उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी एकत्र येण्याची मागणी ही पक्ष कार्यकर्त्यांची सच्ची भावना असली, तरी राजकीय वास्तवाच्या कसोटीवर ती टिकणारी नाही. या दोन्ही नेत्यांचे स्वतःबद्दल असलेले प्रचंड गैरसमज जरी बाजूला ठेवले, तरी त्यांच्या पक्षात काहीच समान नाही. या दोन्ही सेनापतींचा मतदारांनी पराभव केल्यामुळे त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.
कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे महाराष्ट्राचे वर्णन एका गोविंदाग्रजांनी केले असले, तरी महाराष्ट्रातील राजकारण हे नेहमीच भावनाप्रधान राहिले आहे. त्यातही शिवसेनेसारखा पक्ष हा केवळ भावनात्मक राजकारण करूनच टिकून राहिला आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी स्थापन झालेल्या या पक्षाने, मराठी माणसाला त्याचा न्याय्य हक्क कधीच मिळवून दिला नाही. तरीही भावनाप्रधान राजकारणाच्या जोरावर हा पक्ष राज्यात आणि मुंबईत, नेहमी सत्तेत दिसतो. ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा केंद्राचा कट आहे,’ या एका वाक्यावर, 25 वर्षे या पक्षाने मुंबई महापालिकेत सत्ता गाजविली.
आता या पक्षाची दोन शकले झाली असली, तरी उद्धव ठाकरे यांचा पक्ष आजही भावनेच्या राजकारणाचा आधार घेत आपले अस्तित्व टिकवून धरण्याची धडपड करताना दिसतो. मराठी माणसाचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत, तो आपल्याला सोयीस्कर असे राजकारण करतो. अगदीच काही नाही, म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आणि आता तर त्यांच्या आवाजाचाही आश्रय घेऊन, मते मागताना दिसतो.
उद्धव ठाकरे यांच्याकडे तेवढे एकच भांडवल असले, तरी तेही आता संपुष्टात आले आहे. ‘सांगे वडिलांची कीर्ती, तो कोण’ असतो, हे समर्थ रामदासांनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. पण, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या गद्दारीनंतर, त्यांचा जनमानसांतील आधार आणि अधिष्ठान संपुष्टात आले. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत तर त्यांच्या पक्षाची दारूण अवस्था झाल्याने, आता त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. यावेळी ना बाळासाहेब त्यांच्या पक्षाला वाचवू शकतात, ना हिंदुत्व.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचीही अवस्था वेगळी नाही. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत, या पक्षाचा केवळ एक आमदार निवडून आला होता. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत, मनसेला राज्यातील 288 जागांपैकी एकही जागी विजय मिळाला नाही. राज ठाकरे जेथे राहतात, त्या दादर-माहिम मतदार संघातूनच त्यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवीत होता. त्यालाही राज ठाकरेंना निवडून आणता आले नाही.
ना कसली विचारसरणी, ना दूरगामी धोरण. त्यात वारंवार आपली भूमिका बदलणार्या या पक्षावर, विश्वास ठेवण्यासारखे मतदारांकडेही काही नव्हते. जाहीर सभेतील राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणावर टाळ्या वाजविणारे श्रोते, मैदानाबाहेर येताच विसरून जात. कारण, भाषण करण्यापलीकडे राज ठाकरे यांच्या हाती काही नाही, हे राज्यातील सुज्ञ मतदाराला चांगलेच ठावूक आहे. आजच्या राजकारणात संदर्भहीन झालेला हा पक्ष पुन्हा पुनरुज्जीवित होईल, याची दूरवरही शक्यता दिसत नाही.
अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकल्याने, या दोन सेनांच्या नेत्यांना आता आपल्यातील नातेसंबंधांची अचानक जाणीव झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली आहे. तशा आशयाचे जाहीर फलकही, मुंबईत काही ठिकाणी लावण्यात आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी काही शिवसैनिकांची मनापासून इच्छा असली, तरी त्याला राजकारणातील रोखठोक वास्तवाचा पाया नाही. ही गोष्ट प्रत्यक्षात घडणे शक्य नसले, तरी हा पुन्हा भावनेच्या राजकारणाचाच एक भाग आहे.
भाऊबंदकीचा शाप मराठी माणसाला पूर्वीपासूनच लागलेला आहे. राजकारणात तो अधिकच ठळकपणे समोर येतो. उद्धव असो की राज ठाकरे यांचे स्वतःविषयी जे प्रचंड गैरसमज आहेत, त्यामुळे हे दोन नेते एकत्र येणे हे केवळ स्वप्नरंजन आहे. तसे असते, तर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेरच का पडले असते? तसेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार, या दोन्ही नेत्यांच्या मनात जवळपास 20 वर्षांनी का आला? त्यामुळे हे दोन नेते एकत्र येण्याची शक्यताच नाही. आपले पक्ष ही या दोघांची स्वतंत्र संस्थाने आहेत.
या संस्थानाचे ते राजे आहेत. एकत्र आल्यावर एकत्रित पक्षाचा राजमुकुट, केवळ एकाच व्यक्तीच्या डोक्यावर ठेवला जाऊ शकतो. ते डोके कोणाचे असेल, यावरून अनेक डोकी फुटण्याचा संभव असल्याने, ठाकरे बंधू एकत्र येणे शक्य नाही. या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याचीही शक्यता नाही. कारण युती किंवा आघाडी म्हटली की, जागावाटप आणि सत्तेत वाटा आलाच. मग कमी जागा कोण स्वीकारणार? आजच्या घडीला दोन्ही पक्षांची राजकीय स्थिती समान नाही. मनसेकडे एकही आमदार-खासदार नाही किंवा महापालिका किंवा नगर परिषदेतही सत्ता नाही. उबाठा सेनेला, मुंबई महापालिकेत काही स्थान आहे. शिवाय, त्यांच्याकडे 20 आमदार आणि काही खासदार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनाच नमते घ्यावे लागेल. ते राजसाहेबांच्या अहंकाराला कसे शोभून दिसेल?
प्रादेशिक पक्ष स्थापून स्वबळावर सत्तेत आलेल्या नेत्यांची, अन्य राज्यांमध्ये कमतरता नाही. पण, महाराष्ट्रातील एकाही नेत्याला महाराष्ट्रावर वर्चस्व गाजविणारा प्रादेशिक पक्ष स्थापन करता आलेला नाही. कारण, त्यासाठी लागणारी मेहनत घेण्याची तयारी, राज्यातील कोणत्याच नेत्याकडे नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला एक पर्याय म्हणून शिवसेनेची उभारणी केली असली, तरी प्रारंभीच्या काळात त्यांचा पक्ष काँग्रेसवरच अवलंबून होता. भाजपची साथ लाभली नसती, तर शिवसेनाही राज्यातील एका भागापुरती मर्यादित राहिली असती.
विद्यमान स्थितीत राज्यातील मतदारांनी या दोन्ही सेनांना पराभूत केले आहे. पराभूत सेनेच्या सेनापतींना स्वतःचे मत राखण्याचा अधिकार नसतो. जे पदरी पडेल, ते मुकाट्याने स्वीकारावे लागते. आपल्या नसलेल्या कर्तृत्वाचे भयंकर दर्शन उद्धव ठाकरे यांनी, आपल्या औटघटकेच्या कारकिर्दीत राज्यातील जनतेला घडविले आहे. राज ठाकरे यांच्याकडील कथित कर्तृत्वाची झलकही जनतेला दिसलेली नसल्याने, हे सेनापती हताश झाले आहेत.
- राहुल बोरगांवकर