श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर, काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील आरागाम या गावी महाराष्ट्र शासनाच्या वतीने होणाऱ्या पुस्तकांच्या गावाचे उद्धाटन पुढे ढकलण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आपल्या X हँडल वरुन याविषयीची माहिती शेअर केली आहे.
दि. २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अत्यंत क्रुरपणे भारतीय पर्यटकांना मारले. या हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली असून, भारताने पाकिस्तानची 'पाणीकोंडी' करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत सिंधू नदीच्या पाणी करार रद्द करण्यात आला असून, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाच यामुळे धक्का बसणार आहे. या सगळ्या कोलहालात दुर्देवाने महाराष्ट्र शासनाच्या एका अभिनव प्रकल्पाचे उद्धाटन लांबणीवर पडले आहे. दि. २ मे २०२५ रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील आरागाम या पुस्तकांच्या गावाचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात येणार होते. मात्र, पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यानंतर सदर उद्घाटनाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
'पुस्तकांचे गाव-आरागाम' ही संकल्पना आहे तरी काय?
काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील आरागाम या गावात एकूण ३०० घरे आहेत. मागच्या दीड ते दोन वर्षांपासून या गावामध्ये वाचन संस्कृती रुळू लागली आहे. आरागामच्या काही तरुणांना महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव असलेल्या 'भिलार'ला भेट दिली व आपल्याकडे काश्मीरमध्ये सुद्धा असेच पुस्तकांचे गाव व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. काश्मीरमधील या तरुणांच्या स्वप्नाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला. राज्य मराठी विकास संस्थेच्या साह्यने वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम या गावात सुरु झाले. या गावामध्ये विविध विषयांची पुस्तके आहेत, ज्यामध्ये २० टक्के पुस्तकं मराठी भाषेत उपलब्ध आहेत.