दहशतवाद्यांना वेचून धडा शिकवला जाईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांना ग्वाही
24-Apr-2025
Total Views | 12
नवी दिल्ली, दहशतवाद्यांना धुळीस मिळवण्याची वेळ आता आली आहे. भारत प्रत्येक दहशतवाद्याला शोधून काढेल आणि धडा शिकवेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमधील मधुबनीमधून दिली आहे. राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पहलगाम येथील इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी देशवासियांना आश्वस्त करून दहशतवादी आणि त्यांचे पालनकर्त्यांना कठोर संदेश दिला.
पहलगामच्या दहशतवादी घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात बुडालेला असून शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे. हा हल्ला केवळ निःशस्त्र पर्यटकांवर नव्हता तर भारताच्या आत्म्यावर एक भ्याड हल्ला होता.या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना आणि त्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा भोगावी लागेल. दहशतवादाचे उर्वरित गड नष्ट करण्याची वेळ आता आली असून १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल. भारत प्रत्येक दहशतवाद्याला, त्यांच्या सूत्रधारांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना ओळखून त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. भारत पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंतही त्यांचा पाठलाग करून त्यांना धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या घटनेत काहींनी त्यांचे मुलगे काहींनी भाऊ तर काहींनी आपले जीवनसाथी गमावले, असे पंतप्रधान म्हणाले. या हत्याकांडात बळी पडलेले लोक विविध भाषिक आणि प्रादेशिक पार्श्वभूमीतून आले होते. काही बंगाली, कन्नड, मराठी, ओडिया, गुजराती बोलत होते आणि काही बिहारचेही होते, असे ते म्हणाले. या हल्ल्याबाबत कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, संपूर्ण देशात एकसमान दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे मानवतेवर विश्वास असणारा प्रत्येकजण या काळात भारताच्या सोबत आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.