रेशन दुकानदारांना मिळणार राज्य कामगार विमा योजनेचा लाभ

- प्रस्ताव तयार करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश; पतसंस्था आणि शिक्षकांचाही समावेश

    24-Apr-2025
Total Views |
Ration shopkeepers will get the benefit of the State Labor Insurance Scheme

मुंबई,राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था आणि शिक्षकांनाही आता कामगार विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी दिले.

राज्य कामगार विमा योजनेच्या मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी वैद्यकीय संचालक डॉ. शशी कोळूणूरकर, संचालक (प्रशासन) सोहम वायाळ, उपसंचालक सचिन देसाई तसेच राज्यातील विविध राज्य विमा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. राज्यातील कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आबिटकर म्हणाले, राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था व शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरे आयोजित करावीत आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत. याचबरोबर रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी नवीन योजना तयार कराव्यात.

 शासनाकडून साहित्य व यंत्रसामग्री पुरवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रिक्त पदे भरण्यासाठीही तातडीने कार्यवाही केली जाईल तसेच डायलिसिससारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने व जलदगतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. कामगारांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी शोधून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात याव्यात व जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत.

एक महिन्यानंतर या सूचनांचा पुन्हा आढावा घेतला जाईल. कामात प्रगती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी केली.