सोने झाले लाखमोलाचे; प्रतितोळा दर ९८ हजार, ३८० रुपयांवर

आंतरराष्ट्रीय घडमोडींमुळे वाढणार झळाळी; सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनेखरेदीकडे कल

    24-Apr-2025
Total Views | 5

gold market 
नाशिक (Gold buying and gold market of Nashik): जागतिक बाजारात वाढीला लागलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने उसळी घेतली असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेने अतिरिक्त शुल्क आकारण्यास ९० दिवसांचा ब्रेक लावल्याने देशांतर्गत बाजारात बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार, ३८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर १ लाख, १ हजार, ३८० झाल्याचे बघायला मिळाले. सोन्याच्या दराचा हा नवीन उच्चांक असून या पुढील काळात सर्वच उच्चांक मोडले जाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
 
सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोनेदरातील ही वाढ अनपेक्षित नसून जागतिक पातळीवर घडणार्या विविध घडामोडींचा हा परिणाम आहे. त्यात लवकर स्थिरता येण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे सोन्याच्या किमती अजून काही दिवस तरी उच्च पातळीवरच राहणार असल्याची शक्यता आहे. त्यात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी आवर्जून सोनेखरेदी केली जाते. त्यामुळे बाजारात मोठी उलाढाल होत असल्याने सोन्याला आणखी झळाळी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आगामी काळात किमती आणखी वाढणार
 
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्याचे दर कमी होण्याची ग्राहक वाट पाहात होते. मात्र, दर कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस वाढणारी जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि डॉलरच्या सततच्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतीचा आलेख चढता आहे. त्यात चीन आणि अमेरिका यांच्यात होऊ घातलेले व्यापारी युद्ध वाढले, तर सोन्याच्या किमतीत आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे होणार्या सुनबाई आणि जावयासाठी चढ्या दरानेच सोने खरेदी करावे लागत आहे.
नाशिकच्या सराफ बाजारातील दर
 
बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी नाशिकच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ९८ हजार, ३८०,२२ कॅरेटचा ९० हजार, १८०, तर १८ कॅरेटचा दर ७३ हजार, ७९० रुपये इतका होता. मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजीच्या तुलनेत सोन्याचे दर अनुक्रमे ३००,२७५ आणि २२५ रुपयांनी कमी झाले आहे. सततचे वाढणारे सोन्याचे दर काहीसे कमी झाल्याने यापुढेही दर कमी व्हावे, अशी अपेक्षा खरेदीदारांनी व्यक्त केली आहे.
मागील दहा वर्षांतील सोन्याचे दर (प्रतितोळा)
वर्ष दर
२०२५ - ९८,३८०
२०२४ - ७७,५६०
२०२३ - ६५,३३०
२०२२ - ५२,६७०
२०२१ - ४८,७२०
२०२० - ४८,६५१
२०१९ - ३५,२२०
२०१८ - ३१,४ ३ ८
२०१७ - २९,६६८
२०१६ - २८,६२४
२०१५ - २६,३४४
स्थिरता शोधण्याचा प्रयत्न
 
सोन्याच्या वाढत्या दराचे गणित लक्षात घेता सद्य स्थितीत निर्माण झालेल्या जागतिक अस्थिरतेमध्ये स्थिरता शोधण्यासाठी गुंतवणूकदारांचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच सर्वात सुरक्षित मालमत्ता म्हणून सोनेखरेदीकडे सर्वांचाच कल वाढीला लागला आहे. तसेच व्यापारात अस्थिरता आणि वाढत्या महागाईमुळे दबाव वाढल्यामुळे सोनेखरेदीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत किमान नऊ टक्के वाढ प्रत्येक वर्षी नोंदविण्यात आली आहे.
येत्या पाच वर्षांत सोने दोन लाखांवर
 
सोने ही केवळ पारंपरिक गुंतवणूक नाही. ते आपल्या भविष्यासाठीचे आर्थिक कवच आहे. जागतिक अस्थिरता, महागाई, चलन अवमूल्यन आणि सेंट्रल बँकांची मोठ्या प्रमाणातील खरेदी या सर्व गोष्टी आगामी काळात सोन्याच्या किमतीला ऐतिहासिक शिखरावर नेण्यास कारणीभूत ठरू शकतात. आजचे दर पाहून सोने जरी महाग वाटत असले, तरी २ ०३ ० पर्यंत दोन लाख रुपये प्रतितोळा सोन्याचा दर होण्याची शक्यता वाटते. त्यामुळे आजचे सोने उद्याच्या सुरक्षिततेचे सुवर्णभांडार ठरू शकते.
- चेतन राजापूरकर, महाराष्ट्र डायरेक्टर, इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121