यक्षात ती मूल्यशून्यता, सांस्कृतिक पोकळी आणि सामाजिक विस्थापनाची सुरुवात आहे. स्वत्व गमावलेली पिढी कोणतीही पर्यायी व्यवस्था न स्वीकारता, फक्त विरोधाच्या नावाखाली स्वतःच्या अस्तित्वाशीही संघर्ष करताना दिसत आहे.
हिंदू धर्माच्या संदर्भात हे अधिक गंभीर ठरते. कारण, हा धर्म सहिष्णुतेचा, समन्वयाचा आणि विवेकनिष्ठ आत्ममंथनाचा धर्म आहे. त्यामुळेच त्यात धर्मत्यागाची गती कमी असली, तरी हे वेड अधिक वेगाने पसरत आहे. संशोधनात सांगितलेल्या दोन धर्मांप्रमाणे धर्मत्यागाचे वेड सर्वत्र पसरले नसले, तरीही डाव्यांनी पोसलेला स्वैराचाराचा राक्षस ही जगातील सर्व धर्मांसाठी ती एक चिंतेची बाब नक्कीच आहे!
- कौस्तुभ वीरकर