पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी दहशतवादमुक्त भारत’ हे आपले स्वप्न नसून हक्क आहे व त्यासाठी भारताला कंबर कसावी लागेल.
भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारची संध्याकाळ ही हिंदू पर्यटकांसाठी काळरात्र ठरली. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी ‘तुमचा धर्म कोणता? तुमचे आयडी कार्ड दाखवा’ अशी त्या हिंदू पर्यटकांकडे विचारणा केली. त्यांना ‘कलमा’ म्हणायलाही सांगितले. एवढेच नाही, तर त्यांची पँट उतरवून ते हिंदूच असल्याची खातरजमा करून घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत या हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या निर्घृण हल्ल्यात 26 हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत.
हा एकूणच सगळा भाग पठारी असल्यामुळे कोणालाही काही समजण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी आपला कुटिल डाव साधला आणि क्षणार्धात हिरवेगार पठार हे हिंदूंच्या रक्ताने माखले. हिंदू महिला आणि लहान मुलांच्या आक्रोशाने हिमालयही गहिवरला. भारतात व जगभरात असे हल्ले कोणत्या धर्माचे लोक करतात, हे जगजाहीर आहे. मात्र, स्वतःला ‘पुरोगामित्वाचे रक्षणकर्ते’ म्हणविणारे लोक आणि त्यांच्या कटात सहभागी होऊन धर्मांधांची मते मिळवणारे राजकारणी ‘दहशतवादाला धर्म नसतो,’ अशी पिपाणी वाजवायला सुरुवात करतात.
स्वातंत्र्योत्तर काळापासूनच जम्मू-काश्मीर ही इस्लामिक दहशतवाद्यांमुळे भारतासाठी ठरलेली एक जटिल समस्या. स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करणार्या इंदिरा गांधींनाही काश्मीरप्रश्न काही केल्या सोडविता आला नाही. ‘कलम 370’चे लोढणे आता कुठे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या गळ्यातून काढले होते. त्यानंतर लोकशाही मार्गाने निवडणुकाही पार पडल्या आणि जम्मू-काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकारही स्थापन झाले.
हे सरकार फारुख अब्दुल्ला यांच्या चिरंजीवांचे असले, तरीही त्याला सर्वतोपरि मदत, सहकार्य व सर्व काही करण्याची तयारी देशाच्या पंतप्रधानांनी दाखवली व आज हा हल्ला झाला. या हल्ल्यासाठी राज्य सरकार की केंद्र सरकार जबाबदार, हा मुद्दा नाही. मात्र, असे हल्ले का होतात? हे हल्ले कोण करते? हे जगजाहीर आहेच. पण, कौम म्हणून मुस्लिमांकडून अशा गोष्टींचा प्रकर्षाने धिक्कार होताना दिसत नाही. ज्या त्वेषाने इशरत जहाँ, याकुब मेमन यांच्या जनाजासाठी जशी गर्दी लोटते, तशा प्रकारे अशा विषयांसाठी रस्त्यावर उतरून विरोधही होताना दिसत नाही. खरे तर पर्यटन हा काश्मीरच्या उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग. पर्यटन सुखरुप झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगार रुजायलाही सुरुवात झाली होती. काश्मिरींना हातात दगड नव्हे, तर रोजगार हवा, असा एक तर्क आहे.
मात्र, पर्यटकांवर दहशतवादी हल्ले झाल्यानंतर देशावर कितीही प्रेम असले, तरी कोणता पर्यटक आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून पर्यटन करणार व अशा मंडळींना रोजगार देणार? अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीरचे कंबरडे मोडणारे आहेत. धर्मांध इस्लामी विचारांचा प्रभाव, त्यातून आलेली शून्यता आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतविरोधी विष तरुणांच्या मनात पसरविण्याची स्ट्रॅटेजी; यांमुळे गेल्या 75 वर्षांहून अधिक काळ काश्मीर धुमसता राहिला. गेली पाच-सात वर्षे काश्मीरमध्ये काहीसे बरे दिवस आहेत, असे वाटत असतानाच, ही संतापजनक व दुर्दैवी घटना घडली.
या घटनेमागचा पाकिस्तानी सहभाग हळूहळू उघडकीला येत आहे. या कफल्लकांना स्वतःच्या देशातील उपासमारीने मरणार्या नागरिकांना खायला द्यायला अन्न नाही. मात्र, शेजारच्या देशांमध्ये धर्मांध विखार पसरविण्यासाठी भरपूर संसाधने उपलब्ध आहेत. खरे तर असे देश अस्तित्वातच असता कामा नये. मात्र, जागतिक राजकारणाच्या रहाटगाडग्याचे काही नियम असतात आणि त्याचाच फायदा हे पाखंडी लोक मिळवतात. त्यामुळे अशी पापस्थाने उद्ध्वस्त करावी, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी ही समस्या मुळासकट संपविण्यासाठी निरंतर काम करीत राहावे लागते.
‘धर्मांध विरुद्ध सश्रद्ध’ असा हा संघर्ष दीर्घ काळ चालणारा आहे. इस्लामी धर्मांध दहशतवाद ही तर संपूर्ण जगाचीच डोकेदुखी. त्यांनी तर अमेरिकेलाही सोडले नव्हते. या सगळ्यात आता पाकिस्तानी पुरावे समोर येत आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पुरस्कृत ‘द रेझिस्टंट फ्रंट’ने (टीआरएफ) स्वीकारली. मुळात ‘टीआरएफ’ या दहशतवादी संघटनेची स्थापनाच काश्मीरमधून ‘कलम 370’ हटविल्यानंतर करण्यात आली होती.
प्रारंभी केवळ ऑनलाईन युनिट म्हणून काम करणार्या ‘टीआरएफ’ने नंतर ‘लष्कर-ए-तोयबा’सह अन्य दहशतवादी संघटनांसोबत काम करायला सुरुवात केली. सर्व दहशतवादी संघटनांमधील दहशतवाद्यांना एकत्र करणे, त्यांना ‘जिहाद’साठी लष्करी प्रशिक्षण देण्याचे उद्योेग ‘टीआरएफ’च्या म्होरक्यांनी सुरू केले. विशेष म्हणजे, या संघटनेचा जन्मदाता हा पाकिस्तानच. ‘एफएटीएफ’कडून कर्जाऊ पैसे भीक म्हणून मिळावे म्हणून पाकिस्तानवर ‘लष्कर-ए-तोयबा’सारख्या दहशतवादी संघटनांवर कारवाईचा दबाव वाढला होता. तसेच या दहशतवादी संघटनांसाठीच्या आर्थिक फंडिंगवरही ‘एफएटीएफ’ची करडी नजर होती. त्यामुळे ‘लष्कर-ए-तोयबा’वरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानने ‘टीआरएफ’च्या नावाने दहशतवाद्यांची नवी पिल्लावळ जन्माला घातली.
पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चाच या दहशतवादी संघटनेच्या स्थापनेपासून ते प्रशिक्षणापर्यंतचा सहभाग यापूर्वीही उघडकीस आला आहेच. शेख सज्जाद गुल हा या ‘टीआरएफ’चा मुख्य म्होरक्याही काश्मिरीच. 2018 साली श्रीनगरमधील पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येमागेही याच गुलचे नाव समोर आले होते. परवाच्या पहलगाममधील हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला सैफुल्लाह खालिद हा तर कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा निकटवर्तीय. त्यामुळे काश्मिरी पंडितांवरील झालेले हल्ले असतील, परराज्यातील कामगारांची हत्या, भाजपच्या कार्यकर्त्यांचे खून, ‘राष्ट्रीय रायफल्स’च्या जवानांना लक्ष्य करणे, हेदेखील ‘टीआरएफ’ने रचलेले एक पद्धतशीर षड्यंत्रच. त्यामुळे काश्मीर खोर्यात कायमच एकप्रकारची अशांतता आणि अस्थिरता कशी नांदेल, यासाठी पाकपुरस्कृत ‘टीआरएफ’ने आपले जाळे खोलवर विणले आहे.
काश्मिरी तरुणांची समाजमाध्यमांतून माथी भडकावणे आणि ऑनलाईन माध्यमातून दहशतवादी कार्यशैलीच्या विषपेरणीचे उद्योग ‘टीआरएफ’ने केले ते शेजारी पाकिस्तानच्या जोरावरच. ‘टीआरएफ’च्या काश्मीर खोर्यातील अशा देशविघातक कुकृत्यांमुळेच 2023 साली या संघटनेवर भारत सरकारने बंदीही लादली. पण, पाकिस्तानकडून होणारा अविरत वित्तपुरवठा, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि ‘लष्कर-ए-तोयबा’च्या नापाक पाठबळामुळेच ‘टीआरएफ’ पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवाद्यांना पोसत आहे.
खरं तर पाकिस्तानबाबतची गुंतागुंत म्हणजे, हा देश नक्की कोणाच्या हातात आहे, याचे उत्तर खुद्द अल्लातालालाही सापडणार नाही. संदर्भहीन राज्यकर्ते, महत्त्वाकांक्षी लष्करशहा, निरनिराळ्या मौलवींचे निरनिराळे दहशतवादी गटतट, असे कितीतरी घटक हा संदर्भहीन देश कसाबसा चालवत आहेत. म्हणूनच हा देश कधीतरी सुधारेल, असे मानणे चुकीचे ठरेल. भारत पाकिस्तानला तडाखेबंद उत्तर देऊ शकत नाही, असे मुळीच नाही. मात्र, उरलेल्या जगानेही मानवतेचा शत्रू असलेल्या धर्मांध इस्लामचे काय करायचे, हे ठरवले पाहिजे. जागतिक समुदायांनी अशा निरपराध पर्यटकांच्या हत्या निमूटपणे पाहिल्या, तर जगात सर्वत्र पर्यटनावरच जाच येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स भारत दौर्यावर असताना घडलेली ही घटना अमेरिकेलाही एकप्रकारे इशारा देणारी होती.
सर्वच प्रकारचे जागतिक उपाय या दहशतवादापुढे अपुरे पडले आहेत. आता भारतालाच भारत म्हणून यात परिणामकारक उपाय शोधावा लागणार आहे. ‘इस्लामी दहशतवादमुक्त भारत’ हे आपले स्वप्न नसून हक्क आहे व त्यासाठी आपल्याला कंबर कसून उभे राहावे लागेल. भारताची समस्या ही इस्लामी दहशतवादाइतकीच ढोंगी पुरोगाम्यांचीही आहे. या मंडळींना हिंदू दहशतवादाचे थोतांड पसरवायला संधी मिळते. मात्र, असे काही घडले की, ‘दहशतवादाला धर्म नसतो’ असे राग आळवले जातात. दु:ख वाटते ते या पर्यटकांचे, ज्यांनी खरोखरच कष्टाने कमावलेला आपला पैसा कुठल्या धर्माच्या लोकांच्या हातात पडणार आहे, याचा विचार न करता, काश्मीरला पर्यटनाला जाण्याचा निर्णय घेतला. देश म्हणून विचार करणार्या या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना...