
श्रीनगर : ( Sushil Nathaniel ) पहलगाममध्ये बैसरन येथे दहशतवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केलेल्या २६ जणांपैकी ५८ वर्षीय सुशील नथानिएल हे इंदोरचे एलआयसी शाखा व्यवस्थापक होते. ते पत्नी, मुलगा आणि मुलगी असे काश्मीर पर्यटनासाठी गेले असताना त्यांचा सामना अतिरेक्यांशी झाला. यावेळी त्यांना गुडघ्यावर बसवून कलमा वाचायला सांगितला, कलमा वाचायला न जमल्याने त्यांची गोळी झाडून हत्या केली.
२२ एप्रिल रोजी बैसरन येथे दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांची हत्या केली. अचानक गोळीबार आणि आरडाओरड सुरू झाली. यावेळी नथानिएल यांच्या कुटुंबाने त्यांना शेवटचे पाहिले. तेव्हा ते गुडघ्यांवर बसले होते. एक दहशतवादी त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखून होता. त्याला कलमा वाचून दाखव असे त्यांना सांगत होता. मात्र, सुशील यांना कलमा पाठ नसल्याने त्यांच्या डोक्यात गोळी घातली. यात त्यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली.
उपचारासाठी त्यांना श्रीनगरला पाठविण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालावली. सुशील इंदूरच्या अलिराजपूर जिल्ह्यातील एलआयसी शाखा व्यवस्थापक होते. त्यांची ३० वर्षीय मुलगी आकांक्षा हिच्या पायाला गोळी लागली. तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्यांची पत्नी जेनिफर (५४) आणि मुलगा ऑस्टिन (२१) सुखरूप आहेत. २१ एप्रिल रोजी हे कुटुंब जेनिफरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते.
जेनिफर यांनी पहलगाममध्ये घडलेल्या या दहशतवादी हल्लाची बातमी त्यांचा मेहूणा विकासला सांगितली. त्या म्हणाल्या, “आकांक्षा आणि ऑस्टिन एका गेटजवळ उभे होते, तर सुशीलला शौचालयात गेला होता. जेनिफर त्यांच्या सोबतच होत्या. तेव्हाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुशीलने जेनिफरला लपण्यास सांगितले आणि दहशतवाद्यांचा सामना केला. यावेळी दहशतवाद्यांनी सुशीलला गुडघे टेकण्यास भाग पाडले, त्याला त्याचा धर्म विचारण्यात आला. त्याने उत्तर दिले की तो ख्रिश्चन आहे. ‘कलमा म्हणून दाखव’, असे दहशतवाद्याने त्याला सांगितले. ते म्हणू शकला नसल्याने दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.
जेनिफर यांचा भाऊ संजय कुमरावत म्हणाले, “२०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यापासून सुशील नेहमीच काश्मीरमध्ये कुटुंबासह पृथ्वीवरील स्वर्ग अनुभवण्यासाठी इच्छुक होते. ते तिथे गेलेही पण कधीही परत न येण्यासाठी. महिन्याभरापूर्वी मी त्यांच्याशी बोललो होतो. तेव्हाही काश्मीरला जाण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले होते. आम्ही सरकारच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या सूत्रधारांवर शक्य तितकी कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.”
इंदोरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी नथानिएलच्या कुटुंबाशी संपर्क साधला. राज्य सरकार कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत करेल. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नथानिएल यांच्या कुटुंबिंयांशी संपर्क साधला आहे. राज्य सरकार जम्मू आणि काश्मीर प्रशासनाशी सतत संपर्कात आहे, असेही ते म्हणाले.