मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. निसर्गसौंदर्याच्या शोधात आलेल्या निरपराध पर्यटकांवर झालेल्या या अमानवी हल्ल्यात २८ निष्पाप जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर देशभरातून संतापाचा उद्रेक होत असून, अनेक नामवंत कलाकारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी व हिंदी दोन्ही सृष्टीत आपल्या सोज्वळ अभिनयाने ओळख मिळवलेल्या अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी या घटनेवर केवळ प्रतिक्रिया दिली नाही, तर एक ठाम आणि भावनिक निर्णय घेतला आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांनी काश्मीर हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि पुढचे १३ दिवस हाताला काळी पट्टी बांधून शोक व्यक्त करण्याची घोषणा केली आहे.
''आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर आपण १३ दिवस दुखवटा पाळतो. तसंच मी देखील या हल्ल्यामुळे झालेल्या दुःखाचा सन्मान करत, काळी पट्टी बांधून माझं दुःख व्यक्त करणार आहे,'' असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं.
तसेच, ''मी दिखावा करतेय, असं म्हणू नका. ही कृती माझ्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे,'' असंही त्या भावुक शब्दांत म्हणाल्या. या पोस्टसोबत त्यांनी स्वतःच्या हाताला काळी पट्टी बांधलेला फोटोही शेअर केला आहे.
सुप्रिया पिळगांवकर यांनी अजून एक आश्वासक विधान करत सांगितलं की, ''मी कधीच काश्मीरला गेले नाहीये, पण आता नक्की जाईन. मी माझ्या कुटुंबासोबत लवकरच काश्मीरला जाणार आहे. भीती बाळगायची गरज नाही.''
त्यांचा हा संदेश फक्त सहवेदना नाही, तर एक प्रकारचा धैर्यशील सामाजिक संदेश देखील आहे – की दुःख व्यक्त करणे ही कमजोरी नसून, ती एक जबाबदारी आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.